सहज सुचलं म्हणून:- तारा भवाळकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे..

 सहज सुचलं म्हणून:-

तारा भवाळकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे..




दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या संत साहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर. संमेलनाध्यक्ष असलेल्या व्यक्तीची संमेलनात दोन भाषणे होतात, एक उद्घाटनाचे, तर एक समारोपाचे. त्यानुसार ताराबाईंचीही दोन भाषणे झाली. या भाषणांमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. मात्र आज मी त्यांनी मांडलेल्या आणि त्यातून मला रुचलेल्या काही मुद्द्यांवरच या लेखात परामर्श घेणार आहे. 

ताराबाईंनी सांगितले आहे की मराठी भाषा खऱ्या अर्थाने अभिजात व्हायची असेल तर मराठीतल्या बोलीभाषा समृद्ध व्हायला हव्यात.

 त्यानंतर त्यांनी असेही सांगितले आहे की दहावीपर्यंत शालेय शिक्षण मराठीतूनच व्हायला हवे. आज महाराष्ट्रात मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत आहेत. त्याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. याचबरोबर आजच्या प्रगतयुगात आपण साहित्य निर्मितीसाठी यंत्राची मदत घेतो ते मान्य. मात्र ही यंत्र मानवावर हावी व्हायला नकोत याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या सर्व मुद्द्यांवर मला जे सहज सुचले ते तुम्हाला सांगणार आहे. 



मराठी भाषा खऱ्या अर्थाने अभिजात व्हायची असेल तर मराठीतल्या सर्व बोलीभाषा या समृद्ध व्हायला हव्यात. आज मराठीची एक प्रमाणभाषा ठरवण्यात आली आहे. माझ्या माहितीप्रमाणे १९६३-६४ च्या दरम्यान ही प्रमाणभाषा ठरवण्यात आली. त्याचे नवे शुद्धलेखनाचे नियमही ठरवण्यात आले, आणि तेच सर्वत्र लागू केले गेले. ही भाषा बोलणारी मोजकीच मंडळी तीही पुण्यातली होती. त्याच भाषेचा प्रभाव मुंबईवरही होता. तसाच पश्चिम महाराष्ट्रातही होता. त्यामुळे ती प्रमाणभाषा वृत्तपत्रीय जगतात साहित्यात आणि शैक्षणिक क्षेत्रात लागू झाली, आणि बोलीभाषा हा या मूठभर मंडळींचा थट्टेचा विषय बनला. महाराष्ट्रातच बघितले तर एका टोकाला असलेल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागात वेगळी भाषा बोलली जाते, तर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या भागातली वऱ्हाडी भाषा ही देखील तिथली प्रचलित भाषा म्हणून वापरली जाते. थोडे पुढे गेले तर खानदेशात अहिराणी भाषा बोलली जाते. पुढे पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा बाज वेगळाच आहे. तर कोकणची भाषा कोकणी म्हणून आपले वेगळेच सौंदर्य जपून आहे. सीमावर्ती भागातल्या भाषेला एक वेगळाच लहेजा आहे. तिच्यावर थोडी थोडी कानडीची झाक असल्याचे जाणवते, तर दुसऱ्या टोकाला चंद्रपूर गडचिरोली तेलंगणातील तेलगू भाषेचा प्रभाव मराठी वर जाणवतो आणि भंडारा गोंदिया छत्तीसगढी हिंदीचा प्रभाव मराठीवर जाणवतो. या प्रत्येक भागांमध्ये आपापली बोलीभाषा बोलणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र प्रमाण भाषा बोलणारी मुठभर मंडळी या बोलीभाषांचे सौंदर्य पुढे येऊ देत नाहीत.

आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीच्या दिवसात प्रकाशन व्यवसाय हा मुंबई पुण्याकडे जास्त वाढला. त्यामुळे प्रकाशित होणाऱ्या साहित्यावरही या पुणेरी भाषेचाच प्रभाव जाणवला. तोच प्रकार चित्रपट निर्मितीत आणि आता दूरदर्शनच्या मालिका निर्मितीतही वारंवार जाणवतो. विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात हिंदीचा प्रभाव जास्त आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा भाग पूर्वी जुन्या सी पी अँड बेरार मध्ये होता. त्यामुळे हिंदी भाषिक इथे जास्त होते. आपण मराठीत कुठे जातोयस? असं विचारतो हिंदीत मात्र  कहां जा रहा है? असे विचारतात. त्यामुळे या भागातही कुठे जाऊन राहिलास? असे विचारले जात होते. तर राहिला या शब्दाचा वापर आजही जास्त होतो. मात्र मुंबई पुण्याचे लोक या राहिला या प्रकाराची टिंगल करतात. मला आठवते एकदा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मी गेलो असताना तिथे प्रसिद्ध मराठी गायिका असलेल्या व्यक्तीचीभेट झाली. माझ्यासोबतच्या त्यांना ओळखणा-या मित्राने माझी ओळख करून देत हे नागपूरहून आले आहेत असे सांगितले. तेव्हा टिंगल केल्याच्या सुरात त्या गायिकैने मला विचारले, "मग तुम्ही नागपूरला केव्हा जाऊन राहिलात?" त्यांचा तो खोचक स्वर मला लगेच जाणवला. असाच खोचक स्वर फक्त काही मंडळी बोलतात असे नाहीत, तर चित्रपट किंवा मालिकांमध्ये वैदर्भीय माणूस दाखवायचा असला की त्याच्या तोंडी राहिला हा शब्द घालून दिला की झाले. बाकी त्या वऱ्हाडी भाषेचे बोलीचे सौंदर्य त्या संवादात कुठेही जाणवत नाही. याबाबत एकदा नागपुरात एका पत्रपरिषदेत मी झी टीव्हीवरील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादही घातला होता. 

नेमका हाच मुद्दा ताराबाईंना अभिप्रेत असावा असे मला वाटते. महाराष्ट्रात ज्या विभिन्न बोलीभाषा आहेत, ज्याची सुरुवात अगदी प्राकृत पासून झाली आहे, त्या सर्व बोलीभाषा जपल्या गेल्या पाहिजेत. या बोलीभाषांमध्ये विपुल साहित्य निर्माण व्हायला हवे, आणि त्याचा सर्वत्र योग्य मार्गाने उपयोग व्हायला हवे. तरच मराठी भाषेचे अभिजात पण खऱ्या अर्थाने जपले जाणार आहे.

महाराष्ट्रात दहावीपर्यंत शालेय शिक्षण मराठीतूनच व्हायला हवे असा आग्रह देखील ताराबाईंनी धरला आहे. त्यांचा हा आग्रह निश्चितच स्वागतार्ह आहे. आजच एका वृत्तवाहिनीवरील बातम्या पाहताना महाराष्ट्रातील १७५०० मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, कारण तिथे विद्यार्थीच नाहीत, अशी बातमी आली आहे. महाराष्ट्रात ही बाब निश्चितच चिंतनिय आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. आज उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूस आपल्या मुलांना अगदी नर्सरी पासून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकतो. आता कनिष्ठ मध्यमवर्गीय काय, पण गरीब माणूस सुद्धा मुलांना सुरुवातीपासून इंग्रजीत शिक्षण द्यायला लागला आहे. मुळात मराठी ही आपली मातृभाषा आहे. मुलांना मातृभाषेचे व्यवस्थित ज्ञान असायला हवे. मात्र आज आमचे मूल बोबडे बोलू लागते, तेव्हापासूनच आम्ही त्याला इंग्रजी शब्द शिकवतो. त्याच्याशी आम्हाला येत नसतांनाही इंग्रजीतच बोलू बघतो. मग त्याला मातृभाषेबद्दल प्रेम कसे वाटणार? मला आठवते २००२ या वर्षी तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी अकरावी बारावीत मराठीला माहिती तंत्रज्ञान हा पर्याय देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विधिमंडळात जबरदस्त विरोध झाला. त्यावेळी मी विधान परिषदेत वृत्तसंकलन करीत असे. नागपूर अधिवेशनात विधान परिषदेत या मुद्द्यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कामकाज रोखून धरले होते. मग सभापती ना.स. फरांदे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा घेतली. ही चर्चा चालू असतानाच काही पत्रकार आणि काही आमदार असे कॅन्टीनमध्ये चहा घेता घेता चर्चा करीत होतो. त्यावेळी काँग्रेसचे सदस्य आणि ख्यातनाम साहित्यिक रामदास फुटाणे यांनी एक भीती व्यक्त केली होती. रामदासजी म्हणाले की आज लिहिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यामध्ये मध्यम वर्गाचे चित्रण असते. प्रसंगी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाचेही चित्रणही असते. मात्र अजून २५ वर्षांनी लिहिल्या जाणाऱ्या साहित्यात कदाचित फक्त ग्रामीण आणि तळागाळातल्या कुटुंबांचेच चित्र दिसेल. कारण त्यावेळी जे मराठी लेखक पुढे येतील ते सर्व तळागाळातल्या कुटुंबातूनच आलेलेअसतील. ते मध्यम वर्गातून राहणार नाहीत. कारण मध्यम वर्गातील सर्व मुलं इंग्रजी शाळेतूनच शिकलेली असतील. त्यांचा मराठीशी काहीही संबंध नसेल. रामदासजींचे हे म्हणणे आम्हा सर्वांनाच अंतर्मुख करून गेले होते. 

आज तीच नेमकी परिस्थिती आहे. मी स्वतः मराठी पत्रकार आहे, लेखकही आहे. माझी आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यासाठी विविध पुरस्कारही मिळाले आहेत. १५ वे पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.मात्र माझ्या एकुलत्या एक मुलीने माझे एकही पुस्तक वाचलेले नाही. कारण तिला मराठी पुस्तके वाचणे फारसे आवडत नाही. ती लहान असताना तिच्यासाठी मी श्यामची आई. फास्टर फेणे अशी पुस्तके विकत आणली होती. मात्र तिने ती कितपत वाचली याबाबत मी साशंक आहे. तिचे अगदी पहिलीपासून शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाले. तिला हॅरी पॉटर आवडणार .त्याला तिचा तरी काय दोष? हीच परिस्थिती आज सर्व कुटुंबांमध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम मराठी वक्ते आहेत. मात्र त्यांची कन्या दिवीजा हिला कितपत मराठी येते याबाबत इतर कोणी नाही तर खुद्द तिची आजी म्हणजेच सरिता वहिनी फडणवीस याच साशंक आहेत. मला आठवते एका वृत्तपत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मला काही मुलाखती घ्यायच्या होत्या. त्यासाठी मी सरिता वहिनीमार्फत अमृता फडणवीस आणि दिविजाचा वेळ घेतला. फोनवरच दोघींचीही मुलाखत घेतली. दिविजाची मुलाखत घेतली हे सरिता वहिनींना सांगितल्यावर त्यांनी मला पटकन प्रश्न विचारला दिविजा तुझ्याशी मराठीत बोलली का? यावरूनच वास्तव स्पष्ट होते. त्याला दिविजाचाही दोष नाही. ती लहानपणापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकली आहे. त्यामुळे मराठीचा तिचा दूरचा संबंध राहणार. 

हे सर्व मुद्दे लक्षात घेत शालेय शिक्षण मातृभाषेत म्हणजे मराठीतच व्हायला हवे. आज इंग्रजीचे सर्वत्र वेड आहे. मात्र दहावीपर्यंत मातृभाषेत शिकूनही पुढे इंग्रजीत अभ्यास करता येतो. अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. त्यामुळे ताराबाईंचा मुद्दा लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने खरोखरीच दहावीपर्यंत मराठीतच शिक्षण द्यायला हवे. इतकेच काय तर सीबीएसई 

शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करायला हवी. हेच या प्रश्नावर खरे उत्तर आहे. 

आज आम्हाला लेखन करायचे तर अगदी हाताच्या बोटावर म्हणजे  क्लिकवर माहितीचे स्त्रोत उपलब्ध आहेत. गुगलवर क्लिक केले की माहितीचे भंडार उपलब्ध होते. मात्र त्यामुळे आमची अभ्यासाची सवय गेली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता करायची किंवा साहित्य निर्मिती करायची तर संदर्भ आवश्यक असतात. त्यासाठी विपुल वाचन असायला हवे. वाचलेले लक्षातही ठेवायला हवे. आज सर्व काही गुगलवर मिळते म्हणून आमची वाचनाची सवय गेली आहे. मात्र गुगलवर जे मिळते ते अंतिम नसते. कित्येकदा गुगलवर नेमकी माहिती मिळतेच असे नाही. मिळाली तरी त्यातून त्याच्या सत्यासत्यतेबद्दल शंका निर्माण केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आम्ही साहित्य निर्माण करणार आहोत का? आणि ते साहित्य ज्ञानेश्वर, रामदास तुकाराम किंवा अगदी कालचे फडके, खांडेकर किंवा शिरवाडकर यांनी निर्माण केलेल्या साहित्याच्या तोडीचे असेल काय? याचा आम्ही विचार करायला हवा. मात्र आजची तरुण पिढी सर्वकाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आम्हाला उपलब्ध होणार आहे म्हणून मूळ अभ्यासापासून दूर जाते आहे. हा धोका देखील ताराबाईंनी लक्षात आणून दिला आहे. आणि यंत्रे आमच्यासाठी आहेत, मात्र त्यांना आमच्यावर हावी होऊ द्यायचे का याचाही विचार करायला हवा, याबद्दल त्यांनी आम्हा सर्वांनाच जागृत केले आहे. 

ताराबाईंच्या भाषणात अनेक विचार करण्याजोगे मुद्दे आहेत. मात्र आज मला या तीन मुद्द्यांवरच लिहावे असे सहज सुचले, म्हणूनच आपल्यासमोर हे मुद्दे मांडले आहेत. आपल्याला ते रुचतील आणि पचतील अशी आशा आहे. 


अविनाश पाठक

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

  1. अतिशय सुंदर लेख, लेखात सुचविलेल्या बाबी अंमलात येणे काळाची गरज आहे.माझी माय मराठी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.