स्वयंसिद्ध लेखमाला :-११.तुझ्या विशाल पंखाखाली, अवघे विश्व वसावे.
स्वयंसिद्ध लेखमाला:-११.
तुझ्या विशाल पंखाखाली, अवघे विश्व वसावे......
इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला!
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !!!
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!
स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.
स्त्री म्हणजे वात्सल्य ,स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व.
मैत्रीणींनो, आपण हा जागतिक महिला दिन खूप उत्सवात आनंदात साजरा करतो, सुंदर वेशभूषा,ढोल ,बाईक रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अगदी कार्यक्रमांची रेलचेल असते,हे सर्व आनंदात साजरे करून आपण जागतिक महिला दिनाची सांगता करतो.
मैत्रीणींनो या जागतिक महिला दिनाचे श्रेय जाते न्यूयॉर्क च्या कापड गिरणीतील महिला कामगार स्त्रीयांना, ज्यांनी आपल्या हक्कासाठी सर्व प्रथम आवाज उठविला त्या हक्कासाठी लढणाऱ्या नारीशक्ती ला माझा सलाम. क्षणकाळाची पत्नी, आणि अनंत काळाची माता म्हणजे स्त्री, घराला घरपण देणारी स्त्री, समाज,देश घडविणारी स्त्री खरच आज सबला झाली आहे , स्वतंत्र झाली आहे ? नाही मैत्रीणींनो नाही, सरकारने कितीही महिला सबलीकरणाचे ढोल बडविले तरी आजची परिस्थिती पाहता अगदी तीन वर्षांच्या मुली पासून तर सत्तर वर्षाच्या महिलाही बलात्काराला बळी पडत आहे , मग कुठे गेलं महिलांचं सबलीकरण?
घरात कोणताही निर्णय पुरूषांच्या विरोधात जाऊन घेण्याचं सामर्थ्य, स्वातंत्र्य,खरच आहे तुमच्या कडे, नाहीं ग बाई नाही, स्वतःला तुम्ही स्वतः घडवा मजबूत बना वाचन करा विचारात प्रगल्भता आणा तुम्ही जिजाऊ झालात तर शिवाजी घडतील, रमाई सारखं धैर्य- हिंमत दाखवली तर अनेक बाबासाहेब आंबेडकर सारखे व्यक्तीमत्व घडवाल, सावित्रीबाई सारखा सुशिक्षित समाज घडवाल , दाखवून द्या माझ्या मैत्रिणींनो, स्त्री सुध्दा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते,
तुडविली तर नागिण असते,डिवचली तर वाघीण असते, कडाडली तर वीज असते, उद्या च्या भविष्याचे बीज तिच्या उदरात असते,
त्यामुळे इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीच्या प्रतिक असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिक्षणाचा वसा घेणारी सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणाऱ्या रमाई चे अनुकरण करा आपले संस्कार जपा मुलांना संस्कारी बनवा समाज संस्कारी जेव्हा बनेल तेंव्हाच तुमचं खरंच सबलीकरण होईल.
जिजाऊ सारखे संस्कार केले तर परस्त्री ला माता भगिनी म्हणणारे शिवबा घडतील. ढोलाच्या तालावर नाच गाणी करुन आम्ही आमच्या संस्कारापासून दूर तर जात नाही आहोत ? सावध व्हा ,सावध राहा, अन्याया विरोधात पेटून उठा, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण एवढे केले तरी आजची परिस्थिती पाहता पाहता बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.
८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्त समस्त स्त्री वर्गाला, माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा.
सौ. शुभांगीनी अनिल वैरागडे
निवृत्त मुख्याध्यापिका, नवभारत कन्या विद्यालय मूल.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment