रखडलेले लिलाव!रेती उपसा!!रेतीची तस्करी!!!आणि... सुस्ता- -वलेला बांधकाम व्यवसाय??
दीपक देशपांडे
महाराष्ट्र शासनाने विगत कित्येक महिन्यांपासून रेतीघाटांचे लिलाव न केल्यामुळे रेती पुरवठा करणारे, बांधकाम कंत्राटदार, बांधकाम करणारे नागरिक ,यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असून बांधकाम व्यवसाय सुस्तावला असल्याची ओरड सर्वत्र सुरु आहे म्हणजे तसा दिखावातरी नक्कीच केला जात आहे.
याबाबत नुकतेच मूल येथील महसूल प्रशासनाच्या भरारी पथकाने शनिवारी सकाळी मूल तालुक्यातील मारोडा पेटगाव मार्गावरील उमानदी पात्रात अवैधरीत्या ट्रॅक्टरने रेती वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार ट्रॅक्टरला घटनास्थळी पकडून त्या चार ट्रॅक्टरला मूल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आणि पून्हा एकदा रेती तस्करीचा एक मुद्दा चर्चेत आला आहे.
खरेतर रेती तस्करीचा मुद्दा गेले अनेक महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कुठे ना कुठे कायमच चर्चेत राहिला आहे , परंतू त्यावर प्रतिबंधात्मक ठोस कारवाई कुठेही होताना दिसत नाही ,तर आम्ही किती सतर्क आहोत हे दाखवण्यासाठी कधी महसूल विभागातर्फे तर कधी पोलिस विभागाच्या वतीने एखाददुसरी कारवाई केली जाते आणि ही बाब प्रसिद्धी माध्यमातून मुद्दाम *रेतीतस्करांचे धाबे दणाणले* ,वगैरे मोठमोठ्या मथळ्याखाली प्रसिद्ध करुन प्रशासन जागरुक असल्याचे भासविले जात आहे.
आम्ही असे कां म्हणतोय,यांचे कारण आहे ,
*अवैधरीत्या रेतीतस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न!*
https://ddbatmiportalm2m.blogspot.com/2024/05/blog-post_11.html
या आमच्या बातमी संदर्भात उमटलेल्या प्रतिक्रिया
आज प्रत्येक गावात घरकुलं आले आहेत पण अजून ही रेती घाट लिलाव निघाले नाही आहेत
घर बांधायला रेती नेत आहेत तर नेऊ द्या न
आज आपल्या मूल मध्ये कीती तरि वर्षा पासून रेती चोरी होत आहे मूल सोडुन गावात पकडायला कशाला जायचं 🙏🙏🙏
अगदी बरोबर लहान लोकांना पकडतात मोठे बिन्धास्त मारतात.
तर राज्य शासनाच्या विरोधातील राजकारणी ,एका वृत्तपत्रात
अशी प्रतिक्रिया देतात.
वास्तविकता अशी आहे की,मूलमध्ये बांधकाम व्यवसाय कुठेही थांबलेला नाही, कारण नदीतील रेती घाटांचा लिलाव झाला नसला तरीही शेकडो बैलबंडीचालक दररोज याच नदी घाटातून खुलेआम रेतीचा उपसा करुन बिनधास्तपणे रेती पुरवठा करीत आहेत , खरेतर तो उपसा किती मोठ्या प्रमाणात झाला आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
याबाबत आम्ही ,
*बैलबंडीने रेती वाहतूक रोजीरोटीसाठी की डल्ला मारण्यासाठी?*
https://wp.me/pex6jF-ZP
या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती,
आणि इतरांनीही कित्येकदा बातम्या प्रसिद्ध करुन प्रशासनाला ,या माध्यमातून मोठमोठे रेतीतस्कर रेती तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला परंतू त्यावर कुठलीही कारवाई केली गेल्याचे आठवत नाही, त्यामुळे मूल शहरात जर रेती पुरवठा सातत्याने होत आहे तर मूल तालुक्यातील गाव खेड्यात केवळ रेती उपलब्ध नाही म्हणून बांधकाम रखडले आहे असे जर कोणी म्हणत असतील तर ते मनाला पटण्यासारखे निश्चितच नाही. कारण तेथे बैलबंडीने रेती पुरवठा करणे सहज शक्य आहे,आणि प्रशासन बैलबंडीने रेती वाहतूक करण्यासाठी अटकाव करीत नाही आणि करणार नाही.
याचाच अर्थ असा आहे की, ट्रॅक्टर, ट्रक व हायवाने रेतीचा उपसा करता येत नसल्याचे शल्य लहानथोरांना निश्चितच सतावत असून मोठ्या प्रमाणात या माध्यमातून जमा होणारा धनसंचय कुठेतरी खंडीत व्हायला लागल्याने ही ओरड सुरू आहे,असे स्पष्ट मत या क्षेत्रातील जाणकार खाजगीत व्यक्त करीत आहेत.
मूल तालुक्यातील उमानदी,अंधारी नदी, चिमढा नदी,व वैनगंगा नदी यासोबतच छोटेमोठे नाले हे रेतीचे मुख्य स्रोत आहेत.
एकुण काय तर रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने बांधकाम व्यवसाय डबघाईला नाही तर ही लिलाव प्रक्रिया न झाल्याने केवळ मोठा डल्ला मारणाऱ्यांना अडचणीचे जात असल्याचे वास्तव पुढे येत आहे आणि रेती तस्करांनी मोठ्या वाहनांनी जलदगतीने रेतीचा उपसा करता येत नसल्याने बैलबंडीने सुरू असलेल्या रेती पुरवठ्यात शिरकाव केल्याने रेतीचे भाव वाढले असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे.
..... आणि त्यासाठीच तर हा सगळा आटापिटा केला जातो आहे.
सत्य काय आहे हे लपविण्याचा प्रयत्न, आणि विषयाला बगल देत तो विषय चर्चेत ठेवून आपले इप्सित साध्य करायचे ही मुळ भावनाच तर रेती तस्करांची पाठराखण करीत नाहीये ना? यासाठी , सत्ताधारी, विरोधक, प्रशासन आणि रेती तस्करी करणारे , बांधकाम कंत्राटदार हे सगळेच यात गुंतलेले असून सोबतीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी , सरपंच, तलाठी आणि पोलिस पाटलांच्या सहभागाचीही चर्चा रंगू लागली असून अशी कारवाई हे केवळ एक थोतांड असल्याचे बोलले जात आहे.
तुर्तास एवढेच.....
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*
Comments
Post a Comment