चिता जळताहे अन मधमाश्यांच्या हल्ल्याने उपस्थित मरणयातना भोगताहे ???
चिता जळताहे अन मधमाश्यांच्या हल्ल्याने उपस्थित मरणयातना भोगताहे ???
२० जण जखमी : सर्वत्र पळापळ
मूल,दीपक देशपांडे
मूलमधील उमा नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरू असतानाम मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने नागरिक व आप्तेष्टांची पळापळ झाली. यामध्ये सुमारे २० जण किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मूल येथील उमा नदीपात्रात घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, सर्वांची प्रकृती सुधारल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मूल येथील अनिल राखडे या व्यक्तीचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मूल येथील उमा नदीच्या घाटावर नेण्यात आली. मूल येथील स्मशानभूमी व उमा नदीच्या पात्रातील पुलाखाली मधमाश्यांचे मोठे पोळ आहे.
नदीपात्रात प्रेत चितेवर जळत असताना मधमाश्यांनी उपस्थित लोकांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्याने लोकांची पळापळ झाली. काहींना मधमाश्यांनी कडाडून चावा घेतल्याने ते जखमी झाले. लोकांच्या हातापायाला, डोक्याला, मानेवर व कानाला मधमाश्यांनी चावा घेतल्याची माहिती आहे. एकीकडे सरणावर मृतदेह जळत असताना दुसरीकडे जखमींना रुग्णालयात भरती करण्यात येत होते. उपजिल्हा रुग्णालयात जखमींना भरती करुन उपचार करण्यात आले ,सर्वांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मूल येथे प्रशस्त असे स्मशानघाट बांधले असतांनाच मृतदेहावर नदीपात्रात अंत्यसंस्कार कां करण्यात आला? हा प्रश्न जरी उपस्थित झाला असला तरीही अशा घटना वारंवार होत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली असून मूल नगर परिषद प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
१०,किमीच्या प्रवासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार
भेजगाव येथे स्मशानभूमी व कब्रस्तानाची मागणी
मूल तालुक्यातील भेजगाव येथे मुस्लिम समाजाची दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री अमिर खाँ अन्वर खॉ पठाण (वय ६७) यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. मुस्लिम समाजात मृतदेहावर कब्रस्तानात अंत्यविधी केला जातो. मात्र, भेजगाव येथे कब्रस्तान नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. अखेर बुधवारी रखरखत्या उन्हात १० किलोमीटरचा प्रवास करुन मालवाहकाने मृतदेह मूलला आणून मूल येथील कब्रस्तानात पठाण यांच्यावर बुधवारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
माणूस जिवंतपणे संसाराचा गाडा हाकताना अनेक समस्यांना तोंड देत परिस्थितीशी भांडतो. मानवाच्या मरणोत्तर तरी या यातना थांबाव्यात अशी अपेक्षा समाज मनात आहे. मात्र, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मरणानंतरही मृतदेहाची अवेहलना थांबत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
विशेष;-एकीकडे मुस्लिम समाजाची अनेक वर्षांपासून कब्रस्तानाची मागणी आहे. मात्र, ती अजूनही पूर्ण झाली नाही ,तर दुसरीकडे भेजगाव ग्रामपंचायतीची भेजगावात स्मशानभूमीची जागा राखीव आहे.
मात्र या जागेवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नागरिकांनी अतिक्रमण करीत घरांचे बांधकाम केले. आजघडीला या जागेवर शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. परिणामतः स्मशानभूमीची कुठेही दुसरी जागा उरली नाही. त्यामुळे गावाशेजारी असलेल्या उमा नदीपात्रात ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावा लागतो.
मात्र, पावसाळ्याच्या दिवसात उमा नदी दुथडी वाहत असते. अशावेळी अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. भेजगाव ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सौंदर्यीकरणाकरिता दहा लाख रुपये मंजूर झाले. यात मृतदेह जाळण्यासाठी शेड व रस्ता अंदाजपत्रकात असताना केवळ रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, शेडचे काम करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेवटी काय, स्मशानभूमी असून नसून सारखीच ,कारण जिवंत माणसाला राहायला जागा नाही तिथे मेलेला माणूस थोडीच जागा घेऊन जातोय? पण....मेलेल्या माणसाला मुठमाती द्यायला तरी थोडीशी जागा हवीच नाही का? कदाचित यालाच मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे असे म्हणत असतील , खरंय ना? हे कोण करतंय,शोध तर घ्यायलाच हवा........
पण........???
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment