लक्षवेधी:-२ ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली?
लक्षवेधी:-२.
ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली?
मरेगाव ग्रामसेवकांची मनमानी कुणाच्या भरवशावर? कशासाठी?
मूल तालुक्यातील मूल नागपूर मार्गावरील मरेगाव ग्रामपंचायत ही पंचायत समिती मूल अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एक छोटी ग्रामपंचायत असून गावाची लोकसंख्या ८००-८५० आहे. या गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवक म्हणून श्री.बि.टि.बारसागडे यांची नियुक्ती केली आहे.
मात्र ग्रामसेवक बारसागडे हे आपली मनमानी करीत ग्रामपंचायतीचा कारभार चालवित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि कमेटी कोणताही निर्णय घेत असताना त्यांना कुठलाही पाठिंबा देत नाही, याउलट ते आपणच खरे आहोत असे म्हणत कमिटीने घेतलेले निर्णय धुडकावून लावतात तसेच मानसीक सभेचे ठराव रजीस्टर हे कार्यालयात न ठेवता घरी घेऊन जात असतात तसेच विकास कामांचे प्रस्ताव लिहून मागीतले असता लिहून देण्यास नकार करुन आता वेळ नाही नंतर लिहून देतो असे म्हणत प्रस्ताव देण्यास विलंब करतात असा आरोप करीत त्यांना मरेगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक पदावरुन मुक्त करीत ग्रामपंचायतीचा कारभार आपला समजून चालवणाऱ्या ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ,संवर्ग विकास अधिकारी मूल, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. चंद्रपूर, आणि तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊन केली होती ,या घटनेला ही आज चार महिन्यांचा काळ लोटून गेला आहे, परंतू अजूनही ह्या मागणीवर कार्यवाही झाली नाही ,की ग्रामसेवकांच्या वागण्यात काडीचाही फरक पडला नाही.
याच तक्रारीत, ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारचे दाखले मागीतले तर ग्रामस्थांना दाखले आणि प्रमाणपत्र देण्यास विलंब करतात त्यामुळे ग्रामवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे , तसेच १५व्या वित्त आयोगाच्या कामाबद्दल आणि गेरप्रकाराबद्दलही माहिती दिली आहे,मात्र प्रशासकीय पातळीवर या सर्व बाबी विचारात घेतल्या गेल्या नाहीत याचेही कारण कळू शकले नाही,असेही नमूद करण्यात आले आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आले होते व त्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना ते निवेदन सुपूर्द करीत तातडीने कारवाई करण्याची सुचना देण्यात आली होती, अशा स्थितीत मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, वा जि.प.चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही,असा आरोपही ग्रामस्थांनी आमच्याशी संवाद साधताना केला.
मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणून आमची आर्त हाक प्रशासनातील उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी व आम्हा मरेगावच्या ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे आम्ही हे प्रकरण सोपवीत आहोत असे स्पष्ट मत ग्रामस्थांनी आमच्याशी वार्तालाप करताना व्यक्त केले,व तातडीने ग्रामसेवक बारसागडे यांची बदली करुन नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पुढे केली आहे.
शासन, प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी मान्य करीत बारसागडे यांची तातडीने बदली करावी व इतके दिवस केराची टोपली दाखवली आहे की ते निवेदन कोपऱ्यात धुळखात पडलेल्या फाईलीत पडले असेल तर त्या फाईलीतून झटकत बाहेर काढून कारवाई करावी ही ग्रामस्थांची मागणी मान्य करावी आणि औद्योगिक वसाहतीत एका आनंददायी वातावरणात प्रशासकीय कामकाज चालवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासन प्रशासन याबाबत योग्य निर्णय घेतील आणि नववर्षात मरेगावात ग्रामस्थ सुटकेचा श्वास घेऊ शकतील अशी आशा करायला हरकत नसावी, कारण येणारे नववर्ष हे प्रत्येकालाच आनंददायी आणि सुख समाधान घेऊन येणारे असावे अशी मनापासून इच्छा असतेच की.....!
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment