ग्राहक जागरण हा शिकवण्याचा विषय नव्हे ॲड. किशोरजी लुल्ला .
ग्राहक जागरण हा शिकवण्याचा विषय नव्हेंच! ॲड. किशोरजी लुल्ला
दीपक देशपांडे.
जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने दिनांक ७मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत, राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ,त्यांच्याशी कार्य विस्तार करण्यासंदर्भात हितगूज साधताना संघटनेचे अध्यक्ष दिलीप फडके, सचिव,प्रा.नागनाथ स्वामी,संघटक दिलीप पाटील, उपाध्यक्षा नयनताई चव्हाण, सल्लागार किशोरजी लुल्ला, पूर्व विदर्भ प्रभारी दीपक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलांना हार्दिक शुभेच्छा देऊन,आणि कुठल्याही प्रलोभनांना , भुलथापांना बळी न पडता जागृत राहून, सजगपणे व्यवहार करण्याची गरज प्रतिपादन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर मान. किशोरजी लुल्ला यांनी मार्गदर्शन केले.
रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर साधारणपणे पुढील बातम्या वाचावयास मिळतात.
१) पॉलिश करून देतो असे सांगून सुशिक्षित महिलेचे सोने लुटले.
२) एटीएम मधून एका व्यापाऱ्याचे पाच हजार रुपये लंपास केले.
३) शाळेतील मुले व्यसनाधीनतेच्या आहारी. दप्तरांमध्ये व्हाइटनर आढळले.
४) सायबर कॅफेमध्ये अकरावीची मुले मुली सापडली.
५) नोकरीस जाणाऱ्या मध्यमवयीन महिलेचा निर्जन स्थळी विनयभंग.
६) वकिलाने ओटीपी दिला आणि पैसे उडाले.
७) पहाटे चालायला जाणाऱ्या साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दागिना मोटरसायकल स्वारांनी हिसडा मारून पळवला.
८) रेल्वेमध्ये बिस्कीट खायला दिले आणि एका कुटुंबाची बॅग लांबवली.
९) पाठविलेल्या पार्सल मध्ये ड्रग्स आहेत असे सांगून बोगस कस्टम अधिकारी आहे असे सांगून एका डॉक्टरला दहा लाख रुपयाला लुटले.
११) मुदतबाह्य झालेल्या औषधाच्या गोळ्या खाल्ल्याने उलट्या.
१२) खरेदी बिल नसल्याने वॉशिंग मशीन खराब निघून सुद्धा दुकानदाराची ग्राहक न्यायालयाने सुटका केली.
१३) एक वर्षात दाम दुप्पट करून देतो म्हणून दावा सांगणाऱ्या कंपनीने पाच कोटी रुपये घेऊन पळ काढला.
१४) एमआरपी पेक्षा जास्त किंमत आकारल्याने ई मार्ट मध्ये वादावादी.
१५) सतत तीन वर्षे कर भरण्यासाठी घेतलेले पैसे न भरताच दिवाणजी फरार.
१६) हनी ट्रॅप मध्ये अडकणाऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ.
या सर्व बातम्यांमध्ये एक सामायिक मुद्दा असा आढळतो की या फसणाऱ्यांमध्ये अशिक्षित, खेडूत अगर शेतकरी यांची संख्या नगण्य आहे. याउलट सुशिक्षित, कारखानदार, व्यापारी, डॉक्टर, शहरी भागात राहणाऱ्या महिला, नोकरी करणाऱ्या मुली आणि विद्यार्थी यांची संख्या बऱ्यापैकी आहे. तसेच फसवणुकीचे प्रकार देखील खूप मोठा अभ्यास करून केलेली आहेत किंवा फसवणाऱ्याने फार मोठे कौशल्य वापरलेले आहे असे नाही. या फसणाऱ्यांनी थोडी जरी सावधगिरी बाळगली असती, चार मित्रांशी चर्चा केली असती, आजूबाजूला थोडेसे लक्ष ठेवले असते आणि थोडेसे व्यवहार ज्ञान वापरले असते तरी देखील झालेली फसवणूक टाळता आली असती. त्यामुळे अशा बाबतीत तरी 'ग्राहक जागरण' हा कोणीतरी शिकवायचा विषय नव्हे तर तो स्वशिक्षणाचा, सावधगिरीचा किंवा स्वजागृतीचा विषय आहे.
दारात आलेल्या व्यक्तीला हातातले दागिने काढून देऊ नये, एटीएम मध्ये शक्यतो एकटे जाऊ नये, आजूबाजूला कॅमेरा आहे का, जवळपास एखादी संशयित व्यक्ती उभी आहे का याकडे लक्ष देणे, मुलांची दप्तरे अधून मधून तपासणे, तरुण पिढी बाहेर जाताना कोठे जातात याकडे लक्ष ठेवणे, त्यासाठी स्वतः वेळ काढणे, त्यांच्या मोबाईलवर लक्ष ठेवणे, कुटुंबीयांशी खुली चर्चा करणे, कोणाचाही फोन आला तर त्याला ओटीपी किंवा पासवर्ड न देणे, पहाटेच्या वेळेस एकटे फिरायला न जाणे, त्यावेळी सोन्याचे दागिने परिधान न करणे, मुलींनी महिलांनी एकांत स्थळी जायचे टाळणे, परक्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणे, खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे बिल मागून घेणे, उत्पादनाची तारीख आणि एमआरपी तपासून मगच खरेदी करणे, १% पेक्षा जादा कोण व्याज किंवा फायदा देत असेल तर तेथे धोका आहे हे लक्षात घेणे, अशासारख्या बाबी तिसऱ्या कोणीतरी येऊन शिकवल्या तरच समजतील असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. याला मी सुशिक्षित अडाणी म्हणेन.
फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करताना, एखादी जागा भाड्याने घेताना किंवा देताना, इन्शुरन्स पॉलिसी करताना, महागड्या वस्तू अगर सेवा खरेदी करताना, प्रवासी कंपनीची निवड करताना, लहान मुलांच्या शाळेची फी भरताना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पैसे भरतानाचे सगळे व्यवहार डोळे उघडून केले पाहिजेत. समोरची व्यक्ती अगर संस्था फसवू शकते असे डोक्यात ठेवणे काहीच गैर नाही. चार जणांशी चर्चा न करता किंवा घाईगडबडीने कोणतेही व्यवहार केल्यास फसवणूक नक्की होते असा माझा गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे. ८०००० रुपयाच्या किमतीचे सोने जर एखादा ६०००० रुपयाला देत असेल तर ही फसवणूक आहे हे स्वतःलाच लक्षात यायला हवे. 'कोणीही कोणालाही स्वतःच्या खिशातले काढून देत नाही' हा मुद्दा कायम डोक्यात ठेवला पाहिजे. कोणावरही अंधविश्वास ठेवावा असा सध्याचा जमाना राहिलेला नाही याचे आपल्यासारख्याला भान असायला काहीच हरकत नाही.
हे जरी खरे असले तरी देशव्यापी ग्राहक संघटनांनी देखील या दृष्टीने ग्राहकांची जागृती केली पाहिजे. त्यासाठी सतत लिखाण करणे,शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणे देणे, चर्चासत्रे आयोजित करणे असे कार्य सतत करत राहिले पाहिजे. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात “ जे जे आपणांसी ठावे, ते इतारांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन.” राज्यस्तरीय कार्यकारिणी सभेत संबोधित करताना संघटनेचे सल्लागार मान.किशोरजी लुल्ला यांनी हे मत व्यक्त केले.
यादृष्टीने आम्ही जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने अशाच, अडलेल्या ,अडणाऱ्या , वा फसलेल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी जनजागृती करतांना सहजगत्या फसवल्या जाऊ नये म्हणून ग्राहक जागृतीचे कार्य तन मन आणि धन ही वापरुन,जणू लष्कराच्या भाकरी भाजल्यागत कार्य करीत आहोत , परंतू यांबाबत जनता आधी लक्ष देत नाही आणि मग फसवणूक झाली की, आकांडतांडव करीत सुटतात,ही वस्तुस्थिती आहे.
तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच हितासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा,करणे चुकीचे तर नाही ना? विचार करा ,फसवल्या गेल्यावर धावपळ करण्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगली तर...?
आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोतच, ग्राहक म्हणून फसवणूक होण्यापूर्वी आणि फसवणूक झाल्यानंतरही..... मात्र निर्णय आपल्याला घ्यायचा आहे ,कारण आमचा विश्वास आहे , ग्राहक हा राजा आहे,आणि आमचे ध्येय आहे, ग्राहक राजा जागा हो, शोषणमुक्त समाज रचनेचा धागा हो,आणि आमचा प्रयत्न आहे शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करणे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment