निवडणूक आखाडा:-काॅंग्रेस विरुद्ध काॅंग्रेस
निवडणूक आखाडा:-काॅंग्रेस विरुद्ध काॅंग्रेस
दीपक देशपांडे
७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात दिनांक ६/११/२०२४ पासून प्रचार ज्वर वाढू लागला असून विविध उमेदवार एकदम जय्यत तयारीनिशी या निवडणूक आखाड्यात आपल्या आजवरच्या कार्याचा आढावा देत मतांचे दान आपल्या पदरात पडावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रचाराची सुरुवात करताना काॅंग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक रणसंग्रामात उतरलेल्या अभिलाषा गावतुरे यांनी प्रचंड जनसमुदायासह भव्य रॅली काढली होती तर भरगच्च भरलेल्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आपल्या संशोधनात महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजे विशेष करून काॉंग्रेसच्या वतीने तिकीट नाकारल्याने महायुतीच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी चालवलेला हा छुपा डाव असल्याचे जाहीर करीत आपण बहुजनांच्या प्रश्नाला हात घालून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली असल्याचे स्पष्ट करीत बहुजन व ओबीसी समाजाने आपल्याला सहकार्य करावे व त्यासाठी केटली या बोधचिन्हासोबत ही निवडणूक लढवत असून जनता आपल्या सोबत असल्याचा दावा केला.
यांच्या विरुद्ध ...
प्रकाश पाटील मारकवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तो शांतपणे, आपल्या प्रचाराची सुरुवात केली लोकसभा निवडणुकीपासून तीही शांतपणे आणि आताही प्रचाराची धुरा सांभाळत आहेत शांतपणे त्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांवर ध्वनीफित लावून आपल्या आजवरच्या कार्याचा आणि मतदारांनी टेबल या बोधचिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत शांतपणे ,असा हा हरहुन्नरी कलावंत , काॅंग्रेसी नेता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने खचून न जाता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन आपल्या यशाची कामना करीत आहे, शांतपणे.
यांच्या विरुद्ध...
काॅंग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी मूलसह ग्रामीण भागात आपले लक्ष केंद्रित केले असून ते पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ,तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील एका जाहीर सभेतून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला असून सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे, मात्र अंतर्गत विरोध दररोज नवीन समस्या निर्माण करीत आहेत, परिणामी कुठे जवळचीच मंडळी आपल्याला हात दाखवतील काय?यांची चिंता आहे ,आणि म्हणूनच कुठेतरी यांचे खापर विरोधकांवर फोडण्यासाठी ते विरोधक मानसिक स्वास्थ बिघडवण्याचा आरोप विरोधकांवर करताना दिसताहेत.
म्हणजे खरेतर काॅंग्रेसने काॅंग्रेसला काॅंग्रेसी उमेदवार उभे करुन आपापसात एक लढाई सुरू केली असून या तिन्ही काॅंग्रेसी उमेदवारांची लढाई ही आधी एकमेकांविरुद्ध आणि नंतर महायुती च्या सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत होऊ घातली आहे.
तर..
सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि आपापसातील विरोधाभास दूर करुन प्रचाराची धुरा सांभाळत युती धर्म जर व्यवस्थित पाळला गेला तर सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याला या मतदारसंघात तोड नाही ,व सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी केलेल्या कार्याची आणि सहकार्याची वेगळी जाणिव करुन देण्याची आवश्यकता नाही.
यांशिवाय इतर अपक्ष व वंचित सह इतर प्रादेशिक पक्षांचे उमेदवार या लढतीत कुठे असतील हे सांगता येत नाही परंतू आता ही लढाई काही उमेदवारांनी आपल्या अस्तित्वाची आणि आजवरच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या सभा , आरोप प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण होणारी जनतेची सहानुभूती व मिळणाऱ्या आश्वासनांची पूर्तता कोण करु शकेल याबाबतचा विश्वास येत्या निवडणुकीत यशाचा मार्ग सुकर करणार याबाबत दूमत नाही.
त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ज्ञोणार हे निश्चित.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment