स्वयंसिद्ध लेखमाला:-१३. हे नारी घराबाहेर पड, ते येणाऱ्या प्रसंगाशी दोन हात करण्याचा प्रचंड आत्मविश्वास सोबत घेऊनच.

स्वयंसिद्ध लेखमाला:-१३.

हे नारी घराबाहेर पड, ते येणाऱ्या प्रसंगाशी दोन हात करण्याचा प्रचंड आत्मविश्वास सोबत घेऊनच.



प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर

 ८ मार्च जागतिक महिला दिन आज सर्वत्र जगभर साजरा केला जातोय, जणू राष्ट्रीय सणाचे महत्व या दिवसाला आले आहे. भगिनी हा दिवस विविध प्रकारे साजरा करतात. काही भगिनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर काही भगिनी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर काही भगिनी शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' हे लक्षात घेवून कार्यक्रमाचे आयोजन करतात. कार्यक्रम कुठलाही असो उद्देश्य मात्र एकच महिलांनी एकत्र येणे, महिलांच्या समस्यांना वाचा फोडणे, त्याच-त्याच दिनचर्येतून एक दिवस का होईना घराबाहेर पडून आपला हक्काचा दिवस जागतिक महिला दिन' साजरा करणे.

जागतिक महिला दिनाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जात, आहे.' या दिवशी शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महिला मंडळ , महिला बचत गट यांच्या माध्यमातून अनेक स्तरावर सदर 'जागतिक महिला दिन, मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अश्या या जागतिक महिला दिनाचे एवढे महत्व का वाढावे? हा प्रश्न मनात येतोय व मन भूतकाळात या मागील असणारी पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आतूर होतो.

सार्वत्रीक महिला मताधिकार चळवळीमुळे उजेडात येणारा हा दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून सुरु झाला संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत  उदाहरण होते. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपआपल्या पद्धतीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासाठी द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली परंतु ही असोसिएशन पूर्णपणे वर्णद्वेषी व स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह दूषित असल्याने बहुसंख्य लोकांनी यास विरोध दर्शविला.

१९०७ साली स्टूटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रीक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे, अशी घोषणा केली.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयार्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री- कामगारांनी रुटगंस चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केलीत. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता यासोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणाने केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने अनेक देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या त्याचा परिणाम या मागण्यांना यश आले . स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीवर क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकारावा असा ठराव क्लाराने मांडला व तो पास झाला तेव्हापासून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन' म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.

 भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या . स्त्रीयांना  भारतातही सोईचे  व्हावे यासाठी अनेक सोईचे निर्णय घेण्यात आले. स्त्री कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता  मिळावी, यासोबतच स्तनदा मातांना, गरोदर महिलांना कामावर असतांना त्या काळातील सुट्यांचा लाभ मिळावा. स्तनदा मातांना 'हिरकणी कक्ष' उभारण्यात आले तर, गरोदर मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर असे मिळून २६ आठवडे रजा मिळाली.

भारतात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महिला सक्षमीकरणास बळकटी यावी यासाठी महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्यात. त्यात प्रामुख्याने

१) माझी कन्या भाग्यश्री योजना

२) लेक लाडकी योजना

 ३) महिला उद्योगिनी योजना

 ४) सुकन्या समृध्दी योजना

(५) जननी सुरक्षा योजना

 ६) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०

७) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

 ८) महिला सन्मान योजना

 ९) स्वर्णिमा योजना 

१०) उद्योजक धोरण योजना 

११) महिला समृद्धी कर्ज योजना 

१२) लाडकी बहिण योजना

१३) बेटी पढ़ाओ बेटी बचाओ योजना

वरील सर्व योजनांचा पाठपुरावा नियमितपणे सरकार करीत असते. महिला सक्षमीकरणांतर्गत शासकिय, निमशासकीय, खाजगी संस्था सुद्धा पुढाकार घेवून अनेक उपक्रम आयोजित करतात, परंतु आजही महिला अनेक समस्यांतून पूर्णत: बाहेर पडल्या नाही. आजही वर्तमान- पत्रातून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या, कौटूबिक हिंसाचाराच्या, अंधश्रद्धेला बळी  पडणाऱ्या, बातम्या येतच असतात.

जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करतांनाच, संगणक युगात वावरत आहे. अनेक भौतिक सुविधा पायाशी लोळत आहेत अशातच महिलांवरील अत्याचारांच्या बातम्या जेव्हा कानी   येतात ,तेव्हा मन गलबलून जाते आपण यशोशिखर गाठत असतानाच अधोगतीकडेही जात आहोत,असे वाटू लागते.

"महिलांच्या सुरक्षिततेबाबत आजही महिलांच्या मनात भिती आहे. मी एकटी कुठे गेली तर माझ्यावर काही वाईट प्रसंग तर येणार नाही ना? ही भिती उराशी बाळगूनच ती घराचा उंबरठा ओलांडून जाते. कारण  देशातील काना-कोप-यातील वातावरणच तसे दिसते पण हे जरी खरे असले तरी भितीपोटी महिला घरीच बसून कसे चालणार ती भिती बाजूला सारुन तिला कुटूंबाच्या, समाजाच्या, देशाच्या उत्कर्षासाठी बाहेर निघावेच लागेल, मनाला कणखर व आलेल्या प्रसंगाशी दोन हात करण्याचा प्रचंड आत्मविश्वास सोबत घेऊनच.

प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर

माजी नगराध्यक्ष मूल.

 अध्यक्षा :- झाडीबोली महिला मंडळ चंद्रपूर

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.