सहज सुचलं म्हणून , निमित्त जागतिक महिला दिनाचे...
सहज सुचलं म्हणून ,
निमित्त जागतिक महिला दिनाचे...
आज ८ मार्च २०२५, आजचा दिवस हा जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. *या निमित्ताने समस्त महिला आणि भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*
भारतापुरते बोलायचे झाल्यास महिला सक्षमीकरणाला सुरुवात होऊन एक शतकाहून अधिक काळ लोटलेला आहे. परिणामी आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असलेल्या दिसत आहेत. गत शतकातच देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय पद असलेल्या पंतप्रधानपदी तब्बल १५ वर्ष एक महिलाच विराजमान होती, आणि या महिलेने म्हणजेच कै. इंदिरा गांधींनी आपण किती सक्षम आहोत, इतकेच काय पण आपण पोलादी महिला आहोत हे फक्त भारतालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले होते.
देशाचे सर्वोच्च संवैधानिक पद असलेल्या राष्ट्रपतीपदावरही २००७ते २०१२ या कालखंडात प्रतिभा पाटील या राष्ट्रपती म्हणून कार्यरत राहिल्या होत्या. आताही २०२२पासून द्रौपदी मुरमु या महिलाच राष्ट्रपतीपदावर विराजमान आहेत. याशिवाय लोकसभा सभापती, विरोधी पक्षनेता, विविध राज्यांच्या मुख्यमंत्री, या पदावरही अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. देशाच्या अर्थमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, अशा विविध महत्त्वाच्या पदांवरही महिला कार्यरत राहिल्या असून तिथेही त्यांनी "हम कामयाब है" हे सिद्ध केलेले आहे.
फक्त राजकारणातच नव्हे, तर प्रशासनातही महिला कुठेही मागे नाहीत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास सध्या राज्याचे सर्वोच्च प्रशासकीय पद असलेल्या मुख्य सचिव पदावर सुजाता सैनिक या महिलाच कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून महिलांनी आपली कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. तर आय ए एस सोबत आय पी एस, आय एफ एस, आय आर एस या सर्वच स्तरात महिलांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
फक्त प्रशासनातच नव्हे तर उद्योग व्यवसायातही महिला सक्षम आहेत. याचे एक ताबडतोब नजरेसमोर येणारे उदाहरण सुधा मूर्ती यांचे देता येईल. विविध बॅंका, वित्तीय संस्था यांचे नेतृत्व देखील महिलांनी सक्षमपणे केले आहे. इतरही अनेक उदाहरणे आहेत. राजकारण, प्रशासन, उद्योग, व्यवसाय या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करत महिला सुद्धा बावनकशी सोने आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. आज महिला ऑटो रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, रेल्वेचे इंजिन, विमान, ट्रक, बस, रिक्षा अशी सर्वच वाहने चालवतात. पोलीस, लष्कर, वायुदल, नौदल अशा सर्वच क्षेत्रात महिला लिलया संचार करताना दिसत आहेत.
त्याचवेळी महिलांवर दररोज अत्याचार होत असल्याच्या बातम्या देखील आमच्या कानावर येत आहेत. गेल्या आठवड्यातच एका नराधमाने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीला रिकाम्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कानावर आलेली आहेच. तर रोजचे वृत्तपत्र उघडले की कुठेतरी किमान दोन ते चार ठिकाणी असे महिलांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत.
आज एकेविसाव्या शतकात स्त्री आणि पुरुष समानतेचे युग असल्याचे आम्ही सांगत असतानाच अजूनही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते आहे.कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तोंड वाकडे केले जाते. लगेचच दुसरा चान्स घेतला जातो. त्यावेळीही मुलगीच जन्माला आली तर कित्येकदा अशा मातेला घराबाहेर देखील काढले जाते. महिलांना अनेक ठिकाणी भोगदासीसारखे वागवले जाते. प्रशासनात नियुक्ती किंवा पदोन्नती देताना अनेकदा महिलांना डावलले जाते. मला आठवते गत पंचवीस वर्षात महाराष्ट्रातच किमान तीनदा तरी प्रशासनातील महिला सनदी अधिकारी या मुख्यसचिव पदासाठी लायक होत्या. मात्र त्या त्या वेळच्या राजकारण्यांनी त्यांना संधी नाकारली. असे का व्हावे? एकीकडे आम्ही प्रगत समाजाच्या गोष्टी करतो.त्याचवेळी आम्ही महिलांवर असा अन्याय करतो. त्यांचा आवाज दाबतो. त्यांना संधी नाकारतो. त्यांचे जास्तीत जास्त खच्चीकरण कसे करता येईल याचाच विचार करतो. हे कितपत योग्य म्हणता येईल?
परमेश्वराने सृष्टीचे निर्माण करताना नर आणि मादी असे दोन मानवी जीव निर्माण केले. दोघांमध्येही काही गुण तर काही दोष ठेवलेच. स्त्री ही निसर्गतःच शारीरिक दृष्ट्या पुरुषाच्या तुलनेत काहीशी कमजोर अशी ठेवलेली आहे. मात्र बौद्धिक दृष्ट्या स्त्री कुठेही कमजोर ठेवलेली नाही. असे असले तरी तिच्या शारीरिक कमजोरीच्या जोरावर तिला मधल्या काळात पूर्णतः दाबून ठेवले गेले हे वास्तव नाकारता येत नाही. असे असले तरीही प्रत्येक युगात त्या त्या परिस्थितीला अनुसरून महिलांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहेच. वैदिक काळात गणितज्ञ भास्कराचार्यांच्या साथीला लीलावती होतीच ना. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वाचली मात्र त्यांच्या सोबतीला मुक्ताबाई होत्याच ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पतपातशाही उभी केली. मात्र त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ होत्याच ना. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना ठार मारले. त्यानंतर मराठी साम्राज्य सांभाळण्यासाठी महाराणी येसूबाई पुढे आल्यात. अहिल्याबाई होळकरांचे उदाहरणही आम्ही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यात तटावरून घोडा फेकून इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या झाशीच्या राणीला कोणी कसे विसरू शकेल. नंतरच्या काळात तर अनेक महिलांनी स्वतःचे कर्तृत्व प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केले आहे. मग ते राजकारण असो, प्रशासन असो, उद्योग असो, की शेती व्यवसाय, क्रीडा असो, की सांस्कृतिक क्षेत्र किंवा साहित्यक्षेत्र, प्रत्येक ठिकाणी महिला या कायम आघाडीवर राहिल्या आहेत.
तरीही आजच्या एकविसाव्या शतकात महिला अजूनही भोगदासी म्हणूनच वागवण्याचा प्रयत्न केला जातो. एकटी दुकटी महिला बघून तिच्यावर कायम अत्याचार केले जातात. तिला दाबून कसे ठेवता येईल हाच विचार केला जातो. यावर काहीतरी उपाय व्हायलाच हवा ना.
याला कारण आमची पुरुषी मानसिकता आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र अशी पुरुषी मानसिकता तयार व्हायलाही कुटुंबातील वातावरणच कारणीभूत ठरते.आज एकविसाव्या शतकात देखील घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलालाच जास्त महत्त्व दिले जाते. मुलीला काय आयुष्यात चूल आणि मुलच करायचे आहे, असे सांगून प्रसंगी तिच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले जाते. मुलगी हे कायम परक्याचे धनच समजले जाते. जी भावना कुटुंबातून मनात रुजवली जाते. तिला समाजातही खतपाणी घातले जाते. समाजही महिलांना अजूनही दुय्यम स्थानावरच ठेवू बघतो. त्यामुळेच की काय,ही अशी महिलांना दाबून ठेवणारी पुरुषी मानसिकता मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे.
ही मानसिकता संपवायची असेल तर आम्हाला सुरुवात कुटुंबापासूनच करावी लागेल. स्त्री ही अबला नाही तर सबला आहे हे स्त्रीने अनेक उदाहरणातून दाखवून दिले आहे. हीच स्त्री प्रसंगी कुटुंबाचा आधार बनून कोलमडणाऱ्या कुटुंबाला सावरूही शकते हेही समाजाने बघितले आहे. आज मुलगी हे परक्याचे धन आहे, आणि मुलगा हा वंशाचा दिवा आहे, असे अजूनही बोलले जाते. मात्र आज कित्येक मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. त्याचवेळी मुलगी ही आई-वडिलांचा मुलगा बनवून त्यांना आधार देते अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. कालच एका वृत्तपत्रात एका जोडप्याची मुलाखत वाचताना त्यांनी असे नमूद केले होते की आजच्या काळात मुलांपेक्षा मुलीच आई-वडिलांची वृद्धापकाळात जास्त काळजी घेतात आणि त्यांना सांभाळूनही घेतात. आज मुली शिक्षण घेऊन उच्चशिक्षित बनल्या आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसायातही त्या प्रगती करत आहेत. म्हणूनच वेळच पडली तर आई-वडिलांवर त्या प्रसंगी पैसाही खर्च करू शकतात. फक्त पैसाच नाही तर वृद्ध आई-वडिलांचे पालक बनण्याचे कामही या मुली करतात. असे अनेक अनुभव आम्ही अवतीभोवती बघतो. तरीही आम्ही अजूनही महिलांना दुय्यम स्थानच देतो.
ही मानसिकता आता आम्हाला बदलावी लागणारच आहे. त्यासाठी कुटुंबापासूनच आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. घरात मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देण्याचे संस्कार आम्हाला द्यावे लागणार आहेत. मुलगा झाला की पेढे वाटा आणि मुलगी झाली म्हणजे बर्फी द्या हा प्रकार कुठेतरी बंद करावा लागणार आहे. आमच्याकडे गरोदर स्त्रियांच्या सातव्या किंवा आठव्या महिन्यात डोहाळ जेवण नावाचा एक धार्मिक कम हौसेचा विधी असतो. त्यात दोन वाट्यांमध्ये मिठाई ठेवून त्यावर झाकण ठेवले जाते, आणि त्या गरोदर स्त्रीला ते झाकण उघडायला सांगितले जाते. त्यात पेढा असलेली वाटी उघडली तर या गरोदर स्त्रीला मुलगा होणार आणि बर्फी असलेली वाटी उघडली तर मुलगी होणार असा निष्कर्ष काढला जातो. मग ती स्त्री, तिचे कुटुंबीय आणि इतर सर्वच त्या आनंदात पुढचे काही दिवस काढतात.प्रसंगी तो आनंद टिकतो, तर प्रसंगी भ्रमनिरासही होतो. कित्येकदा गरोदरपणात सोनोग्राफी करून अबोर्शन करण्याचीही पद्धत आता रुजते आहे. मुलगी असली तर हमखास अबोर्शन केले जाते. त्याला कायद्याने बंदी घातली असली तरीही बेकायदेशीरपणे असे प्रकार करणारे डॉक्टरआजही समाजात आहेत.याला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचे आहे.
स्त्री असो किंवा पुरुष, हे दोन्हीही परमेश्वरी देणगीच आहेत. त्यामुळे दोन्हींचे सारखेच स्वागत व्हायला हवे, आणि त्यांना समाजात सारखाच सन्मान मिळायला हवा. ही भावना अगदी बालवयापासून जर रुजवली गेली, तरच सुसंस्कृत समाज घडवला जाऊ शकेल, आणि मगच असे एकटी महिला गाठून तिला शिवनेरी बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार थांबू शकतील.
आज एकविसाव्या शतकात असलेल्या भारतीय समाजाने या मुद्द्यावर निश्चितच विचार करायला हवा, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
अविनाश पाठक, नागपूर.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

अप्रतिम लेख व महिलांविषयीचा आदर🙏🙏
ReplyDeleteविद्या पिंजारकर.