विशेष ;-गोवारी समाजाचा निवडणुकीवर बहिष्कार!
ब्रेकिंग:-विशेष:- गोवारी समाजाचा निवडणुकीवर बहिष्कार!
राजकीय पक्षांचे, उमेदवारांचे अचंबित करणारे दुर्लक्ष!
दीपक देशपांडे
नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली,या निवडणुकीच्या दिवशी २०नोव्हेंबर रोजी आम्ही एक दिवस जनतेच्या दरबारात, जनतेच्या मनातील कौल जाणून घेण्यासाठी ७२, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरुन जनतेला काय हवं आहे ह्याची खात्री करून घ्यावी यासाठी राखीव ठेवला होता.
नियोजित कार्यक्रमानुसार आम्ही आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि मोरवाही या गावात पोहोचलो असता,गावकऱ्यांशी चर्चा करताना या गावातील ७०९ मतदारांपैकी जवळपास २५० मतदार हे गोवारी समाजातील असून या गोवारी समाजाचा निवडणुकीवर बहिष्कार असल्याचे कळले, तेंव्हा अधिक माहिती घेतली असता, आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी या समाजाने यानिवडणुकीर बहिष्कार टाकला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नागपूर येथे विधानसभा अधिवेशनात २०१४साली आपल्या मागण्या घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजातील स्त्री पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते, आणि मोर्चेकरी विधानभवनावर धडकण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाच हा मोर्चा अडवण्यात आला आणि न जुमानणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी बेछूट लाठीमार करण्यात आला होता ,यात११४नागरिक शाहिद झाले होते तर मोठ्या प्रमाणात गोवारी समाजातील लोक जखमी झाले होते, यानंतर ज्याठिकाणी हा लाठीमार करण्यात आला त्या सिताबर्डी येथे तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलाला आदिवासी शाहिद गोवारी उड्डाणपूल असे नावही देण्यात आले मात्र ,इतर मागण्या मान्य करुन अजूनही गोवारी समाजाची गणना आदिवासी समाजात करण्यात आली नाही व समाजातील लोकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचे मत गोवारी समाजातील काही मंडळींनी व्यक्त केले , परिणामी समाजातील उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घातला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत फारशी कुठे चर्चा झाली नाही कारण या समाजातील पदाधिकारी यांनी आजवर निवेदने देऊन कित्येकदा चर्चा केली, असता दरवेळी आश्वासने दिली जातात,मात्र त्यांची पूर्तता केली जात नाही,यावर लक्ष वेधण्यासाठी आता आम्ही निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
प्राप्त माहितीनुसार मूल तालुक्यात व राज्यात गोवारी समाजातील बऱ्याच प्रमाणात लोकवस्ती असून या समाजातील लोक, शेळ्या मेंढ्या राखणे व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत,आताशा काही लोक वनजमिनीवर शेती करायला लागले असून मेहनतीने शेती व शेळीपालन करीत आदिवासींच्या सवलती मिळाव्यात यासाठी धडपडत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.अशा समाजातील लोकांनी टाकलेला बहिष्कार कोणत्याही राजकीय पक्षाने विचारार्थ घेतला नाही आणि या बहिष्काराची कुठेच चर्चा झाली नाही ,ह्याचेच फार आश्चर्य वाटत आहे.
एकीकडे एखाद्या समाजाने एका विशिष्ट राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर करताच दुसऱ्या दिवशी त्याच समाजाचा आम्हालाही पाठिंबा आहे हे दाखवून देण्यासाठी आटापिटा करीत रक्ताचे पाणी करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला या गोवारी समाजाचा हा बहिष्कार दिसलाच नाही की हेतूपुरस्सर असलेल्या वादात पून्हा हा नवीन वाद नको म्हणून जाणिवपूर्वक या बहिष्काराची कुठेच चर्चा करताना कोणी आढळला नाही.
एकीकडे एकेका जातीचा पूर्ण पाठिंबा मिळावा यासाठी झटणारे उमेदवारही यांपासून दूर कसे काय राहीले हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच.
एक दिवसाच्या प्रवासात आम्ही बऱ्याच गावात हा विषय छेडला आणि सर्वदूर गोवारी समाजातील बहिष्काराची माहिती आणि गोवारी समाजाचा बहिष्कार असल्याचा अनुभव घेतला,मग अशा स्थितीत छोट्या छोट्या गावातून ही बातमी मोठ्या नेत्यांपर्यंत कशी पोहोचवली नाही हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.
बघा यांतून काही मिळत असेल तर ... कारण हा समाज धनगर आणि गोंड समाजाच्या मध्ये अडून पडला असून अजूनही आपल्यावरील अन्यायाची जाणीव ठेवून मुकपणे आपल्या अधिकारांची लढाई लढतोय ,शासनकर्त्यांच्या आश्वासनांची पूर्ती होईलच या विश्वासाने.
आता लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे किमान या शासनाने आणि शासनकर्त्यांनी तरी हा विषय मार्गी लावावा ही समाजातील जनतेची मागणी आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment