स्वयंसिद्ध लेखमाला:-२ स्त्री..कोण होतीस तू काय झालीस तू..?

स्वयंसिद्ध लेखमाला:-२



 स्त्री..कोण होतीस तू काय झालीस तू..?

                                       बुद्धी , शक्ती आणि सौंदर्य यांचा संगम असलेली देवाची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे स्त्री. निसर्गानं बहाल केलेली सृजनशीलता हे तिचं शक्तीस्थळ.  सौंदर्य , मग ते काळं-गोरं , लठ्ठ- रोड , उंच - ठेंगण कसही असो एकदा का तिने ते स्वीकारलं की झालं तिच्यासारखी सुंदरा तीच. बुद्धी -शक्ती हे तर तिचे दोन्ही कर आहेत.             

                     स्त्री...अगदी शुद्ध सोनं म्हणूनच तिचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अनेक कसोटीवर  पडताळणी केल्या जाते.काळ आला काळ गेला , तिची परीक्षा घेणं मात्र कायम सुरूच आहे...स्वरूप थोडंफार बदललं बाकी तेच..उत्तीर्ण होण्यासाठी चा दबाव सामाजिक , कौटुंबिक तोही आहेच .त्याची तीव्रता आताशा जरा कमी झालीय , किंबहुना ती झळ तिला आता फारशी विचलित करीत नाही असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. असो , 

                      आजचा आपला विषय *कोण होतीस तू काय झालीस तू...?* या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेत जरा मागे वळून बघितलं तर मी पार  शतकांच्या मागे गेले  . जेव्हा गार्गी , मैत्रेयी , अपाला , लोपामुद्रा  ब्रम्हसभेत , राजसभेत विद्वजनांसोबत विविध धार्मिक , तात्विक बाबींवर  तर्कशुद्ध चर्चा करायच्या एवढंच काय वेदनिर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे . म्हणजे त्या काळी ती स्वयंपूर्ण , स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणल्या जायची. तिला शास्त्रोक्त शिक्षण , युद्धविद्येत पारंगत होण्याचा अधिकार होता. काळ पुढे सरकत गेला. परिवर्तन होत गेलं .*परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे* हे कित्येक वेळा ऐकून - बोलून पाठ झालंय पण ते परिवर्तन नेहमी सकारात्मक च असतं का ? कदाचित नाहीच..!  आपल्या संस्कृतीला ढवळुन टाकणारे आक्रमण झाले आणि मग  स्त्री सुरक्षा  राखण्यासाठी  बंधनं लादल्या गेली . तिनी फक्त श्वास घ्यावा आणि जिवंत असल्याचा पुरावा देत राहावं इतकं तिला पुरुषी समाजव्यवस्थेनी कोंडून टाकलं. स्त्री कोमल आहे , अबला आहे हा कोलाहल इतका वाढला की त्यात स्त्रीच्या मनातून येणारा असा तिचा आवाज फुटेनासा झाला आणि मग काय तीही त्या काव्यामध्ये गुरफटली .आरशातील तिचं प्रतिबिंब सुद्धा तिचं राहिलं नाही इतकी ती पुरुषप्रधान संस्कृतीत गुंतली. अंगणातली सुबक रांगोळी आणि चुलीवरचा चविष्ट स्वयंपाक हेच तिचं कार्यक्षेत्र झालं. तिच्या पावलांचा हळुवार आवाज , बांगड्यांची किणकिण यावरून तिच्या सोज्वळ असण्याची परीक्षा व्हायला लागली. कुठल्याही आर्थिक , सामाजिक , धार्मिक कार्यात तिच्या सहभागाच्या मर्यादा ठरलेल्या होत्या . मग काय करावं त्या अदम्य ऊर्जास्त्रोत असलेल्या अग्निकुंडानी..? ती तिच्या  वाटेला आलेल्या कामांमध्ये संशोधन करत गेली . स्वयंपाकातील वेगवेगळे पदार्थ , इतर कलाकुसर ही त्याचीच तर देणं आहे. कदाचित आजच्या हुशार , निपुण स्त्रीची जनुकीय जडणघडण तिथेच झाली असावी. मोठ्ठा गोतावळा , सगळी कष्टाची कामे , सततची बाळंतपणं कसं सांभाळलं असेल तिने ..! अशा या प्रतिकूल काळात  ज्या स्त्रियांनी प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिंमत केली त्या खरंच पूजनीय आहेत . आजच्या आधुनिक स्त्रीसाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणजे मजबूत पाया आहे त्यावर च आजची स्त्री मुक्तपणे वावरू शकतेय. स्त्रीमुक्तीची ठिणगी तेव्हाच पडली याच काळात पडली. 

                                           हा नवा काळ तिच्यासाठी खूप उमेद , आशा , आकांशा घेऊन आला . ती हरखली , हर्षोल्लासित झाली . पण पुढे काय वाढून  ठेवलंय याची तिला कल्पना आली नाही किंवा तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. सबला या गोंडस जरतारी झुलिखाली ती सापडली. घरदार , नोकरी , मुलं , तिच्या आवडीनिवडी या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ती करू लागली. हो , ती आहे स्वयंसिद्धा , चपळ , हुशार पण त्यासाठी आपली मानसिक ,शारीरिक अवस्था सुदृढ असणे गरजेचे आहे हे तिच्या पार विस्मृतीत गेलं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःलाच विसरली . याही काळात अपवाद होतेच .त्यामुळे या नवयुगात कित्येक स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व बहरून आले , त्यांचे देशाच्या प्रगतीत योगदान लाभले कधी राजकारणी म्हणून कधी वैज्ञानिक म्हणून तर कधी समाजसेवक तर कधी तत्वज्ञा म्हणून.. आणि एक सुविद्य आई व गृहिणी म्हणून ..!     काळ  पुन्हा पुढे चालू लागला . स्त्री ही निघाली नवोन्मेषात ..मात्र या युगात पोहचे तो जरा घाईच झाली आणि स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील पुसटशी सीमारेषा तिला कळलीच नाही. आज तिला अधिकारांची , शक्तीची , ऊर्जेची जाणीव आहे . सर्व क्षेत्र पादाक्रांत करत तिची घोडदौड चालू आहे . तिचं स्वत:वरही बारीक लक्ष आहे . फक्त काही ठिकाणी तिची गल्लत होतेय हे नक्की. काही क्षेत्रात सवंग प्रसिद्धीसाठी तिनं याच स्त्रीत्वाचा बाजार मांडलाय. पोटासाठी शरीर विक्रय करणे मी समजू शकते आणि ते करतांना त्या स्पष्ट सांगतातही ,पण कलाविष्कार या उदात्त नावाखाली चालणारा हा स्त्री स्वैराचार पटेनासा आहे . मी निव्वळ शारीरिक संदर्भात बोलतेय असं नव्हे तर वैचारिक बाबतीतही हे खेदाने म्हणावे लागतेय.  जे नियम सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी आवश्यक आहेत ते पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सुद्धा लागू होतात . तिची आर्थिक , सामाजिक , शारीरिक प्रगती होतेच आहे . फक्त आता प्रगतीचा मापदंड म्हणजे पुरुष असा असू नये .तिनं स्वतःचं अवलोकन करावं. आता ती बोलू शकते कायद्याने तिला कित्येक हक्क बहाल केले आहेत ते तिने समजून घ्यावे. म्हणजे स्त्रीची सामाजिक स्थिती खूप वरच्या स्थानावर आहे .आज रेशनकार्डावर कुटुंबप्रमुख म्हणून ती विराजमान आहे . 

                         *जसा गार्गी - मैत्रेयीचा काळ होता , स्त्री असण्याला एक आब होता तो या काळात पुन्हा निर्माण व्हावा हीच शुभकामना...! कोण होतीस तू काय झालीस तू..? या प्रश्नाचं अत्यंत सकारात्मक उत्तर हेच की कालही स्वयंसिद्धा होती , आजही आहे आणि अर्थातच उद्याही ती स्वयंसिद्धाच असणार...मला अभिमान आहे माझ्या स्त्री असण्याचा.. एक मुलगी , बहीण , पत्नी , आई असण्याचा..!!!!*  

सोनालीसोपान. ✍️ चंद्रपूर.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.