१५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन

१५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन

१५मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन व २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन


ग्राहकांची जागृती वाढविणे, ग्राहकांचे हक्क संरक्षित करणे आणि स्वदेशीचा पुरस्कार करणे असे अनेक उद्दिष्ट ग्राहक दिन साजरा करण्यामागे आहेत.


गरज असेल तरच खरेदी करणे, गुणवत्ता असलेले जिन्नस खरेदी करणे आणि वाजवी दरामध्ये खरेदी करणे यावर ग्राहकाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.


उत्पादक कंपनी डिस्काउंट किंवा सूट यांचे आमिष दाखवून ग्राहकांना जिन्नस खरेदी करण्यास आकृष्ट करते. विक्री किंमतीवर जी सूट दिली जाते ती विक्री किंमत उत्पादक स्वतः ठरवीत असल्याने विक्री किंमत किती असावी यावर कायद्याचे कोणतेही बंधन नाही. कायद्यातील या त्रुटींचा फायदा घेऊन उत्पादक स्वतःचे उखळ पांढरे करतात. यासाठी आकर्षक जाहिराती दाखविल्या जातात. नामांकित कलाकार, खेळाडू यांचा वापर जाहिराती दाखवितांना केला जातो.


एक कंपनी डोक्यावरील केसांचे तेल तयार करते. दाट आणि काळ्या केसांसाठी हे तेल उपयुक्त आहे असा कंपनीचा दावा आहे. या केसतेलाची जाहिरात एक नटी करते. प्रत्यक्षात या नटीचा नवरा टकला आहे. सारांश इतकाच की जाहिरात करणारे कलावंत, खेळाडू पैसे घेऊन जाहिराती करतात. पैसे घेऊन जाहिरातीत जे बोलायला सांगितले तेच बोलतात. त्यांच्या बोलण्याचा आणि गुणवत्तेचा संबंध नसतो. लोकांना भुरळ पाडणे, फशी पाडणे आणि जिन्नस खरेदी करायला आकृष्ट करणे हाच उद्देश असतो.


जॉन्सन कंपनीने तयार केलेली बेबी पावडर आता बाजारात विकत मिळत नाही. एक काळ असा होता की बाळाची काळजी घ्यायची तर काळजी घेणारी मम्मी फक्त आणि फक्त जॉन्सन बेबी पावडर वापरात असे. पुढे असे सिद्ध झाले की जॉन्सन बेबी पावडरमध्ये असलेल्या घटकांमुळे कर्करोग (कॅन्सर) होतो. अमेरिकेतल्या न्यायालयांनी या कंपनीला काही हजार कोटी रुपयांचा दंड केला. तरीही भारतात या बेबी पावडरचे उत्पादन व विक्री सुरुच होते. सुमारे १० वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन व विक्री बंद झाले. सारांश इतकाच की जाहिरातींना भुलून जर खरेदी केली तर आपलेच नुकसान आपण विकत घेत असतो.


लहान मुलांसाठी पाच किंवा दहा रुपयांमध्ये कुरकुरे सारखे अनेक जिन्नस मिळतात. याची चव वाढविण्यासाठी अनेक घटकांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक केलेला असतो. दर्जाहीन खाद्यपदार्थ खाल्ल्याने लहान मुले चिडखोर होण्याचे, त्यांना विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात विक्रीसाठी जे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत त्या खाद्य पदार्थांची वारंवार तपासणी करण्याची यंत्रणा सरकारकडे नाही. सरकारची जी यंत्रणा आहे ती भ्रष्ट आहे. त्यामुळे बाजारातील तयार अन्न पदार्थ लहान मुलांना खायला न देणे हा सर्वात उपयुक्त व सोपा मार्ग आहे. लहान मुलांना जे आवडत असेल ते घरी करुन खाऊ घातले तर त्यांचे आरोग्य उत्तम राहील.


खरेदी करीत असताना स्वदेशी उत्पादन खरेदी करण्यावर जोर असावा. आपण स्वदेशी उत्पादन खरेदी करतो त्यावेळी देशातील रोजगाराला पाठबळ देत असतो.


आपली खरेदी ही पर्यावरण पूरक असावी. हातात बक्कळ पैसा असला तरी खरेदी करतांना तारतम्य बाळगणे हिताचे ठरते. प्रवासाला निघतांना प्रत्येक व्यक्तीने पाण्याची एक बाटली घरच्या पाण्याने भरुन सोबत नेली तर लाखो प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा निर्माण होण्याचे टळू शकते. 

घरपोच सेवा (Home delivery) देतांना आकर्षक वेष्टन (packing) देण्याचा उत्पादकांचा शिरस्ता आहे. जसे पिझ्झा घरपोच मागविला की त्यासोबत भलेमोठे पुठ्ठ्याचे खोके येते. हे खोके लगेच कचऱ्यात जाते. यामुळे प्रति माणसी कचरा निर्माण होण्याचे प्रमाण, विशेषतः शहरी भागात, मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या शहरात महापालिका आहेत तिथले सकाळचे चित्र कसे असते? पायी फिरायला निघालेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बस किंवा व्हॅन आणि कचरा गोळा करणारे खटारे यांची संख्या लक्षणीय जाणवते. ग्राहक जागृत झाला तर संभाव्य कचरा कमी करण्याची ऊर्मी आपसूक निर्माण होते.

 जागतिक ग्राहक दिनानिमित्त जागृत ग्राहक होण्याचा संकल्प करु या.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.