लक्षवेधी:-४.सुंदर मूल! मूलचाआठवडी बाजार बदलला आता वर्दळीच्या ठिकाणी मुत्रीघर/सुलभ शौचालय निर्माण व्हावेत!.
लक्षवेधी:-४ सुंदर मूल!
मूलचाआठवडी बाजार बदलला आता वर्दळीच्या ठिकाणी मुत्रीघर/ सुलभ शौचालय निर्माण व्हावेत!
अपेक्षा आणि उपेक्षांचे ओझे.
दीपक देशपांडे मूल
स्वच्छ आणि सुंदर मूल शहराचे स्वप्न साकार होत असताना सर्वसामान्य नागरिक प्रशासनाने स्वच्छता राखावी ,रस्ते साफ ठेवावे , नाल्यांची सफाई करावी आणि .........अशा कित्येक अपेक्षा बाळगतो, खरंय ना? पण.......
आजवर टाळी कधी एका हाताने वाजवलेली कुणी बघितली नाही की असे कधी घडल्याचे ऐकिवात नाही ,मग केवळ प्रशासकीय यंत्रणेने कार्य करीत राहायचे आणि जनतेने घाण पसरवत राहायचे मग कितीही स्वच्छता अभियान राबविले तरी नगर स्वच्छ कुठून आणि कसे होणार? हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारण्याची आज गरज निर्माण झाली आहे. असे आपणास वाटत नाही काय?
रस्त्याच्या कडेला कचराकुंडीत कचरा न टाकता बाजूला अस्ताव्यस्त टाकणारे आपणच आणि आपल्यातलेच कुणी असतो ना? तोच कचरा उडत जाऊन नाल्यांमध्ये जातो आणि नाल्या तुंबायला सुरुवात होते ,मग नाल्या तुंबल्या की पाणी अडते आणि डासांची पैदास वाढू लागते आणि आपणच आपल्या आरोग्याशी खेळ करतोय ,यांची आपल्याला जाणीव तरी असते काय?
आपल्या सुखसोयी साठी बांधलेल्या मुत्रीघर आणि सुलभ शौचालयांचा वापर करताना आपणच कुणीतरी तेथील नळाच्या तोट्या तोडून ,बेसीन फोडून आणि दरवाजे, खिडक्या तोडफोड करुन नुकसान करीत असतो ना? मग केवळ नगर प्रशासनच या सर्व प्रकारांना जबाबदार असल्याचा कांगावा कां केला जातो ?
नगराच्या सौंदर्यीकरणासाठी तयार केलेले म्युरल आणि कारंजे आपल्यातीलच कुणीतरी तोडफोड करीत उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र करतात आणि आपण ते बंद असण्याचे खापर नगरप्रशासनावर फोडतो , आणि लाखो रुपये खर्च व्यर्थ गेल्याची ओरड करत आरोपांच्या फैरी झाडत असतो.
याचा अर्थ आम्ही नगरप्रशासनाच्या कार्यप्रणालीचा उदोउदो करतोय असे कदापीही नाही , मात्र आजवर आपण केवळ आणि केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवून आपल्या कार्यकर्तृत्वाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत आणि नगरप्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहोत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
सार्वजनिक संपत्ती ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन जर त्यांचे संरक्षण व्हावे ही मानसिकता तयार करून तसे वागायला सुरुवात केली तर नगरप्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आपल्याला आरोप करण्याचा प्रसंग येणारच नाही आणि काही त्रुटी आढळल्यास तर त्यावर नगरप्रशासनाला तातडीने कारवाई करावीच लागेल पण...आपण काय करतो?
होय...आठवडी बाजार पूर्णपणे संरक्षण भिंतीच्या आत नेल्यामुळे काही जणांना त्रास झाला परंतू सर्वसामान्य जनता सुखावली हे अधिक महत्त्वाचे नाही का?
नगरात मुत्रीघर आणि सुलभ शौचालय यांची कमतरता आहे ,हा गहन विचार आहे ,ती सोय करणे गरजेचे आहे परंतू जे तयार आहेत त्यांची तोडफोड केल्याने काय साध्य होणार आहे?
नगराच्या सौंदर्यात भर घालणारी कारंजं आणि बगीचे यांची वाताहात लावणारे ही आपल्यातलेच कुणीतरी आहेत हे ऐकताना मनाला क्लेश व्हायला हवा परंतू आपण बघूनही त्याकडे दुर्लक्ष कां करतो?
नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या तलावात घाण पसरवून आपणच त्यांचे सौंदर्य ओंगळवाणे करणारेही आपणच आहोत ना? चहा टपऱ्या आणि पान ठेल्यावर चहाचे घोट घशाखाली जाताच ते कप अस्ताव्यस्त फेकणारे आपणच असतो ना? खर्रा खाल्यानंतर त्याच्या पन्न्या चालता चालताना रस्त्यावर भिरकावणारेही आपणच असतो ना? दुकानांमधून निघणारा कागद, प्लास्टिक व अन्य कचरा दुकानांच्या बाहेर ढकलून देणारे ,फुले विक्री करणाऱ्यांनी सडकी फुले दुकानाबाहेर फेकून देणे ,व तत्सम कामे दुकानाबाहेर ढकलून स्वच्छतेची अपेक्षा करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे यावरही कुठेतरी दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे ,तरच आपण आपल्या वागण्यात बदल घडवू शकतो अन्यथा ते होणारच नाही.
भाजी विक्री करताना उरलेली आणि काही प्रमाणात खराब झालेली भाजी ढिगांनी रस्त्यावर ओतून जाणारे ही आपणच असतो ना? मग विचार करुन बघा ना? आपण दुसऱ्या कुणाला नांव ठेवण्यासाठी पात्र! नाही लायक आहोत का?
नगर प्रशासनाने, रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत ,त्याचा वापर व्हावा , घंटागाडी दारात उभी राहते तीचा वापर व्हावा , नगराच्या सौंदर्यात भर घालणारी म्युरल्स आणि बाग बगीचे यांची काळजी घेतली जावी ,मुत्रीघर आणि सुलभ शौचालये यांची स्वच्छता जपण्याचा प्रयत्न केला जावा ,तलाव,नदी आणि सार्वजनिक ठिकाणे, बसण्यासाठी ठेवलेले बेंचेस ,पूल , फुटपाथ यांची काळजी घेतली पाहिजे तर आणि तरच आपण सुंदर शहराची संकल्पना साकार करु शकतो अन्यथा सारी मेहनत पाण्यातच......
नगर परिषदने बांधकाम केलेले पोस्ट ऑफिस जवळचे मुत्रीघर ,सुचक साडी सेंटरच्या बाजूचे सुलभ शौचालय , आणि महिला सभागृहाजवळचे सुलभ शौचालय लवकरच जनतेच्या उपयोगासाठी सुरू होताहेत ,गांधी चौकात जागेची अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेकडे केलेली मागणी प्रलंबित असल्याने तेथेही जागा शोधण्याचे कार्य सुरू आहे. पण...
बंद असणाऱ्या थंड पाण्याच्या मशीन सुरू करण्यात येणार आहेत पण....
सिसिटिव्ही कॅमेरे नजर ठेवण्यासाठी कार्यक्षम होणार आहेत पण....
हे आणि असे सर्व पण.... दूर करायचे असेल तर, आपल्यातील सुज्ञ नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. आहोत का आपण त्यासाठी तैय्यार?
जागृत ग्राहक राजा म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी संदीप दोडे यांचेशी केलेल्या संवादातून बाहेर आलेले वास्तव......एक प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेले , खरंच का आपण एवढे................. रामराज्य साकारायचे असेल तर प्रशासन प्रयत्न करणार आहे आपल्या सहकार्याची गरज आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक संकल्प नवविचाराचा ......! म्हणूनच ही समस्या लक्षवेधी ठरणार आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments
Post a Comment