वास्तव...✍️विनोद देशमुख --------------कोण उद्धव ठाकरे ?
वास्तव...✍️विनोद देशमुख
--------------कोण उद्धव ठाकरे ?
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत बोलताना उबाठा शिवसेनेचे विश्वप्रवक्ते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर भलतेच भडकले. त्यांना चोरांचे सरदार म्हणाले, सत्ता आल्यास तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली. एका क्षणी ते विचारते झाले- "कोण देवेन्द्र फडणवीस ?" ही वाक्ये ऐकून भाजपावालेही भडकले आहेत. त्यांच्यातील एकाने विचारले- "कोण उद्धव ठाकरे ?" आता हे 'कोण' चे शेपूट लांबतच जाणार, असे वाटायला लागले आहे.
संजय राऊत यांनी मुद्दा छेडलाच आहे, तर एका राजकीय अभ्यासकाने याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यादृष्टीने देवेन्द्र आणि उद्धव यांचा तुलनात्मक गोषवाराच मांडला आहे. तो पुढीलप्रमाणे-
देवेन्द्र फडणवीस : भाजपा आमदार गंगाधरराव फडणवीस यांच्या घरी जन्म. वडिलांच्या निधनानंतर राजकारणात, नगरसेवक, महापौर, आमदार, भाजपा प्रदेशाध्यक्ष, 5 वर्षे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, सध्या उपमुख्यमंत्री.
उद्धव ठाकरे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात जन्म, शिवसेनानेते, कार्याध्यक्ष, बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख, अडीच वर्षे मुख्यमंत्री, फुटीनंतर उबाठा गटाचे प्रमुख, आमदार
महाराष्ट्रातील भाजपाचे कर्तेधर्ते देवेन्द्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा हा 'बायोडाटा' पाहून लोकच ठरवतील- "कोण तुम्ही" हा प्रश्न कोणाच्या संदर्भात विचारायचा, ते😀 दोघेही २०१४ च्या निवडणुकीपर्यंत युतीत एकत्र होते, निकालानंतर काही महिन्यातच पुन्हा एकत्र आले आणि २०१९ च्या निकालानंतर दोन महिनेपर्यंत एकत्र राहून मग वेगळे झाले, ते आजपर्यंत. हा सारा प्रवास पाहता या दोन्ही नेत्यांना त्यांच्या मित्रपक्षातील लोक ओळखत नसतील, अशी सुतराम शक्यता नाही. तरीही जेव्हा राऊत शहाजोगपणे विचारतात- कोण फडणवीस ? तेव्हा भाजपातून "अरे ला कारे" स्टाईल जवाब आला- कोण ठाकरे ?
आणि खरंच, राजकारणातील अनुभवाचा, मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीचा विचार केला आणि फडणवीस-ठाकरे तुलना केली तर कोणीही सहज म्हणून जाईल- कोण ठाकरे ? इतके ठाकरे फडणवीसांच्या व्यक्तिमत्त्वापुढे खुजे आहेत. फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देऊन दाखविले होते. सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही, पण त्यासंदर्भात ठाकरेंनी पुढे काहीच केले नाही. एकनाथ शिंदेंनी मात्र व्यापक सर्वेक्षण करवून तेच मराठा आरक्षण पुन्हा दिले. फडणवीस लोकनेते असल्याने सतत लोकांमध्ये वावरत असतात. ठाकरेंनी मात्र घरी बसून, फेसबुक लाईव्ह द्वारे राज्य चालविले. ठाकरेंच्या काळात सरकारविरोधकांवर सूडबुद्धीच्या कारवाया करण्यात आल्या. हे सारे राऊतांना माहीत नाही का ? तरीही त्यांनी फडणवीसांना छेडून एकप्रकारे ठाकरेंनाच उघडे पाडले🤔
या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ठाकरेंना पक्षातील पद आयते, वारशाने वडिलांच्या हयातीत, घराणेशाहीमुळेच मिळू शकले आणि मुख्यमंत्रिपद (त्यामुळेच आमदारपदही) तर केवळ कपटाने मिळाले. याउलट, फडणवीसांनी पित्याच्या माघारी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आणि स्वकर्तृत्वाने राज्याचे सर्वोच्च पदही प्राप्त करून दाखविले. ठाकरे आणि फडणवीस यांची राजकीय बरोबरी तरी होऊ शकते काय ? हे सत्य माहीत असल्यामुळेच विश्वप्रवक्त्यासारखे काही सैनिक ऊठसूठ फडणवीसांना कमी लेखून आपल्या आकाला खुश करण्याचा प्रयत्न करीत असतात.
"कोण फडणवीस" असे विचारण्याचा उद्धटपणा करण्याची यापैकी एकाचीही औकात नाही. असा प्रश्न विचारून ते स्वत:च्या नेत्यावरच 'कोण'चे प्रश्नचिन्ह लावण्याची संधी विरोधकांना विनाकारण उपलब्ध करून देत आहेत. म्हणूनच भाजपाकडून प्रश्न आला आहे- " कोण हो हे उद्धव ठाकरे ?" यापुढे तरी अशा उठवळांनी स्वत:च्या औकातीत राहून स्वत:च्या नेत्याची "झाकली मूठ सव्वा लाखाची" राखणेच जास्त बरे नाही का🤣
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments
Post a Comment