कृषी महाविद्यालय मूल शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सत्तावीसावी बैठक संपन्न
कृषी महाविद्यालय मूल
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सत्तावीसावी बैठक संपन्न
मूल २५: दीपक देशपांडे.
कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *सत्तावीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी ग्राम *मोरवाही* ता. मूल जि. चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या प्रसंगी मोरवाही येथील सरपंच सौ. अनुराधा नेवारे, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *“उन्हाळी धान व भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन”* या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाच्या कृषिविद्या विषयतज्ञ *प्रा. मोहिनी पुनसे* यांनी उन्हाळी धान व मका पिकांच्या व्यवस्थापानाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी धान पिकाचे धसकटे जाळून न टाकता त्याला कुजवावे त्यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते असे याप्रसंगी सांगितले आणि शेंद्रिय पदार्थाचे महत्त्व पटवून दिले. उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे व त्याच्या आलेल्या अहवालानुसार खताची मात्रा दयावी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
उद्यानविद्या विषयतज्ञ *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी उन्हाळी भाजीपाला पिके वांगी आणि टमाटरच्या व्यवस्थापनाबाबत बाबत सविस्तर महिती दिली. तसेच सापळा पिकाचे कीड नियंत्रणाकरिता होणारे फायदे व उन्हाळ्यामध्ये पिकांसाठी आच्छादनाचे होनारे महत्व पटवून सांगितले.
*डॉ. गितांशु डिंकवार* , वनस्पतीरोग विषयतज्ञ, उन्हाळी धान पिकांवरील करपा, कडा-करपा, आभासमय काजळी व भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या फोमोप्सीस ब्लाईट, पर्णगुच्छ, मर रोग आणि कुज यारोगांची लक्षणे तसेच उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक बुरशीनाशकांऐवजी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर करण्यास सांगितले.
*श्री. भूषण ठाकरे* , कीटकशास्त्र विषयतज्ञ, यांनी उन्हाळी धान पिकामधील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, गादमाशी, तुडतुडे व भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या फळे पोखरणारी अळी, रसशोषन करणाऱ्या किडीबाबतची माहिती दिली तसेच कामगंध सापळे, चिकट सापळे, ट्रायकार्ड, बिवेरीया, मेटारीझियम या जैविक कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
*प्रा. मनीषा लवणकर* शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केलेल्या विविध ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमास एकुण *२६ शेतकरी व ०५ शास्त्रज्ञ* उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार प्रा. मनीषा लवणकर यांनी मानले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

Comments
Post a Comment