आरसा/ पैसे वाटण्याची अहमहमिका !

 आरसा/विनोद देशमुख

पैसे वाटण्याची अहमहमिका !


अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीतील सर्वात गाजलेले, तरीही अंतिमत: अपयशी ठरलेले दोन शब्दप्रयोग होते- संविधानात बदल आणि टकाटक... खटाखट...! "अबकी बार मोदी चारसौ पार" झाले तर ते संविधान बदलविणार असल्याचा धुरळा इंडी आघाडीनं देशभर उडवला. त्याचा परिणामही झाला. रालोआ चारसौ पार सोडा, तीनसौ पारही जाऊ शकली नाही आणि भाजपा एकटी तर अडीचशेच्या आतच गुंडाळली गेली. परंतु तरीही इंडीला सरकार बनवता आलं नाही. रालोआ आणि मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले. संविधान बदलाची हूल त्याअर्थानं वाया गेली ! इंडी आघाडीला फक्त विरोधी पक्षनेतेपदावरच समाधान मानावं लागलं !!


"टकाटक... खटाखट..." या घोषणेचंही तसंच झालं ! महिला आणि बेरोजगार युवकांना कॉंग्रेसनं रोख रक्कम वाटण्याचं हे आमिष दाखवलं होतं. "आमचं सरकार आलं तर प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये आणि बेरोजगार युवकांना एक लाख रुपये भत्ता दिला जाईल", असं कॉंग्रेसनेते राहुल गांधी प्रत्येक जाहीर भाषणात सांगत देशभर फिरले. "कोऱ्या करकरीत नोटा देऊ" हे सांगण्यासाठी त्यांनी टकाटक शब्द वापरला, तर रक्कम दरमहा देण्यासाठी खटाखट ! "एक जुलैसे हर महिना ८५०० रुपये खटाखट. ऑगस्टमे खटाखट... सप्टेम्बरमे खटाखट... ऑक्टोबरमे खटाखट..." असं ते हातवारे करत सांगायचे. ते पाहून देशभरातील अनेकांनी त्यांची टिंगलही केली. हा खटाखट नुस्खाही चालला नाही.


पण, महाराष्ट्राच्या येत्या विधानसभा निवडणुकीत हेच दोन पत्ते कॉंग्रेस पुन्हा खेळणार, हे दिसत आहे. कारण, लोकसभेत त्यांना मिळालेलं अपूर्व यश ! गेल्या लोकसभेत त्यांचा एकमेव खासदार होता. यावेळी अधिकृत १३ आणि एक बंडखोर असे १४ खासदार निवडून आले. अविश्वसनीय १४ पट यश ! गेल्या वेळी संपुआचे ४८ मध्ये ६ खासदार (४ राष्ट्रवादी, १ राजू शेट्टी) होते. यंदा मविआचे पाचपट, ३१ (उबाठा शिवसेना ९, शरद पवार राष्ट्रवादी ८) आले. मोदी-भाजपाचा वारू रोखण्यात उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्रही आघाडीवर राहिला.‌ म्हणजे आपली मात्रा लागू पडली, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. त्यातूनच ते हाच प्रचार आणि हेच आश्वासन विधानसभा निवडणुकीतही पुढे करण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त १५०० रुपये महिना देणे हा त्यांचा अपमान आहे. आम्ही सत्तेत आलो तर दरमहा ८५०० देऊ, असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत बोलताना केलं. या मुद्यावरून महिला मतदारांना फितविण्याचा आणखी एक प्रयत्न विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्याला महायुती सरकारचे घटकपक्ष कसं तोंड देतात, ते पाहायचं.

अशा पद्धतीची रोख मदत किंवा आर्थिक माफी यासंबंधीचा काँग्रेसचा इतिहास महाराष्ट्रात तरी चांगला नाही ! २००४ च्या निवडणुकीच्या प्रचारात "शेतकऱ्यांना वीजबिलमाफी देण्याचं" आश्वासन द्यायचं भाजपा-शिवसेना युतीनं पुष्कळ आधी ठरवलं होतं. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक घोषणेच्या आधीच एका भाषणात हे गुपित उघड करून टाकलं ! त्याचा परिणाम असा झाला की, तेव्हाचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीच "शेतकऱ्यांना शून्य वीजबिल" ही योजना लागू केली. शेतकरी सुखावले आणि पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचंच सरकार आलं. पण, हा आनंद तीनचार महिनेच टिकला ! नेहमीचं रीतसर वीजबिल येणं सुरू झालं आणि आपण फसवलो गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली. पण तोवर युतीच्या हातून संधी हुकली होती अन्‌ काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'काम' झालं होतं ! "आमचं ब्रह्मास्त्र आमच्यावरच उलटलं" अशी रास्त खंत युतीचे दुसरे शिल्पकार प्रमोद महाजन यांनी निकालानंतर मला मुलाखत देताना व्यक्त केली होती.

हा विषय मुळात अर्थकारणाचा आहे. दरमहा ८५०० किंवा १५०० सुद्धा किती काळ देऊ शकणार सरकारची तिजोरी ? कुठून येणार हे हजारो कोटी रुपये ? याचा विचार राजकारणी मंडळी करतात का ? की, आश्वासनं देत सुटतात ? एकानं दिलं म्हणून दुसऱ्यानं द्यायचं, ही त्यांची स्पर्धा महसुली उत्पन्नाच्या, करदात्यांच्या जीवावर आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडसर ठरणारी नाही का ? सर्व स्तरांवर महागाई कमी होणं, जीवनावश्यक सेवा कमी खर्चात आणि सुलभतेनं उपलब्ध होणं, रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करणं, दरडोई उत्पन्न वाढविण्याचे उपाय करणं यासारख्या मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत की रोखीच्या अनुदानाची वाईट सवय लावून जनतेला थंड करणं ! याचं काहीच का वाटत नाही शासकवर्गाला !! "लाडली बेटी" चालली म्हणून "लाडकी बहीण" आली. "महालक्ष्मी" चा फायदा झाला म्हणून पुन्हा तिचा गाजावाजा होणार. राजकीय पक्ष आणि नेते  हे असं किती दिवस चालवणार ? सर्वच लोकांसाठीच्या एकूणच व्यवस्थांचा समग्र विचार आणि शाश्वत उपाय आपण कधी करणार ? हे खरे प्रश्न आहेत. अन्यथा, व्यवस्था कोलमडून पडायला वेळ लागणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही !

++++++++++

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.