अंधेर नगरीत, उदार राजा अन् चोरट्यांनी मांडलाय हलकल्लोळ ,
अंधेर नगरीत, उदार राजा अन् चोरट्यांनी मांडलाय हलकल्लोळ!
संसारोपयोगी वस्तूच्या नावाखाली कामगारांची दलालांकडून लूट!
मूल , न्यूज ब्युरो
महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत गरजू व नोंद झालेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. सध्या संसारोपयोगी साहित्यांचे वाटप सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. या संधीचा फायदा घेत काही दलालांनी कामगारांची आर्थिक लूट करण्याचा सपाटा लावला आहे. अशी तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल कडे प्राप्त झाली आहे.
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा, यासाठी कामगाराचे आधार कार्ड, जन्म दाखला, रहिवासी दाखला, कामगाराने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज भरावे लागतात. याचा फायदा घेत अर्ज भरण्याच्या नावाखाली काही स्वयंघोषित प्रतिनिधी (दलाल) ग्रामीण भागातील कामगार, मजुरांकडून ८०० ते १ हजार रुपये मागत आहेत. अशा प्रकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही तथाकथित मजूर संघटनांच्या मार्फत अनेक दलाल तालुक्यातील गावागावात फिरत आहेत. हे दलाल गरीब अशिक्षित मजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना डिनर सेट मिळवून देतो, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हा अर्ज भरला की, तुम्हाला लगेच डिनर सेट मिळणार आहे, असे आमिष दाखवून पैशांची मागणी करत आहेत. तालक्यात बोगस एजंटांचा सळसळाट झाला आहे. अशी बतावणी करीत असल्याच्या तक्रारी आमचे कार्यालयास प्राप्त होत आहेत ,असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी स्पष्ट केले असून शासकीय यंत्रणेने याबाबतीत अधिक स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
सध्या निवडणुकीचे वातावरण असून, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी सत्तारूढ शासनाने तातडीने योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहे. प्रशासनाला शासनाने तसे आदेश दिले आहेत. परंतु, काही दलाल याचा फायदा घेत असून, आपली खळगी भरत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे या योजनेशी संबंधित यंत्रणेने याबाबतीत कडक कारवाई करीत कामगारांची होणारी लूट थांबविण्यासाठी कामगारांना हे अर्ज कोणत्याही आँनलाईन केंद्रावर भरण्याची मुभा देऊन या कथीत दलालांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा या दलालांचा सुळसुळाट आणि शासकीय यंत्रणेतील गैरव्यवहार उघड करण्यासाठी आम्हाला एक पाऊल पुढे टाकावे लागेल असा स्पष्ट इशारा ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment