कर्तव्य! कर्तृत्व!! आणि... सजा!!!

 कर्तव्य! कर्तृत्व!! आणि... सजा!!!

अंधेर नगरी चौपट राजा आणि परेशान प्रजा...आणि नेमकं... कोण भोगतोय सजा.


दीपक देशपांडे,मूल.

महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील एक ऐतिहासिक शहर मूल ,या शहराची कथाच काही न्यारी आहे.

महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचे गाव , महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे नाते सांगणारे ..म्हणजे त्यांचे बालपण ज्या मातीशी नातं दर्शविते ते त्यांचे आजोळआणि महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची कर्मभूमी, माजी खासदार दलितमित्र वि.तू नागपूरे यांचीही कर्मभूमी , बाबा आमटेंच्या कार्याने पावन झालेली ही भूमी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाची आजही ओळख करुन देणारे हे शहर चंद्रपूर चे विकासपुरुष अशी  ओळख निर्माण करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा मतदारसंघातील एक महत्वपूर्ण शहर.....(नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका देणारेही हेच महत्वाचे शहर)...मूल.

मूल शहराचा विकास सुधीर मुनगंटीवार यांच्या मुळे झाला हे मान्यच करावे लागेल हे मानणारा  वर्ग काही कमी नाही , आणि मुख्य म्हणजे विरोधकही ही बाब मान्य करतातच पण तरीही.....जनता जर तुमच्या विरोधात मत देत असेल तर........ आपल्या कर्तव्यात  आपण कुठे चुकलो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच........

सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात बल्लारपूर पोंभुर्णा सह मूल तालुक्याचाही  न भूतो न भविष्यती असा विकास घडवून आणण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा आणला खरा पण... त्यांना मार्गदर्शन व सुचना देणाऱ्यांनी,आणि विश्वसनीयता पायदळी तुडवणाऱ्यांनी केवळ आपला स्वार्थ साधत  मोठमोठ्या भ्रामक कल्पनांचे मनोरे त्यांच्यासमोर उभे केलेत आणि..केवळ त्या दिखाव्याला भुलून त्यांचेवर आपला विश्वास ठेवून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडून त्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून आणली आणि त्या प्रकल्पांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य केले ,हे त्यांचे कर्तृत्व आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातील मूल शहराचा विकास प्रत्यक्षात उतरताना बऱ्याच त्रुटी समोर आल्यात आणि जेवढ्या आवेशात सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला त्या-त्या प्रकल्पांची महती सांगितली ती सर्व फक्त पुस्तकातील आणि बातम्यांतील अक्षरे बनून धूळ खात पडून आहेत आणि वास्तविकता वेगळेच दर्शन देत आहे याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना कमी मतदान झाले,असे जनता बोलून दाखवत आहे.

मूल शहराच्या विकासासाठी मूल-चंद्रपूर मार्गावर उभारलेला इको पार्क आज आपल्या  अस्तित्वाची लढाई  लढतोय, प्रशासकीय भवन बांधुन ही महत्वाची कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय किरायाच्या घरात असून जनता व शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, आणि अधिकारी वर्ग वेगवेगळ्या प्रकरणांत सतत चर्चेत येताहेत (यांत शासनाला करोडो रुपयांचा किरायापोटी चूना लागतोय तो वेगळाच), पंचायत समिती भवन बांधून तयार झाले असले तरीही तेथेही व्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने जाणवतोच ,

 कर्मवीर कन्नमवार सभागृह , आपल्या भव्यतेची आणि अस्तित्वामुळे मूलची सांस्कृतिक आपलेपणाची भावना व संस्कृती जपण्यासाठी मदतच करीत आहे,हे प्रत्येक जण मान्य करतोय. तर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मात्र विद्यार्थ्यांना एक हक्काचे स्थान मिळाल्याने उपलब्ध सोयीसुविधांसाठी मूलची जनता सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त करताहेत , आणि  सगळ्या विकास कामातील हीच ती जमेची बाजू.

पत्रकार भवन अपूऱ्या सोयीसुविधांमुळे आपले गाऱ्हाणे गात आहे, क्रिडा संकुल  आणि जलतरण तलावाच्या  आपल्या आपल्या  समस्या आहेत,छ.शिवाजी व्यापारी संकुल  एकमात्र शोभेची वास्तू बनून पडली आहे, व्यायाम शाळेची आपलीच कथा आणि व्यथा आहे.

छ.शिवाजी महाराज उद्यानाचे भव्य प्रवेशद्वार आणि भोवताली काटेरी झुडपे , आणि बंद पडलेले काम ,तलावाच्या सौंदर्यात  भर पाडण्यासाठी खोलीकरणाचा अर्धवट प्रयत्न व नौकाविहाराचे हवेतच विरलेले आश्वासीत स्वप्न , लोकांना हवेहवेसे वाटावे अशा बसस्थानकाचे वर्णन केल्यानंतर आज चुकिनेही तेथे जाण्याची वेळ येऊ नये असे वाटण्याची  आलेली वेळ यामुळे जनता जनार्दनाचा झालेला हिरमोड, मूल शहराच्या  सौंदर्यात भर पडावी म्हणून चौकाचौकात उभारलेली आणि बंद पडलेली कारंजे आणि पुतळे ,त्यावर झालेला लाखोंचा खर्च, मूलच्या गांधी चौकात काही दिवसांतच बंद पडलेली वाहतूक नियंत्रण व्यवस्था ,सोबतच या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेल्या तिसऱ्या डोळ्यांची (सिसिटिव्हीकॅमेरे ) बंद पडलेली नजर , वाल्मिकी नगराच्या प्रवेशद्वारावर केला गेलेला लाखोंचा अमाप खर्च ,आणि  महाराष्ट्रात प्रेक्षणीय ठरावे असे स्वप्नातील  म.फुले आठवडी बाजार संकूलात बांधलेले निरुपयोगी ओटे आणि एकूणच झालेल्या खर्चाचा कवडीमोल फायदा केवळ मूल शहर व परिसरात चर्चेचा विषय बनून नगरातील जनतेला जनतेच्या पैशाची कशी वाट लावल्या गेली याची आठवण करून देत आहे.

तरीही......तुमच्याच विरोधात तुमचेच शस्त्र उगारणाऱ्या या  तुमच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आपण आपली पुढली वाटचाल करणार असलात तर.......?

सावधान! तुमच्या कार्यकर्त्यांवर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासाची ही जनतेनी दिलेली सजाच आहे ,हे मान्यच करावे लागेल , आणि म्हणूनच जनतेची मागणी आहे की तुम्ही आपल्या सभोवताली पिंगा घालणाऱ्या  मतलबी व स्वार्थी कार्यकर्त्यांना ओळखण्याची गरज आहे.

तुर्तास इतकेच.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.