लक्षवेधी ११, तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांची कर्तव्यपरायणता!
लक्षवेधी ११:-
तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांची कर्तव्यपरायणता!
दीपक देशपांडे
शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना सगळ्यात जवळचा आणि नित्यनेमाने सहकार्य करणारी शासकीय व्यक्ती म्हणजे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी. आता मात्र हेच मोठे साहेब झालेत आणि त्यांच्या बदललेल्या कार्यपद्धती मुळे त्यांच्या प्रती असलेला आदरभाव देखील कमी होत चालला आहे, परिणामी ते जनतेला सहकार्य करायला नाही तर जणू लुटायलाच तिथे नियुक्त केले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि... त्यातून निर्माण झालाय विश्वास -अविश्वासाचा प्रयोग आणि आता तर जनतेच्या हातात असे शस्त्र आले आहे की.......जर कोणताही अधिकारी नेमून दिलेले काम योग्य वेळी योग्य पद्धतीने करीत नाही असे लक्षात आले तर....
आपणही आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील खालील प्रमाणे त्रुटी निदर्शनात येत असतील तर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करु शकता, त्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून आता सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूर लावला जात आहे , मूलमध्ये तर पाच पाच मंडळ अधिकारी आपलं कामकाज मूल तहसिल कार्यालयात बसून चालवत असल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यातील तलाठ्यांचे काम चालते खासगी कार्यालयातून, अधिकाऱ्यांनी सज्जात काम न केल्यास आता होणार कारवाई.
त्यासाठी शासनाने नवीन तलाठी सज्ज्यांची निर्मिती केली आहे.मात्र, तलाठी व कोतवाल सज्जावर नसतात ,यासंदर्भात राजकीय ,सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या ,त्याची दखल घेऊन महसूल विभागाचे राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
तलाठी सज्जावर उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या.या तक्रारींची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या अप्पर महासंचालकांनी विविध सज्जांची तपासणी केली.या तपासणीत तलाठ्यांनी शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खासगी इसम नेमल्याचे दिसून आले.
तसेच, खासगी कार्यालयात शासकीय दस्तऐवज ठेवत असल्याचे आढळून आले होते. ही बाब विभागाकडून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यानंतर शासनाने परिपत्रक जारी केले आहे. यात कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना तलाठी तथा ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
ग्राम महसूल अधिकारी हे नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी काम करतात. मात्र सदर सज्जा कार्यालये शासकीय जागांमध्ये अथवा शासन मान्यता प्राप्त भाड्याच्या जागांमध्ये आहेत. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज खासगी कार्यालयातून करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असा अहवाल सादर केला होता तसेच, ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्ती, मदतनीस नेमण्याबाबत शासन स्तरावरून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत , हेही त्यात नमूद केले होते.
मात्र तलाठी हे शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करत असल्याचे, खासगी जागेमध्ये शासकीय दस्तऐवज ठेवत असल्याचे निर्देशनास आल्यास तसेच, शासकीय कामकाज करण्यासाठी खाजगी व्यक्ती नेमत असतील, तर संबंधित तलाठ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
खासगी व्यक्तीची नियुक्ती नियमबाह्य
तलाठ्यांनी खासगी कार्यालय थाटणे किवा खासगी व्यक्तीची नियुक्ती करणे हे नियमबाह्य आहे. त्यांनी मुख्यालयी राहूनच जनतेची कामे करावी, तसेच या शासनाच्या नवीन आदेशाचे पालन करावे,अशाही सुचना दिलेल्या आहेत.
तरीही किती तलाठी किती दिवस त्यांचे मुख्यालयी किती वेळ बसून जनतेची कामे करतात? या प्रश्नाचे उत्तर अजूनही कुणाला देता येत नाही , कां? गरजूंनी शक्य असणारे दाखले मागीतले तरीही त्यांना आपले सरकार सेतू केंद्रावर पायपीट करीत कां पाठवले जाते? कधी यांची लिंक फेल असते तर कधी प्रिंटर खराब असते तर कधी कागद उपलब्ध नसतात, नकाशाचा ताव तर कधी कुणाकडे क्वचितच सापडतो कां? जेव्हा तुम्हाला तुमची जबाबदारी माहिती आहे तेव्हा ही अशी वेळ कां यावी? विचार करून बघा आणि ठरवा .
कुणी हेतुपुरस्सर असे करीत असेल तर यासाठीच हा आदेश आणि तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यासाठी तयार व्हायला हवे आहे.
जागो ग्राहक जागो , शेतकरी, बळीराजा होता तोवर कुणी बळीचा बकरा समजून तुझी लुट करायचे पण तू आता ग्राहक राजा झाला आहेस, नवीन ग्राहक संरक्षण कायदा तुझ्याच मदतीसाठी आला आहे , त्यामुळे आपल्या अधिकारांप्रती सजग हो आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढे ये.
तू चुकीचे वागू नको पण कुणी चुकीचे वागत असेल तर त्याला बळीही पडू नकोस,आपले अधिकार समजून घे,कारण तूच या देशाचा खरा त्राता आणि अन्नदाता आहेस,हे कदापी विसरु नकोस.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment