घ्या समजून राजे हो... संतोष देशमुखची हत्या
घ्या समजून राजे हो... संतोष देशमुखची हत्या. दि.११ जानेवारी २०२५
मुळ प्रकरण बाजूला राहून चिघळते आहे फक्त राजकारण
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे. त्यांच्या या हत्त्येला जबाबदार असलेले काही मारेकरीही पकडले गेले आहेत.
सर्वसामान्यांच्या मते या प्रकरणाचा जो प्रमुख सूत्रधार आहे तो वाल्मीक कराड देखील पोलिसांच्या अटकेत आहे. राज्यातील सी.आय.डी, आणि मुख्यमंत्र्यांनी गठीत केलेले एस.आय.टी पथक देखील या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी कबुल केल्यानुसार सर्व आरोपींवर मकोकाही लावण्यात आला आहे. तरीही या प्रकरणामुळे निर्माण झालेले राजकारण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. इतकेच काय तर ते अधिकच चिघळत चाललेले दिसते आहे,
झाले असे की मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांना ८ डिसेंबर २०२४ रोजी काही इसमांनी एका गाडीत बसवून चर्चेसाठी घेऊन जातो असे सांगत अज्ञात ठिकाणी नेले. नंतर ते घरी आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबरला त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते असे सांगण्यात आले.
त्यांच्या या हत्येने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हळूहळू त्यांच्या या हत्येमागे नेमकी कारणे काय आणि कोण जबाबदार असावेत याबाबत वेगवेगळ्या कथा कानावर येऊ लागल्या.
सकृतदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार खंडणीच्या वादातून संतोष देशमुख चा खून करण्यात आल्याचे सांगण्यात आले, बीड जिल्ह्यात वाल्मीक कराड नावाचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. हा वाल्मीक कराड ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. सध्या बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याच्या महायुती सरकार मधले एक मंत्री धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्ती आहे. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात जमा होत असलेली राख उचलून नेणाऱ्या कंत्राटदारांकडून खंडणी जमा करणे तसेच जिल्ह्यात उभ्या होत असलेल्या पवनचक्की मालकांकडूनही खंडणी जमा करणे आणि आपले राजकीय वजन वाढवणे हेच त्याचे उद्योग असल्याचे बोलले जाते. हे सर्व उद्योग करताना त्याला मोठा राजकीय वरदहस्त असल्याचेही गावात सांगण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील संतोष देशमुखची हत्याही अशाच खंडणीच्या भांडणातून झाल्याचे मी आधीच नमूद केले आहे. झाले असे की केज तालुक्यातील मसाजोग या गावाजवळ आवाज नमक कंपनीने पवनचक्की उभारणे सुरू केले होते. त्या ठिकाणी वाल्मीक कराडच्या माणसांनी जाऊन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील ५० लाख रुपये अग्रीम रक्कम म्हणूनही घेतली होती. उर्वरित रक्कम लवकर न दिल्यास काम थांबवले जाईल अशी धमकीही/ देण्यात आली होती. त्यासाठी कराडची माणसे तिथे वारंवार चकराही मारत होती.
गावाजवळ पवनचक्की उभी झाली तर गावाच्या विकासाला नवीन गती मिळेल या विचाराने संतोष देशमुख यांचे या प्रकल्पाला समर्थन होते. त्यांना जेव्हा कराडची माणसं तिथे त्रास देत आहेत असे कळले तेव्हा त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत जाऊन त्या माणसांना हुसकावून लावले होते. त्यातूनच संतोषचा काटा काढण्याचा कट शिजला. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला त्याचे अपहरण करण्यात आले, आणि ९ डिसेंबरला त्याचा मृतदेहच गावकऱ्यांना मिळाला.
एका सरपंचाची अशी अपहरण करून हत्या व्हावी ही बातमी महाराष्ट्रात खळबळ वाजवणारीच होती. लगेच पोलीस तपासाची चक्रे फिरली .मात्र आठवड्या लोटला तरी आरोपी सापडले नव्हते. १६ डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. त्या अधिवेशनात या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी कामकाजही रोखून धरले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सीआय.डी.मार्फत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एस.आय.टी स्थापन करून चौकशी केली जाईल आणि कोणीही दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे विधिमंडळात जाहीर केले होते. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार हालचालीही सुरू झाल्या होत्या.
यानंतर वातावरण थंड व्हायला काही हरकत नव्हती. मात्र इथूनच पुढे राजकारण सुरू झाले. गावातील नागरिक आणि विधिमंडळात प्रकरण उपस्थित करणारे बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आणि भाजपच्याच नमिता मुंदडा यांच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख यांचा खून हा वाल्मीक कराड याने केला आहे, हा वाल्मीक कराड राज्य मंत्रिमंडळातील सध्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. मुंडेंचा त्याच्यावर वरदहस्त आहे. त्यामुळे या प्रकरणात आधी मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि मग चौकशी करावी, अशी सुरेश धस यांची मागणी होती.
विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा गाजत होताच. मात्र त्याचवेळी शरद पवार, राहुल गांधी, अशा दिग्गजांचे दौरेही मसाजोगकडे सुरू झाले होते. हे सर्वच मान्यवर संतोष देशमुख च्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मसाजोगकडे धावत होते आणि तिथे जाऊन राज्य सरकारवर तोंडसुख घेत होते. अधिवेशन संपले आणि मग बीड जिल्ह्यात संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चे निघणे सुरू झाले. प्रत्येक मोर्चात सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा हे तर आघाडीवर होतेच. पण त्याचबरोबर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील कुठेही मागे नव्हते. प्रत्येक मोर्चात हे मान्यवर उपस्थित राहायचेच. आधी केज ला मोर्चा निघाला मग बीड नंतर पुणे, जालना नंतर संभाजीनगर आणि हा लेख लिहीत असताना धाराशिव येथेही मोर्चा निघाला आहे. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघाले. विशेष म्हणजे सर्वच मोर्चामध्ये संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा या मागणीपेक्षाही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, ते राजीनामा देत नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, या मागण्यांसाठीच जास्त जोर धरला जात होता. जसे मोर्चे निघत होते, तसेच इतरही नेतेमंडळींकडून कधी पत्र परिषदा घेऊन तर कधी कॅमेरासमोर बाईट देऊन धनंजय मुंडेंच्या राजीनामेची मागणी केली जात होती. हे सर्व प्रकार बघता इथे संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळणे हा मूळ हेतू बाजूला टाकला जात होता आणि धनंजय मुंडेंबाबत असलेले राजकीय वैर कसे वापरून घेता येईल हाच प्रयत्न केला जात असल्याचे आढळून येत होते.
बीड जिल्ह्यातील जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे हे आपले काका गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून भाजपमधूनच राजकारणात सक्रिय झाले होते. नंतर गोपीनाथजींनी आपली मुलगी पंकजा हिला राजकारणात पुढे आणायचे प्रयत्न सुरू केल्यावर धनंजय मुंडे कुठेतरी दुखावले, आणि त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि नंतर राज्य मंत्रिमंडळात मंत्रीही झाले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळात सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यामुळे गोपीनाथजी आणि सुरेश धस यांच्यात राजकीय स्पर्धा असायची. त्या काळात गोपीनाथजी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे प्रस्थ होते. त्याचा फायदा घेत गोपीनाथजींनी आपल्याला बराच त्रास दिला असे सुरेश धस यांचे म्हणणे होते. त्यामुळे आता संधी मिळताच त्याचा वचपा काढायला सुरेश धस मैदानात उतरले होते. नमिता मुंदडा आणि प्रकाश सोळंके यांनी देखील या संधीचा फायदा घेऊन आपले राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी सुरेश धस यांच्याशी हातमिळवणी केली होती. या तिघांनाही संतोष देशमुखचे प्रकरण आयतेच मिळाले होते. हे तिघेही संधीचा योग्य फायदा न उचलते तरच नवल.
प्रस्तुत प्रकरणातील संतोष देशमुख हे शरद पवार गटाचे नेते होते आणि ते मराठा समाजाचे होते. त्यामुळे शरद पवार गट आणि एकूणच मराठा समाज या मुद्द्यावर एकत्रित यायला फारसा वेळ लागला नाही. धनंजय मुंडे हे वंजारा समाजाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या बाजूने वंजारा समाज एकत्र झाला आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आठवडा उलटला तरी आरोपी सापडत नाहीत हे बघून मराठा समाज एकवटला आणि त्यांनी मोर्चे, आंदोलने हे प्रकार सुरू केले. या मोर्चाचे नेतृत्व करून सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. जनसामान्यांच्या मते आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून वाल्मीक कराडनेच ही हत्या घडवून आणली होती. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा देखील या हत्येच्या कटात सहभाग होता असा दावा करत सुरेश धस आणि त्यांचे सहकारी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करत होते.
वस्तूतः संतोष देशमुख ची हत्या वाल्मीक कराडच्या माणसांनीच केली असे पूरेसे पुरावे सुरुवातीला तरी उपलब्ध नव्हते. मात्र त्याचवेळी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल झाला होता. त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यावर झालेली कारवाई आणि पोलिसांनी सुरू केलेला त्याचा शोध हा कुठेतरी रास्त मानता येत होता. मात्र जरी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे निकटवर्ती असले तरीही या हत्येशी धनंजय मुंडे यांचा थेट संबंध प्रस्थापित करता येत नव्हता. तरीही त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करणे हे शुद्ध राजकीय हेतूनेच होत होते हे स्पष्ट दिसते.
धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत तर सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सुरेश धस हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. मधल्या काळात ते पक्ष सोडून भाजपमध्ये आले. आज भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्तेत सहभाग आहे. तरीही सुरेश धस हे आपल्याच मित्रपक्षाचे असलेल्या धनंजय मुंडे यांच्या मागे हात धुवून लागले आहेत हे कुठेतरी खटकणारेच आहे. त्यांनी मधल्या काही सभांमध्ये थेट अजित पवारांवरही हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी हेही त्यांच्या विरोधात मैदानात उतरले. एकूणच आधी नियमूद केल्याप्रमाणे मूळ मुद्दा बाजूला राहत मुंडेंच्या राजीनाम्याचेच राजकारण रंगते आहे. या प्रकरणात सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच फूस असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय जाणकारांशी संपर्क केला असता त्यांनीही ही शक्यता बोलून दाखवली. त्याची कारणमिमांसा देताना फडणवीसंना अजित पवारांना काबुत ठेवण्याचे असल्यामुळे सुरेश धस यांच्या माध्यमातून ते आपला हेतू साध्य करत असल्याचे बोलले गेले. मात्र एकूण फडणवीसांची राजकारणाची शैली बघता अशी शक्यता नसावी असेही काही जाणकारांकडून सांगण्यात आले.
मधल्या काळात विविध मोर्चांमधून धनंजय मुंडेंवरच जोरदार टीकास्त्र सोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्याच वेळी१९९४ मध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना ११४ गोवारी बांधवांचा नागपुरात चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता, तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावर शरद पवारांनी का राजीनामा दिला नाही याचे उत्तर त्या देत नाहीत. राजीनाम्याची मागणी करताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत अनिल देशमुख आणि नबाब मलिक यांचा दाखला देतात. मात्र नबाब मालिकांना अटक होऊन ते तुरुंगात गेले असतानाही त्यांनी दीर्घकाळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता आणि तुरुंगातूनच ते मंत्रिपदाचा कारभार चालवत होते हे वास्तव संजय देशमुख विसरतात. महाआघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या ज्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली अटका झाल्या तेव्हा त्यांच्या विरोधात काहीतरी माहिती मिळत होते म्हणूनच कारवाई होत होती यामुद्द्याकडे सर्वच दुर्लक्ष करतात.एकूणच "हमाम मे सब नंगे होते है" हेच खरे असा निष्कर्ष जनसामान्यांना काढावा लागतो.
संतोष देशमुख मराठा असल्यामुळे या हत्येविरुद्ध मराठा समाज एकवटला. यांच्या आंदोलनांमध्ये धनंजय मुंडेंवर जोरदार आरोप केले गेले. त्यामुळे मधल्या काळात मुंडे ज्या वंजारा समाजाचे आहेत तो वंजारा समाजही रस्त्यावर आला आहे. त्यांनी ठीकठिकाणी च्या पोलीस ठाण्यासमोर सुरेश धस, मनोज जरांगे पाटील इत्यादी नेत्यांवर गुन्हे दाखल करा म्हणून ठिय्या आंदोलने सुरू केली आहेत. धनंजय मुंडे यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली आहे. पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले आहे. त्यांनी धस यांच्या भानगडीही उघड करण्याची धमकी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही जोवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत तोवर त्यांचा राजीनामा घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज दिली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनीही धस यांच्याशी बोलणे केले असल्याची माहिती मिळाली आहे.एकूणच संतोषची हत्या होऊन महिना उलटला तरी राजकारण अजून चिघळतेच आहे.
महाराष्ट्रात दररोज ठिकठिकाणी कोणाच्यातरी हत्या होतात. काही हत्या सामाजिक प्रकरणात तर काही राजकीय प्रकरणात देखील झालेल्या दिसतात. मात्र त्यांच्यावर एवढे राजकारण झालेले दिसत नाही. या प्रकरणात मात्र राजकारण चांगलेच पेटले आहे. असे राजकारण पेटते असतानाच यातून मराठा विरुद्ध वंजारा असा संघर्ष तर उभा राहणार नाही ना असेही चित्र दिसते आहे. भरीजभर आता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धस यांच्याही भानगडी शोधून अमोल मिटकरी यांनी माध्यमांसमोर आणायला सुरुवात केली आहे. वंजारा समाज हा ओबीसी प्रवर्गात येतो. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे देखील मैदानात उतरले आहेत.हे बघता हे प्रकरण अजून किती काळ पेटते राहणार हा प्रश्न जनसामान्यांना भेडसावतो आहे. हे असेच राजकारण भडकते राहिले तर संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय देण्याचा मूळ मुद्दा बाजूलाच राहील आणि फक्त राजकीय हेवेदाव्यांचा हिशोब चुकता करणे इतकेच साध्य करण्याची धडपड सुरू असलेली दिसेल हे चित्र आज तरी दिसते आहे.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो...!.
अविनाश पाठक
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment