सहज सुचलं म्हणून...

 सहज सुचलं म्हणून...

पत्रकारितेतील नव्या पिढीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून न राहता अभ्यास करायला हवा.



पत्रकारिता किंवा वृत्तपत्रीय लेखन करायचे म्हणजे सर्वच विषयांचा जुजबी का होईना पण अभ्यास असणे गरजेचे असते. त्यातही प्रत्येक विषयाचे जुने संदर्भ कसे मिळतील याचे ज्ञानही गरजेचे आहे. त्यासाठी माहितीचे स्त्रोत विकसित करून बांधून ठेवावे लागतात. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान तुमच्याजवळ असेलच असे नाही. मात्र ती माहिती कुठे मिळेल आणि तिचा उपयोग योग्य अशा रीतीने आपल्या बातमीत किंवा लेखात कसा करता येईल याचे सम्यक ज्ञान त्या पत्रकाराला असायलाच हवे. त्यासाठी त्या पत्रकाराला नियमित वाचन आणि सर्वच विषयांचा जुजबी का होईना पण अभ्यास असावाच लागतो.


काही सन्माननीय अपवाद वगळले तर पत्रकारितेतील आजची पिढी असा अभ्यास करून योग्य ती माहिती ठेवत नाही असेच अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. अशावेळी नेमकी चुकीची माहिती समोर आली तर हसावे की रडावे हे देखील समजत नाही. मात्र ती माहिती अधिकृत आहे असे सांगणारे पत्रकार काहीसे हास्यास्पद ठरतात हे नक्की. 


झाले असे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे येत्या रविवारी वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० मार्च २०२५ रोजी नागपुरात येत आहेत. त्या दिवशी ते पंतप्रधान झाल्यावर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख कार्यालय असलेल्या रेशीमबाग संघ कार्यालयाला भेट देणार आहेत. इथेच संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी आहेत. मोदी हे पंतप्रधान झाल्यावर तब्बल १२ वर्षांनी प्रथमच रेशीमबाग परिसरात भेट देणार असून डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीवर आदरांजली व्यक्त करणार आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये मोदी नागपूरला रेशीमबाग परिसरात आले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. पंतप्रधान झाल्यावर ते प्रथमच रेशीमबाग संघ कार्यालयात येणार आहेत.


या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध वृत्तांमध्ये मोदींच्या या भेटीवर आधारित वृत्त प्रकाशित होत आहे. त्यात महाराष्ट्रातील एका प्रमुख दैनिकाने आतापर्यंत किमान दोनदा किंवा तीनदा आपल्या वृत्तात रेशीमबाग येथे येऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींना आदरांजली अर्पण करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत असा उल्लेख केल्याचे वाचण्यात आले आहे. 


माझ्या आठवणीप्रमाणे मोदी हे रेशीमबागला येऊन डॉ हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे पहिलेच पंतप्रधान नाहीत, तर ते दुसरे पंतप्रधान आहेत. या संदर्भात मी माझा संदर्भ चुकीचा तर नाही ना या शंकेने इतर चार जाणकार असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चाही केली. त्यानंतर मिळालेली माहिती मी वाचकांना उपलब्ध करून देणार आहे. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठी गैरराजकीय संघटना म्हणून ओळखली गेली आहे. येत्या विजयादशमीला म्हणजेच ऑक्टोबर २०२५ मध्ये ही संघटना १०० वर्षाची होत आहे. १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार या राष्ट्रभक्त तरुणाने या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर हळूहळू ही संघटना वाढत गेली. सुरुवातीला या संघटनेचे स्वरूप फक्त बाल आणि तरुणांनी दररोज एकत्र यायचे, काही खेळ खेळायचे, तरुणांना शक्य ते सैनिकी प्रशिक्षण द्यायचे आणि तरुणांमध्ये आणि बालांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करायची, इतकेच काम करणारी संघटना होती. हिचे कार्यक्षेत्र हे संघाचे मैदान इतकेच होते. 


हळूहळू मात्र या संघटनेची व्याप्ती वाढली आणि समाजातील सर्वच घटकांमध्ये संघाचे कार्यकर्ते पोहोचून तिथे त्यांनी आपले काम सुरू केले. मग राजकीय क्षेत्रात भारतीय जनसंघ म्हणजेच आजचा भारतीय जनता पक्ष हा कार्यरत झाला. कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, वनवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम, धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी जगतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तर साहित्य क्षेत्रात अखिल भारतीय साहित्य परिषद, सहकार क्षेत्रात सहकार भारती, संस्कृतच्या प्रचारासाठी संस्कृत भारती, आरोग्य सेवांमध्ये काम करण्यासाठी आरोग्य भारती, तर उद्योजकांना मदत करण्यासाठी लघु उद्योग भारती अशा समाजाच्या जवळ जवळ ४० क्षेत्रांमध्ये संघ विचारांच्या मंडळींच्या संघटना कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात राष्ट्रभक्त संघटित करण्याचे काम करत असतात.


संघातून तयार झालेल्याच स्वयंसेवकांनी १९५२ साली भारतीय जनसंघाची स्थापना केली. पुढे हा पक्ष १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाला. मात्र १९७९ साली जनता पक्षाचे तुकडे व्हायला सुरुवात झाली

तेव्हा १९८० च्या एप्रिल महिन्यात जुन्या जनसंघातील मंडळींनी एकत्र येऊन या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. हा पक्ष पुढे झपाटून वाढला.१९८४ साली या पक्षाचे लोकसभेत फक्त दोन खासदार होते. मात्र २०१४ पासून हा पक्ष केंद्रात आणि देशातील अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्तेवर आहे.


२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रथमच लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र त्यापूर्वीही १९९८ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला होता. ही सत्ता २००४ पर्यंत कायम राहिली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले होते. 


ऑगस्ट २००० मध्ये भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नागपुरात पार पडली होती. या बैठकीसाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे स्वतः काही काळ हजर होते. याच बैठकीच्या दरम्यान २७ ऑगस्ट २००० रोजी सकाळी वाजपेयी स्वतः रेशीमबागला पोहोचले होते. त्यावेळी संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉ. श्रीरामजी जोशी यांनी त्यांचे स्वागत केले होते, आणि त्यानंतर त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे दर्शन घेऊन आदरांजलीही अर्पण केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज यांच्यासह अन्यही काही ज्येष्ठ भाजप नेते उपस्थित होते. 


यानंतर वाजपेयी हे महाल परिसरातील संघ मुख्यालय असलेल्या डॉ. हेडगेवार भवनातही गेले होते. तिथे त्यांनी त्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या अनेक वयोवृद्ध संघ प्रचारकांची भेट देखील घेतली होती. संघ प्रचारक हे तरुण वयातच सर्वस्वाचा त्याग करून संघाला आपले जीवन वाहून देत असतात. त्यामुळे त्यांच्या वृद्धापकाळात संघच त्यांची देखभाल करत असतो. नागपूर मुख्यालयात असलेल्या अनेक ज्येष्ठ प्रचारकांमध्ये नारायणराव तरटे हे देखील होते. नारायणराव हे ग्वाल्हेरला प्रचारक असताना वाजपेयी ज्या शाखेत जात होते, तिथे शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे आणि वाजपेयींचे स्नेहपूर्ण संबंध होते. तिथे नारायणराव समोर दिसताच वाजपेयी आपली खुर्ची सोडून समोर जात "क्यों बापू कैसे हो?" अशी आपुलकीने चौकशी केली होती आणि काही वेळ सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांच्याशी संवादही साधला होता. वाजपेयी हे देखील राजकारणात येण्यापूर्वी काही काळ संघ प्रचारक होते. आपल्यातीलच एक संघ प्रचारक आज देशातील सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचला आहे, याचा आनंद आणि कृतकृत्यतेचे समाधान या सर्व वयोवृद्ध संघ प्रचारकांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी दिसून आले होते.


या सर्व बातम्या त्यावेळी दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले होत्या. अजूनही वृत्तपत्रांच्या कार्यालयात या बातम्यांच्या फाइल्स उपलब्ध आहेत. 


असे असले तरी आजची पिढी सबकुछ झटपट या मानसिकतेतून पुढे जाणारी आहे. त्यांना जे काही गुगलवर दिसेल तेच अंतिम सत्य असे वाटते. त्याही पुढे जाऊन आज ही तरुण मंडळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मागे लागणारी आहे. मात्र गुगलच्या किंवा  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढेही अजून काही ज्ञान उपलब्ध आहे, जुन्या पुस्तकांमध्ये खूप संदर्भ आहेत, इतकेच काय पण जुन्या अभ्यासकांजवळही खूप सारी माहिती आहे, हे ही नवी पिढी लक्षातच घेत नाही. लक्षात आले तरी झटपट बातमी देण्याच्या नादात ते नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे शोधण्याचे विसरून जातात, आणि मग असे चुकीचे संदर्भ देऊन बातम्या वाचकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात. 


प्रस्तुत वृत्तपत्रात दोन तीनदा तीच बातमी वाचल्यावर माझ्याही मनात शंकेची पाल  चुकचुकली. त्यामुळेच मी देखील जुने संदर्भ शोधले. काही माझ्यापेक्षाही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा देखील केली, आणि त्यातील माहिती वाचकांसमोर ठेवत आहे. त्याचबरोबर सहज सुचलं म्हणून नवीन पिढीला थोड्या कानपिचक्या देण्याचा माझा अधिकारही बजावून घेत आहे. 


अविनाश पाठक, नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.