विलक्षण लोकनेता.... देवेंद्र फडणवीस.
विलक्षण लोकनेता ... देवेंद्र फडणवीस.------------------------
विनोद देशमुख, नागपूर.
भाजपा विचार परिवाराचे मुख्यालय आणि देशाचे मध्यवर्ती शहर असलेले नागपूर. येथील भाजपाने गेल्या तीन तपांमध्ये एक नव्हे दोन दिग्गज लोकनेते पक्षाला, राज्याला अन् देशाला दिले. पहिले नितीन गडकरी आणि दुसरे देवेन्द्र फडणवीस. यातील गडकरी राष्ट्रीय राजकारणात आहेत, तर देवेन्द्रजी पाव शतकापासून आमदार म्हणून राज्याचे राजकारण करीत आहेत. एवढेच नव्हे, तर राज्याचे सर्वोच्च पद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही तीनही पदे भूषविणारे महाराष्ट्रातील आतापर्यंतचे ते एकमेव नेते ठरले आहेत.
दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांवर भर, हे त्यांच्या कामाचे अन् लोकप्रियतेचे सूत्र आहे. त्यांनी 5 वर्षे मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कामांची चमक राज्यभर दाखवली आणि आपला कायम ठसा उमटवला, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
समृध्दी महामार्गापासून शेततळ्यांपर्यंत आणि मेट्रोपासून शेतकऱ्यांना वीजबिल माफीपर्यंत समाजातील सर्व वर्गांसाठी विकासाच्या विविध योजना राबविणारा एक चौफेर नेता, अशी देवेन्द्रजींची ओळख निर्माण झालेली आहे. गृह, विधी व न्याय, नगरविकास, जलसंपदा, ऊर्जा, गृहनिर्माण ही खाती सांभाळताना त्यांनी त्या त्या खात्यांसाठी मोलाचे राज्यव्यापी निर्णय घेऊन ते राबवले आणि लाखो लाभार्थ्यांना दिलासा दिला. फक्त साडेसात वर्षात इतकी मोठी कामगिरी करणारे देवेन्द्रजी अनोखे नाहीत, असे कोण म्हणू शकतो ?
लोकसंग्रह आणि नेतृत्व याची बीजे त्यांच्या डीएनएतच असल्याचे विद्यार्थीदशेतच दिसून आले. वडील स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून मिळालेला हा वारसा त्यांनी जोपासला आणि वाढवला. भाजपा युवा मोर्चाचे वार्ड अध्यक्ष म्हणून वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, तेव्हापासून गेल्या ३५ वर्षात त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलेले नाही. सर्वात तरुण नगरसेवक, सर्वात तरुण महापौर, आमदार आणि नंतर थेट मुख्यमंत्री असा त्यांचा नेत्रदीपक प्रवास राहिला. याचे कारण, लोकांचे अपार प्रेम, सहकार्य एका बाजूला, तर जनतेची नाडी ओळखून त्यांच्या हिताची कामे झपाट्याने करण्याची हातोटी दुसऱ्या बाजूला, यांच्या संगमातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे.
लोकनेता कसा असावा, याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. तरुण वयातच लाभलेले लोकनेतेपद त्यांनी वेळोवेळी स्वकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळेच नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) नागपूर विधानसभा मतदारसंघाने त्यांना आमदार म्हणून लागोपाठ सहादा निवडून दिले आणि महाराष्ट्राला दोनदा मुख्यमंत्रीही दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात उपराजधानीच्या नागपूर शहराला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाचा मान २०१४ मध्ये मिळाला तो त्यांच्यामुळेच. मंत्री म्हणून कुठलाही अनुभव नसतानाही देवेन्द्रजींनी मुख्यमंत्रिपद समर्थपणे सांभाळले आणि राज्यात विकासाचा अन् क्रांतिकारी निर्णयांचा धडाका लावला, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.
२०१९ मध्ये मतदारांचा स्पष्ट कौल मिळून सुद्धा शिवसेनेच्या राजकारणापायी भाजपा-शिवसेना युतीचे सरकार गेले आणि देवेन्द्रजींना विरोधी पक्षनेता व्हावे लागले. ती भूमिकाही त्यांनी चोख बजावली आणि महा विकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. नंतरच्या राजकीय उलाढालीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन स्वत: उपमुख्यमंत्री होण्याचा उमदेपणा आणि पक्षनिष्ठा यांचे आगळेवेगळे दर्शनही त्यांनी घडवले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले. या कारकीर्दीतही त्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकालीन "मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत" योजना आणली आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना वीजबिल पुढील ५ वर्षे माफ करण्याचा हा निर्णय ऊर्जामंत्री म्हणून देवेन्द्रजींनी अत्यंत धाडसानं घेतला आहे. शेतकऱ्यांना पर्यायी सौर ऊर्जा पंप देण्याची योजनाही विजेची मोठी बचत साधण्यातून दुहेरी लाभाची होणार आहे. जलसंपदा मंत्री म्हणून महत्त्वाकांक्षी 5 नद्याजोड प्रकल्प मार्गी लावण्याचे भविष्यासाठीचे फार मोठे कामही त्यांनी केले आहे. यात विदर्भातील वैनगंगा-नळगंगा प्रकल्प सर्वात मोठा असून त्याची अंदाजित लागत सव्वा लाख कोटींच्यावर आहे. ५ लाख हेक्टर शेतजमीन सिंचित करू शकणारा हा महाप्रकल्प विदर्भासाठी वरदानच ठरणार आहे.
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून इतरांसारखे फक्त मिरवण्यापेक्षा ठोस उपाययोजना आणि त्याचवेळी सर्वांगीण नागरी विकासालाही मोठ्या प्रमाणावर चालना, असे संतुलन साधणारा एक परिपूर्ण लोकनेता देवेन्द्रजींच्या रूपात विधानसभेत पाठविण्याचे भाग्य नैऋत्य नागपूर मतदारसंघाला सतत लाभले आहे. त्यांच्या मतदारांनी यंदाही याची पुनरावृत्ती करून त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसविले. वसंतराव नाईक यांच्यानंतर असे फक्त देवेन्द्रजींबद्दलच घडले आहे. दोघेही वैदर्भीय, हे विशेष.
सहा महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीला महाराष्ट्रात जबर फटका बसला असताना, महायुतीने विधानसभेत अभूतपूर्व यश मिळविले आणि विरोधकांना सातवे आसमान दाखविले. याचे सर्वाधिक श्रेय देवेन्द्रजींच्या धडाकेबाज नेतृत्वाला, त्यांच्या कुशल रणनीतीला, सुनियोजित समन्वयाला आहे. त्यांनी भाजपाला सलग तीनदा शंभरी पार नेले आहे. २०१४-१२२, २०१९-१०५ आणि आता विक्रमी १३२. गेल्या वेळी उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षेपायी शिवसेनेने बेईमानी केली नसती तर देवेन्द्रजींना यावेळी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक करण्याचा नवा विक्रम नोंदविता आला असता. तरीही, सर्व जनतेची काळजी वाहताना सामाजिक संतुलन साधणारे सशक्त सरकार मुंबईत प्रकर्षाने हवे असताना देवेन्द्रजीच "पुन्हा आले" हेही कमी नाही. अशा या सर्वसमावेशक, संयमित, विकासोन्मुख, कणखर, भविष्यवेधी नेतृत्वाला पुढच्या काळात सतत पाठबळ देणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांची ही कारकीर्दही संपूर्ण पाच वर्षे यशस्वी होण्यासाठी १४ कोटी जनतेच्या वतीने शुभेच्छा !
@विनोद देशमुख
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment