निवडणुकीच्या आखाड्यात....एक दिवस जनतेच्या दरबारात!

 निवडणुकीच्या आखाड्यात...एक दिवस जनतेच्या दरबारात!


दीपक देशपांडे 

२०नोव्हेंबर! महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४चा मतदानाला दिवस!

सकाळचे ६.४५ झालेले , आम्ही ७२, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील ९९आणि १०० क्रमांकाचे मतदान केंद्रावर पोहोचलो तेव्हा  या केंद्रावर मतदारांची बऱ्यापैकी उपस्थिती होती,त्यात महिला व पुरुष मतदारही आपल्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी उपस्थित होऊन रांग लावून प्रतिक्षा करीत होते.

मतदान अधिकाऱ्यांनी प्राथमिक व्यवस्था पूर्ण करुन उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएम ची तपासणी पूर्ण केली होती ,या मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यांशिवाय तिसरा डोळा प्रत्येक क्षण टिपत होता.

मतदान केंद्र क्रमांक ९९वर आम्ही पहिल्या मतदाराचे छायाचित्र घेण्याची विनंती केली ती उपस्थित पोलिसांनी फेटाळली,  तिसरा डोळा सुरु असून आम्हाला  कुणालाही मोबाईल घेऊन आत सोडण्यास मनाई  असल्याचे  त्यांनी सांगितले, हरकत नाही म्हणत आम्ही मतदान  केंद्राबाहेर आल्यावर  आम्ही सेल्फी पाईंटवर त्यांचे छायाचित्र घेतले , तिकडे मतदान केंद्र क्रमांक १००वर मतदारांची रांग वाढतच होती ,मात्र निवडणूक प्रक्रिया काही सुरु होत नव्हती,इथे माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे , डॉ.राममोहन बोकारे यांचेसह बरेच  मतदार प्रतिक्षा करीत होते,अखेर ७.१५वाजता त्यांना आत सोडले गेले आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली. या केंद्रावर पहिल्या मतदानाचा मान महिला मतदारांनी बजावला. याच केंद्रावर कुणाचे नाव  मतदार यादीत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या .

काही काळानंतर आम्ही मतदान केंद्र क्रमांक १०१, आणि १०२ला भेट दिली , मतदान शांततेत पार पाडण्यासाठी उपस्थित मतदान अधिकारी प्रयत्न करीत होते, मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती.

येथून आम्ही परत एकदा मतदान केंद्र क्रमांक ९९, आणि १००ला भेट दिली असता मतदान सुरळीत सुरू होते ,रांगा लागल्या होत्या,मात्र येथील सेल्फी पाईंट गायब करण्यात आला होता.

आम्ही मूल शहर सोडून मूल तालुक्यातील अचानक चर्चेत आलेल्या कोसंबी गावात दाखल झालो तेव्हा मतदान केंद्रावर तुरळक रांगा लागल्या होत्या,मात्र मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती, मतदान केंद्राबाहेर दारुच्या नशेत आरडाओरडा करणाऱ्या एका इसमाला त्याची पत्नी हात धरून नेत असल्याचे आढळून आले. तर रस्त्यावर काही  लोक  दारू पिऊन लोळत असतांनाही पाहिलेत  तर परतीच्या प्रवासात वाटेत शेतात धानाची कापणी करणाऱ्या महिला आढळल्या , आम्ही त्यांना मतदान केले काय?असा प्रश्न केला असता सकाळीच सात वाजता मतदान करुनच कामाला आल्याचे त्यांनी सांगितले,हा उत्साह बघून जनता आपल्या  मतदानाच्या अधिकाराप्रती जागरुक  असल्याचे दिसून आले.

आजवर काहिसे आडमार्गावर असलेल्या मोरवाही या गावाला जाण्यासाठी  उमा नदीवरील नवीन पूलावरुन जाताना हा पूल सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याची बाब लक्षात आली , आणि मोरवाही वासी यांना बारमाही रस्ता इतक्या  वर्षांच्या  प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर  उपलब्ध झाल्याचे समाधान मोरवाही गावात गेल्यानंतर जनतेशी चर्चेदरम्यान दिसून आले. मात्र या गावात गेल्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब लक्षात आली,  ती म्हणजे या गावात गोवारी समाज मोठ्या प्रमाणात असून गावातील मतदारसंख्येच्या जवळपास ३५%मतदार या समाजाचे असून या समाजाने निवडणूकीवर बहिष्कार टाकलेला आहे, आणि  हा बहिष्कार संपूर्ण महाराष्ट्रात आहे ,मात्र निवडणूक काळात याबाबींकडे कुठल्याही राजकीय पक्षांनी आणि मतदार जनजागृती दरम्यान शासन प्रशासनाने  लक्षच दिले नसल्याचे वास्तवही पुढे आले ,उर्वरित मतदान प्रक्रिया शांततेत परंतू  संथगतीने सुरू होती,यांचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महिला  कापणीसाठी  सकाळीच शेतीवर गेल्या असल्याने त्या दूपारनंतर काम आटोपून मतदानाला येतीलच असे सांगण्यात आले तोपर्यंत गावातील उपलब्ध महिला आणि पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील असेही सांगण्यात आले.यादरम्यान काॅंग्रेस व महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी या केंद्रावर दाखल झाले होते , या मतदान केंद्रावर पाय कापलेल्या एका मतदाराने  व्हीलचेअर वरुन मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.  निवडणूक  आयोगाने  व्हिलचेअरची  व्यवस्था  सर्वत्र केली होती.   यावेळेपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता.

येथून आम्ही चिखली गावात दाखल झालो, इथे आम्हाला  दोन मतदान केंद्र आढळून आले,या मतदान केंद्रावर एक वेगळाच अनुभव आम्ही घेतला ,या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मात्र मतदारांना घेऊन येणारी वाहने थेट मतदान केंद्र परिसरात आणली जात होती, आणि त्यावर कुणी आक्षेप घेत नव्हते की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांना  या वाहनांनी कां आणले जात आहे याची विचारणा कुणी करत होते, जणू काही हे ठरलेलेच होते आणि यांची सगळ्यांना माहितीच होती.


आमचा पुढचा प्रवास डोंगरगावच्या दिशेने सुरू झाला , जाताना आम्हाला डावीकडे एक नवीन रस्ता दिसला तो रस्ता  नागपूर मार्गावरील गावांना उश्राळा,भादूर्णा ,पडझरी या काहिसा जंगल व्याप्त गावांशी जोडणारा आणि उमा नदीवरील पुलामुळे बारमाही रस्ता उपलब्ध झाल्याचे ऐकिवात होते , त्या मार्गाने जायचेच हे ठरवून आम्ही डोंगरगाव गाठले.

डोंगरगाव इथे मतदानाचे दोन केंद्र होते या  दोन्ही केंद्रावर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या, त्यापैकी एका केंद्रावर सावलीसाठी  सोय करण्यात आली होती  तर दुसऱ्या केंद्रावर झाडांची सावली होती,मात्र या दोन्ही केंद्रावर वयोवृद्ध मतदारांसाठी बसण्याची कुठलीही सोय करण्यात आली नव्हती, परिणामी बऱ्याच वयोवृद्ध महिला खाली जमीनीवर बसलेल्या आढळून आल्या , अनासायास या केंद्रावर  आम्हाला या निवडणुकीत अप‌क्ष उमेदवार असलेल्या डॉ अभिलाषा गावतूरे यांची भेट झाली, तेव्हा आम्ही त्यांना  याबाबत अवगत करून देत निवडणूक अधिकारी यांनी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्याची सुचना करण्याची विनंती केली ,मात्र बरोबर आहे त्यांनी ती करुन  द्यायला हवी,आम्ही मूलला तशी सोय करायला लावली असे म्हणत त्या अचानक अशा काही गायब होऊन गेल्या ,की त्या  आल्या होत्या की नाही  हे कळलेच नाही तेंव्हा आम्ही निवडणूक अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली व याबाबत योग्य उपाययोजना करण्याची विनंती केली, तेव्हा  गर्दी  इतकी  आहे की  आम्ही कुठे कुठे लक्ष द्यायचे,ही स्थानिक लोकांची जबाबदारी आहे असे म्हणत  विषय टाळण्याचा प्रयत्न केला, खरेतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे आम्ही यांची तक्रार करु शकलो असतो परंतु आम्हाला यावर वाद करायचा नव्हता तर तोडगा काढायचा होता, तेव्हा आम्ही डोंगरगावच्या सरपंच शिल्पा भोयर यांना याविषयी माहिती दिली व तातडीने सोय करण्याची विनंती केली,यावर तातडीने त्यांनी बेंचेस लावून महिलांना बसण्याची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. आमच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो, आणि.... राजोली या बऱ्यापैकी मोठ्या गावात पोहोचलो , एकाच ठिकाणी ३मतदान केंद्र असूनही येथील व्यवस्था बघूनच समाधान वाटले,येथील निवडणूक अधिकारी संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते , पिण्याच्या पाण्याची , बसण्याची , रांगांची सारी व्यवस्था अतिशय उत्तम रितीने हाताळत होते, मतदारही समाधानी होते, सकाळपासून एकसारखी गर्दी असूनही कुठे कशाचा त्रागा नाही की चिडचिड नाही शांतपणे मतदान सुरू होते , गावातील चौथ्या केंद्रावर भेट देण्याचे टाळून आम्ही  आधी ठरवलेल्या मार्गाने जंगल व्याप्त गावांमध्ये भेट देण्यासाठी निघालो.

 राजोलीवरुन पेटगावमार्गे भादूर्णा उश्राळा हा प्रवास आम्ही सहज करु शकलो असतो  परंतू तो टाळला आणि राजोली डोंगरगाव मार्गे आम्ही उमा नदीवरील नवीन पुलावरून भादूर्णा गावात दाखल झालो, जाताना  मार्गात नदी, नदीकाठच्या  शेतजमिनी , त्यामध्ये  नवीन  तंत्रज्ञानाचा वापर करुन धानाची मळणी सुरू असल्याचे  बघतांना समृद्ध भारताचे स्वप्न  साकारणारे शेतकरी बघून समाधान वाटले, मात्र ही वेळ  केवळ या नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने शक्य झाल्याचे ऐकून सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकुशलता व विकासाची परिभाषा यावर किती लक्ष असले पाहिजे याची कल्पना आली .  भादूर्णा गावात मतदानासाठी मोठ्या रांगा असल्या तरीही झाडांची सावली असल्याने उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता, पाण्याची , बसण्याची सोय उपलब्ध होती ,पडझरी या जंगलाने चारी बाजूंनी  वेढलेल्या गावातील लोकांना  येण्याजाण्यासाठी पक्का रस्ता झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले व रस्ता दाखवला ,या गावातील मतदान ही इथेच भादूर्णा गावातच होते , रांगा वाढत होत्या कामावरून परतलेल्या महिला आपला मतदानाचा हक्क बजावायला मतदान केंद्रावर येऊन रांगा लावत होत्या. मतदान शांततेत पार पडत होते , परिसरात कुठेही गोंधळाचे वातावरण नव्हते.

येथून आम्ही पोहोचलो,मारोडा गावात ,येथे वेगवेगळ्या तिन्ही  केंद्रावर गर्दी सकाळपासून कायम असल्याचे सांगितले गेले ,व तो उत्साह आम्ही प्रत्येक केंद्रावर अनुभवतच होतो.

 मतदारांचा उत्साह आणि मतदानासाठी आवर्जून उपस्थित राहण्याची धडपड प्रकर्षाने जाणवत होती.मतदाता स्पष्टपणे आपले मत दर्शवीत नव्हता म्हणण्यापेक्षा  आम्ही कुणाला बोलते करण्याचा प्रयत्नच  केला नाही मात्र महिलांचा दांडगा उत्साह न बोलताही  त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येत होता.

येथून आम्ही करवन-काटवन या जंगलातील गावाला भेट देण्यासाठी निघालो मात्र मूल शहरात गांधी चौकात काहीतरी मोठी घटना घडल्याची माहिती मिळताच ती भेट टाळून थेट मूल गाठले.

मूल शहरातील गांधी चौकात शेकडो लोकांचा जमाव आणि आरोप प्रत्यारोप करीत जमलेला जमाव काहीतरी मोठी घटना घडल्याची ग्वाही देत होते , घटनास्थळी  जि.प.प्राथमिक शाळेतील  केंद्रावर मतदान असणाऱ्या  मतदारांना  पैसे वाटपावरून काॅंग्रेस व भाजपचे कार्यकर्ते  यांच्यात  झालेल्या वादातून हा जमाव जमल्याची बाब पुढे आली, त्यासाठी महायुती व भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी व मुलगी यांना मूलला यावे लागले होते,ही घटना उर्वरित निवडणुकीत प्रभाव दाखविल्या शिवाय राहणार नाही याची खात्री पटली  वातावरण मात्र पेटले होते ,शांत मूलची ओळख कुठेतरी लोप पावत चालल्याची ही नांदी होती .

याकडे थोडे दूर्लक्ष करीत आतापर्यंतच्या प्रवासाचा शीण घालवण्यासाठी आम्ही थोडे रिलॅक्स होण्यासाठी निवांत झालो ना झालो तर  नवभारत विद्यालयाच्या समोर  काॅंग्रेस व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात पुन्हा वादविवाद झाल्याची घटना घडली आणि पुन्हा एकदा घटनास्थळी धाव घेतली.वातावरण तापलेले, निवडणूक मतदानाची वेळ जवळ येऊन ठेपलेली ,चहा टपरीवर चहाचा घोट घेऊन लोक चघळत असलेल्या गोष्टींचा आनंद घेतला , घटना घडली कशी , आणि ती पुढे जाताना हातचे जोडून तिखट मिठ लावून ती इतरांपर्यंत पोहोचते कशी यांचा अनुभव घेतला.

दिवसभरात झालेला प्रवास , प्रत्यक्ष आलेला अनुभव  , निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय , प्रत्यक्ष जमीनीवर त्याची अंमलबजावणी , अंमलबजावणी करताना झालेले दुर्लक्ष ,कुणी तक्रार करायला पुढे न येणे , उमेदवारांचे कर्तव्य व अधिकार , मतदारांचे अधिकार , अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात केलेली कुचराई ,नको त्यापेक्षा अधिक कडक निर्बंध घालण्याची पद्धत , नियमांची पायमल्ली होतांना शांतपणे वावरणे ,कुणी विचारणा केली तर आम्ही कुठे लक्ष द्यायचे असे म्हणत टाळाटाळ करणे , उमेदवार  व त्यांचे प्रतिनिधी  यांचे वर्तन ,एक दिवसाच्या  निवडणुकीसाठी आजवर जोपासलेल्या संबंधांना  मातीमोल करीत कायम शत्रूत्व स्विकारण्याची रित  या साऱ्या प्रकारांचा अनुभव यानिमित्ताने घेता आला.......हां हा सारा प्रकार बघितल्यावर तातडीने काही लिहावे असे नाही वाटले ,कारण एव्हाना  मतदान संपले होते,मात्र अंतिम आकडेवारी उपलब्ध व्र्हायचीच होती, त्यामुळे  रात्र शांततेत काढली.

सकाळी सकाळी तीच ती री ओढण्याचे टाळून थोडे उशिरा हात लावून कालचा प्रसंग रेखाटला आहे.

यांतील सारेकाही केवळ आणि केवळ अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन आहे,हे कुणी आणि कसे घ्यायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, यांतून कुणावर टिका टिप्पणी करणे ,वा कुणाला कमीअधिक मानने हा आमचा उद्देश नव्हता आणि नाही.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.         ✍️Ddbatmi@m2m✍️






Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.