लक्षवेधी १३.'-'मी ग्राहक आहे' हे नेहमी लक्षात असू द्या !
लक्षवेधी १३.:-
'मी ग्राहक आहे' हे नेहमी लक्षात असू द्या !
मुजोर विक्रेत्यांना धडा शिकवा ...
दीपक देशपांडे
बाजारपेठेतील विविध उत्पादने, वस्तू, सेवा विक्री - पुरवठा करताना विक्रेता - पुरवठादार हे ग्राहकांच्या गरजा, हक्क आणि तक्रारी संदर्भात मुजोर, उर्मट होताना दिसतात. आम्ही काहीही आणि कसेही विक्री करू, ग्राहकांच्या हक्क - सेवेबाबत आम्ही मनमानी करू, असे वर्तन बहुतांश विक्रेते - पुरवठादार करतात. अशा लोकांना प्रचलित कायदे - नियमान्वये धडा शिवायला केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने
(Ministry of Personnel, Public Grievances & Pensions) नागरिकांच्या तक्रारी नोंदवायचे पोर्टल
https://pgportal.gov.in/
तसेच राज्य सरकारने तक्रार नोंदवायला तक्रार निवारण पोर्टल (Grievance Redressal Portal)
https://grievances.maharashtra.gov.in/
सुरू केले आहे. या पोर्टलवर आपण कोणताही विक्रेता - पुरवठादार - सेवा देणारा यांच्या विषयी तक्रार नोंदवू शकतो. या दोन्ही पोर्टलवरील तक्रारीनंतर संबंधित मंत्रालय पुढील कार्यवाही करतेच. अडलेल्या - नाडलेल्या ग्राहकाने केवळ तक्रार करायचे धाडस दाखवायला हवे.
केंद्र सरकारच्या pg portal चा लाभ अनेकांनी आजवर अनेक वेळा घेतला असून भल्याभल्या विक्रेत्यांना - उत्पादकांना धडा शिकवला आहे.
एक अनुभव आमच्या सहकाऱ्यांचा:-
असाच अनुभव गेल्या १३ जानेवारी २०२५ चा. आम्ही उभयता आणि मित्र दाम्पत्य असे चौघे खासगी वाहनातून जळगावहून वाशीमकडे जात होतो. बाळापूर - पातूर रस्त्यावर वाडेगावनजिक आम्ही वाहनात पेट्रोल भरायला पवार पेट्रोलपंपावर थांबलो. वाहनाची टाकी फूल केली. तेथे महिला - पुरूषांसाठी स्वच्छता गृह आहे का ? याचा तपास केला. तेव्हा पाहिले की स्वच्छतागृहाला कुलूप आहे. पिण्यासाठी पाणी नाही. मी पंपाच्या मॅनेजरला शोधले. तो नव्हता. मी तक्रार पुस्तक मागून घेतले आणि रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पोर्टलवर जावून पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली. तो पंप हिंदूस्तान पेट्रोलीयमच्या अखत्यारित असल्याने पोर्टलवर तशी नोंद केली.
पोर्टलवरील तक्रारीनंतर संबंधित यंत्रणेने पंपचालकाचे योग्य ते कान टोचले. नंतर तेथील मॅनेजरचा मला 'साॅरी' म्हणणारा काॅल आला. 'शौचालयाची टाकी फुटली आहे, म्हणून स्वच्छतागृह बंद होते, आता २ दिवसात चालू करतो' असेही तो म्हणाला. नंतर पोर्टलवरून मेसेज आला की, 'त्या पंपचालकाला समज देऊन कारवाई केली आहे.' मात्र आज सहा दिवसांनी हिंदूस्तान पेट्रोलियमच्या औरंगाबाद विभाग उप सरव्यवस्थापक (विक्री) विशाल शर्मा यांचे हातभर पत्र आले. या पत्रात कंपनीने स्वच्छतागृह बंद संदर्भात तीन वेळा दिलगिरी व्यक्त केली. विक्रेता पवार पेट्रोलपंपचलकाला समज देऊन दोन दिवसात समस्या सोडवा असे आदेश दिल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व प्रकारात पवार पेट्रोलपंपचालक विरोधात आता २\३ कागद तयार झाले आहेत. यापुढे आणखी तक्रार आली तर दंडासह परवानाही रद्द होऊ शकेल. ग्राहकांचे हक्क - तक्रारी - सूचनांबाबत मोठ्या कंपन्या जागरूक आहेत हेच यातून लक्षात येते. आपण ग्राहक म्हणून आपले हक्क जाणून घेणे आवश्यक आहे. शिवाय आपण तक्रार करायचे धाडस दाखवायला हवे असे.. पत्रकार दिलीप तिवारी जळगाव यांनी कळविले आहे.
तक्रार करायला पुढे या आणि यांची सुरुवात आपल्या स्वतः: पासून करा.... कदाचीत या मालिकेत पुढील अनुभव तुमचाही असू शकतो.....लागा तयारीला....आणि... आम्हाला कळवायला विसरु नका!
*जागृत ग्राहक राजा, ग्राहक संघटना नेहमीच आपल्या हितरक्षणासाठी सदैव तत्पर असणार आहे...
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment