*निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१४.. *व्हाट्सअप वार*
*निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१४.*
*व्हाट्सअप वार*
दीपक देशपांडे
निवडणूक तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे व्हाट्सअप समुहावर शाब्दिक युद्ध परिसीमा गाठू लागले आहेत.
अशाच शाब्दिक चकमकीमुळे एका समुहाच्या संचालकाने हा समुहच चर्चा आणि संवादासाठी बंद करून टाकला ,तर काही समुहांवर स्वतःला धुरंधर समजणारे आपल्या अकलेचे तारे तोडत समोरच्याचे कसे चुकले ,यांचे समर्थन व विरोध करीत समाजाचे उद्बोधन की प्रबोधन करताहेत तर काही जाणतेपणी हेतूपुरस्सर पणे समाजमन कलुषीत करण्याचा प्रयत्न करताहेत.
काही स्वतःला एखाद्या नेत्याच्या कृतीचे समर्थन करीत त्यांचे म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवून देत असताना त्यावर दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासही तयार नाहीत आणि मग भक्त ते अंधभक्तचा प्रवास विनासायास पार पडतो आहे . कुठे प्रकरण हमरीतुमरीवर येऊन ....इथे भेट....... तिथे भेट पर्यंत आणि मग हलकेच....बाहेर भेट पर्यंत जाऊन पोहोचत आहे .
केवळ शब्दच्छल! प्रकरण अंधभक्तपासून एकमेकांच्या उद्धारापर्यंत आणि दाखवून देऊ मार्गे विकास, स्वार्थ , गुंड ,मवाली, भ्रष्टाचार, शिष्टाचार, करीत लोकशाही, घराणेशाही,हुकुमशाही,करीत हमरीतुमरीवर येत विनाशापर्यंत कसे आणि कोण घेऊन जातं हे कळतही नाही.
ह्या सर्व बाबींचा शांतपणे विचार करतांना हे प्रकर्षाने जाणवते की कुणीतरी कुठेतरी दुखावला आहे आणि त्याची स्वप्नं यावेळी अपेक्षाभंग करुन जातील अशी भिती आणि आपण करीत असलेल्या कार्यातील अडचणी जेंव्हा तुमच्या डोळ्यासमोर तरळून जातात तेव्हा भल्याबुऱ्याची शुद्ध हरपते आणि माणूस एका वेगळ्याच दिशेने वाहवत जातो तसाच प्रकार इथेही अनुभवायला मिळतोय आणि धुसफुसणाऱ्या या आगीत तेल ओतून यांचा वणवा पेटवायला काही विघ्नसंतोषी मंडळी तर आधीपासूनच निशाणा साधून टपून बसलेले असतात, नेमक्या वेळी नेमका आगडोंब कसा उठवायचा ह्यात तर ते पारंगत असतात त्यामुळे केवळ एकच छोटेखानी सुचक वाक्य पेरुन ते बाहेर पडतात आणि उपस्थित मंडळी आग लावण्याचे आणि विझविण्याचे कार्य बिनबोभाटपणे करीत असतात.
शेवटी मुख्य खेळाडू बाहेरच राहतात पण हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले भक्त त्यांचे आदर्श असणारे नेतृत्व भलेही तुरुंगात असतील तरीही त्यांचे गोडवे गात त्यांचे आदर्श समाजाला पटवून देण्यासाठी जीवाचे रान करतांना दिसतात तेव्हा तर कुणाची किव करावी ह्याचे उत्तर भल्याभल्यांना सापडले नव्हते.....नाही आणि नसणार आहे.
पण.... व्यक्तिस्वातंत्र्याचा आव आणत विचारस्वातंत्र्याचा बुरखा पांघरून तीच ती घटना ,तीच ती मागणी पुढे रेटत वैचारिक मल्लिनाथी नाही केली तर आम्ही भारतीय असल्याचा सार्थ अभिमान कसा बाळगता येणार नाही का?
चालू द्या....आम्हालाही समाजातील वास्तव दाखवायला विषय हा हवाच ना? तुम्ही आहात ,तुमची ही कृती आहे आणि आमची लेखणी आहे म्हणूनच समाजात वाढणारी दरी कमी करण्यासाठी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे, एवढं मात्र निश्चित.......!
पुढील भागात भेटूया....... नवीन विषयांसह.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment