घ्या समजून राजे हो !

 घ्या समजून राजे हो 

दि.. २३ नोव्हेंबर २०२४

महायुतीचे घवघवीत यश.. आणि महाआघाडीची दाणादाण.



अखेर आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आज लागलेले निकाल हे काहीसे अनपेक्षित असेच होते. या निवडणुकीत सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले आहेत. सर्व एक्झिट पोलने महायुती आणि महाआघाडी यांच्यात काटे की टक्कर राहील असे भाकीत केले होते. मात्र ते भाकित चुकीचे ठरवीत या निकालात महायुतीला अनपेक्षित असे घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीने हा लेख लिहीत असताना सायंकाळी पाच वाजता जवळजवळ २३५ जागांवर आघाडी निर्णायक मिळवली आहे तर महाआघाडी जेमतेम ५० जागांवर पडलेली दिसते आहे.

हा निकाल ऐतिहासिकच म्हणावा लागेल. कारण महाराष्ट्र विधानसभेत यापूर्वी सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीला एकदाच म्हणजे १९७२ साली २०० च्या वर जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वात  निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी २२२ जागा सत्ताधारी काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यानंतर कधीच सत्ताधारी पक्षाला इतके घवघवीत यश मिळाले नव्हते. त्यामुळेच हा निकाल ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल.


विधानसभा निवडणुकीच्या या निकालाने फक्त आता राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच ठरवले आहे असे नाही, तर इतरही अनेक मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. या निकालने  गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन मुद्द्यांवर आता जनतेच्या न्यायालयात निवाडा झाला आहे, ते म्हणजे खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा निर्णय जनतेनेच केला आहे, परिणामी शिल्लक शिवसेनेचे हीज मास्टर्स व्हॉईस खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचा आवाज आता बंद होणार आहे. 

या निवडणुका घोषित झाल्या त्यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत होते. विशेषतः महाविकास आघाडीचे खासदार संजय राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे सर्वच आता महाविकास आघाडी २३ नोव्हेंबरला घवघवीत यश मिळवून स्पष्ट बहुमताने संध्याकाळीच सत्तेचा दावा करण्यासाठी राज्यपाल महोदयांना राजभवनवर भेटायला जाणार आणि लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री ठरवून शपथविधी करणार अशा वल्गना करीत होते. त्यांच्या या सर्व पोकळ वलग्ना या "बालिश बहु बायकात बडबडला" या दर्जाच्याच होत्या हे सिद्ध झाले आहे. 

वर म्हटल्याप्रमाणे या निकालाने खरी शिवसेना शिंदे यांची की ठाकरेची हे सिद्ध झाले आहे असे वर नमूद केले आहेच, याला महत्त्वाचे कारण असे की शिल्लक शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परब, अरविंद सावंत हे सर्व नेते वारंवार विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग या सर्वांना खोटे ठरवीत आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यास उशीर केल्यामुळे त्यांच्यावरही दुगाण्या झाडीत आता आम्ही जनतेच्या न्यायालयातच न्याय मागणार असे सांगत होते. प्रसंगी हे सर्व महावीर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयालाही दोषी ठरवत होते आणि जनताच आम्हाला न्याय देईल असा दावा करत आमचीच शिवसेना खरी हा दावा नव्हे ही मुजोरी वारंवार करीत होते, मात्र त्यांचे हे दावे म्हणजे नागपुरी भाषेतील भांडी मुजोरी होती हे आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २० पेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत. त्यावरून जनतेने त्यांना किती स्वीकारले आहे हे दिसून येते आहे. 

शिवसेनेची अशी दुरावस्था का व्हावी हा खरोखरी चिंतनाचा विषय आहे. मात्र शिवसेना नेतृत्वाने म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी कधीच या विषयावर चिंतन केले नाही. ते महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरून चालत राहिले आणि त्याचीच परिणती आजच्या निकालात झाली आहे असे म्हणावे लागते. 

शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली केली. त्यानंतर शिवसेना झपाटून वाढत आधी मुंबई महापालिका, नंतर महाराष्ट्र विधानसभा अशी प्रगती करती झाली. १९८५ पर्यंत जी शिवसेना मराठी माणसाच्या हितासाठी झगडत होती, ती शिवसेना नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सक्रिय झाली. त्याच काळात तत्कालीन भारतीय जनता पक्षाने या शिवसेनेची युती केली आणि १९८९ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या. त्यावेळी भाजपला देशात आणि महाराष्ट्रातही चांगले यश मिळाले. शिवसेनेचेही चार खासदार लोकसभेत गेले. नंतर १९९० च्या विधानसभा निवडणुकीतही या युतीला चांगले यश मिळाले. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आले. नंतर अशीच प्रगती होत गेली आणि १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकारही सत्तारूढ झाले. साडेचार वर्ष या सरकारने कार्यभार सांभाळला. याच काळात केंद्रातही शिवसेनेला सत्तापदे मिळाली.

नंतर मात्र शिवसेनेचा ग्राफ हळूहळू घसरत गेला. १९९९ मध्ये महाराष्ट्रात युतीची सत्ताही गेली. शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळाले. हेच विरोधी पक्षनेतेपद त्यांना २००४ मध्ये जेमतेम टिकवता आले. 

मधल्या काळात शिवसेनेत फेरबदल झाले. उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष केले गेले. त्यानंतर आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणून ओळखले जाणारे राज ठाकरे हे काहीसे नाराज झाले. मात्र त्यांनी आपली नाराजी जाहीर केली नाही. याच काळात बाळासाहेबांचे विश्वासू असलेले नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे फाटले. परिणामी २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. नंतर राज ठाकरे यांचेही त्यांचे फाटले आणि २००६ मध्ये राज ठाकरेंनीही शिवसेना सोडली. राणे काँग्रेसमध्ये गेले आणि मंत्री झाले, तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. 

मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे थकत चालले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात सर्व कारभार चालला होता. परिणामी हळूहळू शिवसेनेला गळती लागत होती. २००९ मध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदही टिकवता आले नाही. भाजपपेक्षा जास्त जागा लढवूनही कमी जागांवर त्यांना विजय मिळाला. परिणामी भाजपचे एकनाथ खडसे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले.

२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर शिवसेनेची सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आणि स्पष्ट बहुमत घेऊन त्यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर चार महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यावेळी लोकसभेच्या निकालाच्या आधारावर आता शिवसेना आणि भाजपच्या जागांचे वाटप व्हावे अशी मागणी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. परिणामी भाजप आणि शिवसेना युती अखेरच्या क्षणी तुटली. दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर आपापले उमेदवार उभे केले. त्यावेळी भाजपला १२३ तर शिवसेनेला ६६ जागा विधानसभेत मिळाल्या. सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आणि सरकार स्थापनेनंतर शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली. सत्तेत आल्यावरही पुढील पाच वर्ष भांड्यांचा खडखडाटच चालू राहिला. 

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती झाली. लोकसभेत युतीला घवघवीत यश मिळाले. केंद्रात शिवसेनेला काही मंत्रीपदेही मिळाली. विधानसभाही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. अर्थात जागावाटपाचे सूत्र नवे होते. भाजपाला १०५ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. 

निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरे यांनी नवीनच मुद्दा उपस्थित केला. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अमित शहा यांनी शब्द दिला होता की पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले जाईल. ते देणार असाल तर आम्ही सत्ता स्थापनेला येतो असा पवित्रा त्यांनी घेतला. अर्थात ही मागणी त्यांनी फडणवीसांकडे फोनवर केली नाही तर पत्र परिषदेतून केली. फडणवीस त्यांना फोन करीत होते. मात्र उद्धव ठाकरे फोन उचलतच नव्हते अशी तक्रार फडणवीस यांनी केली. प्रत्यक्ष बोलणे न झाल्याने गाडे पुढे सरकले नाही आणि दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी संधान बांधले. शरद पवारांच्या मदतीने त्यांनी काँग्रेसचाही सहभाग मिळवला आणि महाविकास आघाडी गठीत करून सरकार बनवले. या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांनी अडीच वर्षे म्हणजेच जून २०२२ पर्यंत कारभार चालवला. 

शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेने काँग्रेस बरोबर जाण्यास ठाम विरोध होता. उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवण्यासाठी नेमके तेच केले. त्यामुळे शिवसेनेचा समर्थक असलेला सामान्य नागरिक कुठेतरी दुखावला होता. हा नागरिक तेव्हापासूनच शिवसेनेपासून दूर जायला सुरुवात झाली होती. त्यात उद्धव ठाकरे सत्तारूढ झाल्यावर कोरोनाची साथ आली. त्या काळात उद्धव ठाकरे यांनी घरात बसूनच राज्यकारभार चालवला. त्यामुळेही जनतेची त्यांच्यावर नाराजी होती. इतकेच काय तर शिवसेनेतील आमदारही त्यांच्यावर नाराज होते. परिणाम स्वरूप जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात २० जून रोजी ५० आमदार मुंबईतून निघून गुजरातीत गेले आणि तेथून गोहत्तीला जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला. परिणामी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडून परत आले. ३० जून रोजी एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह गोवामार्गे मुंबईत परतले आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला. ३० जून च्या संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

नंतरच्या काळात हे असे का घडले याचे आत्मपरीक्षण करणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता ते एकनाथ शिंदेंचा मिंधे असा उल्लेख करीत कायम त्यांच्यावर गद्दार म्हणून टीका करीत राहिले. आणि संपूर्ण महाराष्ट्र माझ्या पाठीमागे आहे असा दावा करीत फक्त शिंदेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासह विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या इतर तपासी यंत्रणा यांच्यावर टीका करणे आणि त्यांना भाजपचे गुलाम समजणे असे करण्यातच त्यांनी धन्यता मानली. परिणामी जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना हळूहळू उतरत गेली. या काळात एकनाथ शिंदे यांनी आता संपूर्ण शिवसेना ही माझ्या पाठीशी आहे असा दावा करीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख या पदावरून दूर करीत स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घोषित केले होते. त्यांचा हा दावा विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने ग्राह्य धरला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकाळ त्यावर निकाल देणे टाळले होते. त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असेच चित्र तयार झाले होते. 

या सर्व प्रकारात एकनाथ शिंदे दावा करीत होते की आम्ही बाळासाहेब यांच्या  तत्त्वावर चाललो आहोत.उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची उमरखेड झिजवले आहेत. तर  उद्धव ठाकरे यांचा दावा होता की मिन्ध्याने माझा फक्त पक्षात चोरला नाही तर माझा बापही चोरला आहे. त्याच्यात दम असेल तर त्याने आपल्या बापाचा फोटो लावून निवडणूक लढवावी असे आव्हानही उद्धव ठाकरे वारंवार देत होते. 

उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे हे वर्तन सर्वसामान्य जनतेला कुठेतरी दुखावणारे होते. एक तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांची तत्वे बासनात गुंडाळून ठेवली आणि मनोहर जोशींसारखे जुनी माणसे दुखावली. हे बघून शिवसेनेचा समर्थक मतदार आधीच त्यांच्यापासून दूर जात होता. त्यात एकनाथ शिंदेंनी समांतर शिवसेना उभी केली तेव्हापासून मतदार त्यांच्या बाजूला जाऊ लागला. एकनाथ शिंदेंनी सत्ताकाळात जे काही काम केले तेही जनसामान्यांना कुठेतरी सुखावणारे होते. त्यामुळे की काय, मतदार यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडे वळला असा निष्कर्ष काढता येतो. 

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या टारगेटवर भारतीय जनता पक्ष हा देखील सातत्याने होता. त्यात देवेंद्र फडणवीस हे त्यांचे सॉफ्ट टारगेट होते. सातत्याने फडणवीसांवर ते टीका करीत होते. यानेही सर्वसामान्य मतदार कुठेतरी दुखावत होता परिणाम स्वरूप भाजपलाही घवघवीत यश मिळाले आहे. त्याचवेळी शिवसेनेची पूरती दाणादाण झाली आहे. 

जून २०२२ मध्ये शिवसेनेची दोन शकले झाली, तर २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन तुकडे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे करून ४० आमदार सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस बरोबर महायुतीत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तर त्यांच्या इतर ९ सहकाऱ्यांनाही शपथ दिली गेली. हा शरद पवारांनाही धक्का होता. 

शिवसेनेच्याच धर्तीवर अजित पवार यांनीही पक्ष माझ्या पाठीमागे आहे असे सांगत शरद पवार यांना बेदखल करीत स्वतःला पक्षाध्यक्ष घोषित केले आणि स्वतःची कार्यकारिणी घोषित केली. त्यांचा हा दावा देखील विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य मानला. निवडणूक आयोगानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजप पक्ष फोडतो अशी बदनामी काँग्रेस शिवसेना शिल्लक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे करू लागले. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यात हाच मुद्दा त्यांनी लावून धरला होता. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आरक्षण हटवण्याचा मुद्दा पुढे केला आणि परिणामी महायुतीची काहीशी पीछेहाट झाली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्याचे पुरते उट्टे महायुतीने काढले आहे. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील २० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आणि अजित पवारांना जवळजवळ ४० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत. परिणामी खरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत आहे हे महाराष्ट्रातील मतदारांनीच सिद्ध केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी पूर्वीच्या तुलनेत काहीशी चांगली राहिली होती. त्यामुळे यावेळेस आपण सहभागी असलेल्या महाआघाडीला घवघवीत यश मिळणार आणि आपला मुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस पक्ष करू लागला होता. त्यात विजय वडेट्टीवार ,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे सर्वच मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसची ही अतिशय दाणादाण उडाली आहे. काँग्रेसला देखील वीस २० पेक्षा कमीच जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात आता सध्या तरी काँग्रेस आजके देते आहे असे चित्र या क्षणी तरी दिसते आहे. 

या निकालामध्ये अजूनही बारकावे आहेत मात्र ते स्वतंत्र लेखाचे विषय आहेत आज शिल्लक शिवसेना आणि शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस यांची दाणादाण होण्यामागे कारण मिमांसा काय हाच मुद्दा घेऊन या लेखाची आखणी केली होती त्यानुसार ही मते मांडली आहेत इतर मुद्द्यांवर यथावकाश लिहिता येईलच. मात्र महाराष्ट्रातील मतदारांनी आपली भावना या मतदानातून स्पष्ट केली आहे हे या निकालाने सिद्ध झाले आहे इतकेच आज म्हणता येईल. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये हा इशारा देखील जनतेने राजकीय पक्षांना दिला आहे हेही या निकालातून दिसून आले आहे.


वाचकहो पटतेय का तुम्हाला हे?

 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो....

अविनाश पाठक 

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.