जुने जाऊ द्या दुसऱ्यालागुनी स्वत:चा नवा पक्ष काढुनी🤔 🍳आरसा...@विनोद देशमुख
🍳आरसा...@विनोद देशमुख
जुने जाऊ द्या दुसऱ्यालागुनी
स्वत:चा नवा पक्ष काढुनी🤔
उबाठा शिवसेनेपाठोपाठ शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही बंडखोरांच्या ताब्यात देण्याचा निर्णय देऊन निवडणूक आयोगानं मोठाच 'अन्याव' केला बघा. "अरे, आमच्या वाडवडिलांनी पक्ष स्थापन करायचा, तो वाढवण्यासाठी खस्ता खायच्या आणि तुम्ही तो पक्ष 'ऐऱ्यागैऱ्यां'च्या हवाली करायचा. हे चालवलं काय निवडणूक आयोगानं ? काही कायदेकानून, नियमबियम आहेत की नाही ? मोदी-शहांच्या दबावाखाली कसेही निर्णय घेत आहे आयोग. ही हुकुमशाही आहे. इतर पक्ष संपवून भाजपाचा एकछत्री अंमल स्थापित करण्याचा हा डाव आहे." घराणेशाहीवादी पक्षांना यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करणं शक्य नसतं. कारण, अशा पक्षांमध्ये वारस हे कार्यकर्ते नसतात; ते पक्षप्रमुखाच्या कुटुंबाचे सदस्य असतात. त्यामुळे ते पक्षावर थेट मालकी हक्क सांगत असतात.
मूळ पक्ष गमावलेले उद्धव ठाकरे म्हणतात- "माझ्या वडिलांनी काढलेला शिवसेना पक्ष शिंदेंनी (त्यांचा शब्द 'मिंधे') भाजपाच्या मदतीनं पळवला. हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढून दाखवा." हे आव्हान भाषणात ठीक आहे. पण, तयार पक्ष आयता हाती लागत असेल तर कोण, कशाला नव्या पक्षाच्या भानगडीत पडेल हो. त्यात मूळ पक्ष वाढविण्यात कमी-अधिक वाटा उचलणारेच बहुसंख्येनं पाठीशी असतील तर नव्या पक्षाचा उपद्व्याप कोण करणार ? गंमत अशी की, जे आव्हान देत आहेत त्यांनाही पक्ष वारसानं आयताच मिळाला आहे. म्हणजे दोघेही एकाच पातळीवर आहेत. मग, कशाला भांडता राजेहो😣 त्यापेक्षा जे अल्पमतात येऊन पक्षाबाहेर झाले आहेत, त्यांनीच स्वत:चा वेगळा, नवा पक्ष का काढू नये ? मूळ पक्षासारखाच आपला पक्ष उभारण्याची नामी संधी यानिमित्तानं हाती आली आहे. आपली ताकद दाखवून बंडखोरांना धडा शिकवणं याद्वारे जास्त (सहज) सोपं आणि शक्य आहे, असं कोणालाच का वाटू नये बरं ! पक्षही पुन्हा उभा राहील आणि वारसाही कर्तृत्वानं सिद्ध होईल. त्याऐवजी ते मूळ पक्षाच्याच मागे आहेत🥺
राष्ट्रवादीत मात्र थोडी वेगळी परिस्थिती आहे. घराणेशाहीतच वाद झाला अन् काकाचा पक्ष पुतण्यानं पळवला😀 काका मुलीला पुढं सरकवत आहे हे पाहून दादानं महाबंड केलं. आता ताई म्हणताहेत- "पवार साहेबांनी साठाव्या वर्षी पक्ष काढून वाढवला. आताही चौऱ्यांशिव्या वर्षी ते पुन्हा पक्ष वाढविण्याच्या कामाला लागतील." पुन्हा प्रश्न तोच. मूळ बहुमताचा पक्षच जर दादाकडे गेला, तर तुम्ही कोणता वाढवणार ? त्यापेक्षा नवीनच पक्ष काढाना. आणि हो. त्याची धुरा साहेबांच्या खांद्यावर नका टाकू. वयाच्या 16 व्या वर्षापासून गेली 68 वर्षे ते कार्यरत आहेत. मोठे आजारीही झाले. आतातरी त्यांना आराम द्या. कन्या सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार यांच्यासारख्या नव्या दमाच्या गड्यांनी भार घेतला तरच हे शक्य आहे. दीर्घ अनुभवाचा संपन्न वारसा असताना नव्यानं सुरुवात करणं काय कठीण आहे. लागा कामाला😝
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments
Post a Comment