स्वयंसिद्ध लेखमाला:-३ महिलांची उंच भरारी तरीही तिची व्यथा न्यारी
स्वयंसिद्ध लेखमाला:-३
महिलांची उंच भरारी तरीही तिची व्यथा न्यारी
डॉ. अनिता द. वाळके
प्राचार्या, कर्मवीर महाविद्यालय, मूल.
८ मार्च जागतिक महिला दिवस, महिलांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक कार्याचा सन्मान, गौरव करणारा हा सण ! या दिवशी महिलांच्या प्रगतीचे, तिच्या धाडसाचे, शौर्याचे, पराक्रमाचे, दृढ निश्चयाचे, सहनशिलतेचे, खंबिरतेचे व प्रेमाचे कौतूक करावे तितके कमीच.
मला आठवली ती घटना १९०८ सालची ज्यात १५ हजार महिलांनी मतदानाचा अधिकार, चांगला पगार व कामाचे कमी तास अशा मागण्यासाठी न्युयॉर्कच्या रस्त्यावर मोर्चा काढला. सोबतच रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुध्दाला विरोध केला. ब्रेड आणि पीस यासाठी रशियन महिलांनी १९१७ मध्ये आंदोलन केले. युरोपमध्येही महिलांनी ८ मार्च रोजी शांतीचे समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती. याच विविध कारणांमुळे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली व त्यानंतर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्राने या दिवसाला मान्यता दिली . आज आपण सर्व क्षेत्रात महिलाची उंच भरारी सतत अनुभवतोय.
आपल्या देशाचा इतिहास बघता वैदिक काळ सोडला तर १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत सुध्दा स्त्रीयांना दुय्यम दर्जा दिला जात होता. “चूल आणि मूल” इतकेच तिचे कार्यक्षेत्र होते. केवळ उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे सर्व बघत "न स्त्री स्वातंत्र्य अर्हति” म्हणजेच स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही हे मनुस्मृतीतील विधान होते. बालपणी वडीलांनी, तारुण्यात पतीने व वृध्दापकाळात पुत्रांनी तिचे संरक्षण करावे, असे स्त्री संदर्भात मांडलेले भारतीय धर्मशास्त्र.
अनेक वाईट रुढी, प्रथा परंपरेची बंधने तिच्यावर लादली गेली होती. बालविवाह, केशवपन, सतीप्रथा ह्या जिवघेण्या प्रथा ती मुकाट्याने सहन करीत होती. मात्र १९ व्या शतकात अनेक स्त्रीवादी चळवळीचे कार्य सुरु झाले.
अनेक समाजसुधारकांनी स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात महात्मा फुले भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून स्त्री शिक्षणाची चळवळ सुरु केली . समाजाचा प्रखर विरोध होत असतांना अनेक अडचणीवर मात करुन फुले दांपत्याने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात रोवला. मूलगी शिकली प्रगती झाली विचार सरणी घराघरात रुजायला सुरुवात झाली.
संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे,
“नारी बिना संचार, अधूरा है सारकबीरा नाही पूजिए, जगत का आधार !
स्त्रियांशिवाय संसार अपूर्ण असतो, स्त्रीयांचा सन्मान केला पाहिजे कारण त्या जगाचा आधार आहे.असे संत कबिराने आपल्या दोह्यातून सांगून समाजातील स्त्रीची भूमिका मांडली. आई ही पहिली गुरु असते. आपल्या मुलांची ती पहिली शिक्षिका असते. म्हणूनच देशाचा उत्तम नागरिक घडविण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने प्रत्येक स्त्रीवर असते. मुलांना चांगल्या- वाईटाचे ज्ञान ती करुन देते. पुरुष शिक्षित झाला तर केवळ एका व्यक्तीपर्यंतच पोहोचू शकतो पण महिला शिक्षित झाली तर संपूर्ण देशापर्यंत पोहचू शकते.म्हणूनच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळणे अत्यंत आवश्यक होते. कारण स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगिण विकासाचे साधन फक्त शिक्षणात होते. शिवाय कोणत्याही समाजाच्या समृध्दीचा आणि प्रगतीचा मापदंड स्त्रियांच्या परिस्थितीवरुन ठरतो .याची जाणिव समाजात व्हायला लागली होती.
स्त्रीच्या इज्जतीची लक्तरे करणारी ही पूरुषी समाजव्यवस्था फार विकृत होत चालली आहे. घरी आणि घराबाहेर कुठेही आज स्त्री सुरक्षित नाही, तिला मोकळा श्वास घेता येत नाही. सतत घडणाऱ्या बलात्काराच्या घटना अंगावर काटा आणतात. ह्यातर केवळ मोजक्या घटना आपण लक्षात घेतल्या तरी निर्भया घडून फार काळ लोटला नाही तर हैद्राबाद येथील घटना, कलकत्ता येथील डॉक्टर मूलीसोबत झालेला तो किळसवाणा प्रकार, पुणे स्वारगेटमध्ये शिवशाही बस मधील घटना, रिसोड मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ह्या साऱ्या घटना थक्क करणाऱ्या आहेत. १ मार्च २०२५ च्या देशोन्नती मधील पुण्यातील बलात्काराच्या घटनेची आकडेवारी सुध्दा थक्क करणारी आहेत. २०२३ मध्ये ४१० बलात्कार ७३८ विनयभंग, २०२४ मध्ये ५०५ बलात्कार ८६६ विनयभंग, २०२५ मध्ये ५६ बलात्कार १२५ विनयभंग, आहे. यातील काही घटना प्रसार माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचल्यात पण अशा अनेक घटना घडत असतांना सुध्दा कुणाच्या तरी दबावामुळे त्या उघडकीस येत नाही. असे किती दिवस चालायचे खर तर निर्भया प्रकरणानंतर कायद्याची अंमलबजावणी कठोर व्हायला हवी होती. पण तसे होत नाही. जन्माला आल्यावर एखादे छोटेसे स्वप्न ऊरात घेऊन त्या दिशेने पाऊले टाकणारी ही कन्या, महिला पण तिची वाट सुरक्षित नाही, ती स्वतः सुरक्षित नाही. मनात भितीचे सावट घेऊन ती जगते, ही तिची व्यथा आपण कधी समजणार ?
“मिळविले बळ मी पंखात माझ्या,
शोधू द्या मलाही उंच भरारीच्या दिशा”
तसेच कोणत्याही देशाचा संपूर्ण विकास होण्यासाठी तेथिल महिला शिक्षित असणे आवश्यक आहे. महिला साक्षरतेच्या अभावामुळे देश कमकुवत होतो. या संदर्भात सखोल चिंतन व अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि म्हणूनच सावित्रीबाई व ज्योतिबांच्या कार्याचा रथ पुढे नेतांना स्त्रीच्या विकासाला संपूर्ण पाठबळ देणारे कवच घटनेतील तत्त्वाच्या रुपाने स्त्रीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यांनी महिला शिक्षणाचा, नोकरी करण्याचा घटस्फोट घेण्याचा, संपत्तीचा, पूनर्विवाहाचा असे महत्त्वपूर्ण हक्क हिंदू कोड बिलातून दिल्यामुळे स्त्रीयांच्या पंखाना बळ मिळाले. म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात स्व बळावर उंच झेप घेणाऱ्या स्त्रियांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कायद्याच्या पाठबळामुळेच आधुनिक स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे. घर, कुटुंब, समाज, देश कुठलिही जबाबदारी तिला कठिण नाही. कुटुंबाचे व्यवस्थापन करता करता ती मोठ्या मोठ्या उद्योगांचे व्यवस्थापन अगदी उत्तमरीत्या करीत आहे. त्यामुळेच स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल वेगात सुरु आहे. मात्र समाजात वेगवेगळ्या हुद्यावर स्त्रीने स्वत:ची ओळख जरी निर्माण केली असली तरी तिची व्यथा न्यारी आहे.
ज्या देशात लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, रेणुका, जगदंबा, कालेश्वरी, महालक्ष्मी, महांकाली, अशी उपमा स्त्रीयांना दिली जाते, मग त्या देशात स्त्रीयांवर होणा-या बलात्कार, विनयभंग, अन्याय, अत्याचार याला थाराच नसावा. मात्र चित्र फार उलट आहे. कायद्याचे इतके मजबुत पाठबळ दिले असतांना सुध्दा स्त्री अत्याचाऱ्याचा घटना सतत घडत आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या स्त्रीला आजही एखाद्या घरात पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही . तिच्या आवडी निवडीला आजही दुय्यम स्थान आहे. आजही वंशाचा दिवा म्हणून मूलगाच हवा असे विचार करणारी कुटुंबे समाजात आहे. ह्या तर फार छोट्या छोट्या घटना आहेत . पण बलात्कार व विनयभंगासारखे किळसवाने प्रकार मात्र अतिशय घृणास्पद आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment