सावली येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
सावली येथे तहसील कार्यालय व जागृत ग्राहक राजा यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
आजही ग्राहक आपल्या अधिकारांप्रती अनभिज्ञ:-किशोर मडावी.
सावली, न्यूज ब्युरो
ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आल्यानंतर ३८-३९वर्षे लोटून जात असतांनाही ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव होऊ शकली नाही त्यामुळे आजही फसवणूक लुबाडणूक सुरू असून ग्राहक जागृतीसाठी शासन आणि ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत सावली येथील कार्यक्रमात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जागृत ग्राहक राजा संघटनेचे मूल तालुका उपाध्यक्ष अशोक मैदमवार यांनी ग्राहक म्हणजे काय? आणि फसवणूक प्रकाराबाबत माहिती देतांना अशा कार्यक्रमांचे आयोजन किती महत्त्वाचे आहे याबाबत माहिती दिली.
संघटनेचे कार्यकारिणी सदस्य डॉ आनंदराव कुळे यांनी, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि ग्राहकांना मिळालेले अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली, ग्राहक व व्यापारी हेच अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे व केवळ वाद न करता सामंजस्याने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आणि ग्राहक जागृती करुन फसवणूक टाळण्यासाठी संघटनेचे महत्त्व पटवून देताना सामुहिक लढ्यासाठी संघटनेसोबत येण्याचे आवाहन केले.
रमेश डांगरे सचिव यांनी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती देताना, ग्राहक हा राजा असतांनाच तो कसा फसवला जातो याबाबत आणि आँनलाईन खेळ व त्यातील फसवणूक यांची आणि त्याच्या फसवणुकीसाठी कशा पद्धती वापरल्या जातात याची माहिती देताना सजग व जागरुक ग्राहक बनण्याची व संघटन तयार करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
सावली येथील तहसील कार्यालय सभागृहात जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री किशोर मडावी नायब तहसीलदार सावली, हे अध्यक्षस्थानी होते तर जागृत ग्राहक राजा संघटनेचे मूल तालुका उपाध्यक्ष श्री अशोक मैदमवार साहेब, सचिव रमेश डांगरे व कार्यकारिणी सदस्य डॉ.आनंद कुळे व तुळशीराम वाढई अध्यक्ष राशन दुकानदार सावली, ज्योत्स्ना रामटेके पुरवठा निरीक्षक सावली हे व्यासपीठावर विराजमान होते.
यानिमित्ताने ग्राहक म्हणजे काय? ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६व सुधारीत कायदा २०१९मधिल तरतुदी , फसवणूक प्रकार,त्यावर उपाययोजना याबाबत विस्तृत मार्गदर्शन उपस्थितांनी केले. याशिवाय आजच्या कार्यक्रमात अनुपस्थित असलेले संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या भाषणाची विस्तृत माहिती असणारी ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवण्यात आली त्यामुळे या कार्यक्रमात राहिलेली त्यांची कमतरता व उणीवही भरून काढण्यात आली.
अतिथी म्हणून बोलताना राशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तुळशीराम वाढई यांनी ग्राहक जागृती कार्यक्रमाची आवश्यकता बोलून दाखविली आणि राशन दुकानदारांच्या समस्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला,व या कार्यक्रमाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून नायब तहसीलदार किशोर मडावी यांनी ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती देतांना ग्राहक जागृतीची आवश्यकता बोलून दाखविली तसेच ग्राहक आपल्या अधिकारांप्रती अनभिज्ञ असल्याचे आणि जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा गौरव करताना फसवणुकीच्या आँनलाईन प्रकारांना संघटनेच्या माध्यमातून आँनलाईन संदेश प्रसारित करण्याचा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,व ग्राहक गीत गायन व आभारप्रदर्शन सावली येथील पुरवठा निरीक्षक ज्योत्स्ना रामटेके यांनी केले .
आजच्या या कार्यक्रमासोबतच जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटना मूल, चंद्रपूर विदर्भ प्रांताचे वतीने १९फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करताना सुरू केलेल्या ग्राहक जागृती मासाची समाप्ती ही करण्यात आली.
या कार्यक्रमात जागृत ग्राहक राजा या संघटनेचे कार्यकर्ते तसेच राशन दुकानदार मंडळी, बचत गट सभासद, पुरुष व महिला, तसेच कर्मचारी वृंद व कार्यालयीन कामकाजासाठी आलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

Comments
Post a Comment