आठवलं ते सांगितलं... , छोटूभैय्या" नावाचा "मोठा" माणूस ....!
आठवलं ते सांगितलं...
छोटूभैय्या" नावाचा "मोठा" माणूस ....!
अविनाश पाठक, नागपूर
मध्य भारतातील एक आघाडीचे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व प्रभाकरराव उपाख्य भैय्यासाहेब उपाख्य छोटूभैय्या मुंडले यांनी मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता वयाच्या ८६व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली.
प्रभाकरराव हे सामाजिक क्षेत्रात भैय्यासाहेब म्हणून तर निकटवर्ती मित्रमंडळी आणि नातलगांमध्ये छोटूभैय्या म्हणून ओळखले जायचे. माझा त्यांचा परिचय छोटूभैय्या म्हणूनच झाला होता. मला आठवते १९७९-८० या काळात मी वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. माझे वडील विष्णूपंत पाठक त्यावेळी कृषी विद्यापीठात नोकरीला होते. वडीलांचे एक सहकारी दत्तोपंत मुंडले हे छोटूभैय्यांचे बंधू, त्यांच्याच मुळे आमचा छोटूभैय्यांशी संबंध आला. त्यावेळी दत्तोपंत छोटूभैय्या असा उल्लेख करायचे. म्हणून मी देखील त्यांना छोटूभैय्याच म्हणायला लागलो.
भैय्यासाहेब हे जरी निकटवर्तीयांमध्ये छोटूभैय्या म्हणून ओळखले जात होते. तरी प्रत्यक्षात मात्र हे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने मोठा माणूस होते. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले गेलेले भैय्यासाहेब जसे एक यशस्वी उद्योजक होते तसेच ते सामाजिक, शैक्षणिक क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये ते एक यशस्वी संघटक म्हणून देखील त्यांनी लौकिक मिळवला होता. कोणत्याही चांगल्या कामात मदत करायला ते कायम तयार असायचे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांचे पदाधिकारी छोटूभैय्यांना आर्थिक मदतीसाठी विनंती करायचे. त्यावेळी ते या संस्था आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होतील यांचे नियोजन करून ते राबवायचे आणि संस्था पूर्णपणे सक्षम करूनच ते बाजूला व्हायचे. नागपुरात खूप वर्षांपासून कार्यरत असलेल्या अंध विद्यालय या संस्थेचे छोटूभैय्या अध्यक्ष झाले. ही संस्था लोकांच्या देणग्यांच्या आणि सरकारी अनुदानाच्या जोरावर कशीबशी चालायची. संस्थेजवळ मोठी जागा होती . तिथे भैय्यासाहेबांनी एका विनाअनुदानित सी बी एस ई पब्लिक स्कूल सुरू केले. तिथे भरपूर शैक्षणिक शुल्क देऊन विद्यार्थी दाखल होऊ लागले. शाळेचा खर्च जाऊन उरणारा पैसा अंध विद्यालयात वापरला जाऊ लागला. शिवाय त्याच परिसरात छोटूभैयांनी पुढाकार घेऊन एक मोठे सभागृह आणि एक लहान सभा दालन बांधून दिले. ही दोन्ही सभागृहे नियमितपणे विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येऊ लागली. त्यातून देखील अंध विद्यालयाला उत्पन्नाचा त्यांनी नियमित स्त्रोत उभा करून दिला. जसे अंध विद्यालय त्यांनी स्वयंपूर्ण केले तसेच प्रयोग त्यांनी धरमपेठ शिक्षण संस्थेतही केले. विदर्भ क्रिकेट असोसिएशन देखील अशीच स्वयंपूर्ण झाली. एकूणच नवीन नवीन कल्पना डोक्यात घेत त्या अमलात आणून संस्था पुढे कशा न्यायच्या हे तंत्र छोटुभैयांना अतिशय चांगले गवसले होते.
छोटूभैया आघाडीचे बांधकाम व्यावसायिक म्हणून गाजले होते. मुंडले परिवार हा मध्यमवर्गीयच होता. त्यांचे वडील हे देखील नोकरी करून घर चालवणारेच होते. त्यामुळे त्यांचे सर्व भाऊ शिक्षण पूर्ण होताच सरकारी नोकऱ्यांमध्ये रुजू झाले होते. मात्र छोटूभैय्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यांनी इंजीनियरिंगचा डिप्लोमा घेतला आणि मग खाजगी बांधकाम कंत्राटे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी कंत्राटांसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होता. त्यांनी आपल्या सर्व भावांची मदत घेतली. भावांना सरकारी नोकरीत प्रत्येक सणाला जो ॲडव्हान्स मिळायचा तो छोटूभैय्या आपल्या व्यवसायासाठी वापरायचे. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात बाहेरून वेगळे कर्ज घेण्याची त्यांना गरज पडली नाही.
व्यवसायात स्थिरावताच त्यांनी व्यवसायासोबत सामाजिक कार्यात देखील रस घ्यायला सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवे स्वयंसेवक होते. त्यामुळे संघाशी संबंधित संस्थांमध्ये ते सक्रिय होते. त्याचसोबत त्यांनी इतर संघटना आणि संस्थांशी चांगले संबंध ठेवले. त्यामुळे सर्वच समाजात ते लोकप्रिय झाले होते. त्यांचा व्यापक असा जनसंपर्क होता. आम्ही बिघडलो हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता. नागपूरच्या दैनिक तरुण भारत चालवणाऱ्या नरकेसरी प्रकाशन संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. या संस्थेलाही एक नवे रूप देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न ठरला.
अशा या छोटूभैय्या नावाच्या मोठ्या माणसाशी माझेही व्यक्तिगत स्नेहबंध जुळले होते. केव्हाही फोन केला तरी त्यांचा तत्काळ प्रतिसाद मिळायचा. कुठेही भेटले की आवर्जून चौकशी करायचे. कोणत्याही संदर्भात माझ्याबाबत काही माहिती कळली की आवर्जून त्यांचा फोन येत असे.
असं हा छोटूभैय्या नावाचा मोठा माणूस अखेरच्या क्षणापर्यंत समाजासाठीच झटत होता. त्यामुळेच फक्त नागपूरच नव्हे तर मध्य भारतात एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता.
क्रिकेट प्रेमी असलेल्या छोटूभैय्यांनी आपली ८६ वर्षाची यशस्वी खेळी खेळून दोन दिवसांपूर्वीच बॅट खाली ठेवत आयुष्याच्या मैदानातून एक्झिट घेतली आहे. त्यांच्या पुण्यपावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
अविनाश पाठक..
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment