*आठवलं ते सांगितलं...* *वयोवृद्ध तरूण लखनजी कटरे*
*आठवलं ते सांगितलं...*
*वयोवृद्ध तरूण लखनजी कटरे*
सहकार खात्यातीत निवृत्त अधिकारी आणि पोवारी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक ऍड. लखनसिंह कटरे आज वयाची ६९ वर्ष पूर्ण करून ७०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन.
लखनजींचा माझा संबंध फार जुना नाही. गेल्या दोन वर्षांतलाच आमचा परिचय आहे. मात्र अल्पावधीतच आमचे सूर छान जुळले आहेत.
अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय संघटनेची विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यावेळी विदर्भातील विविध क्षेत्रातील साहित्यिक मंडळींचा मी शोध घेणे सुरू केले. तेव्हा एका पत्रकार मित्रानेच लखनजींचा नंबर मला दिला आणि सविस्तर माहिती सुद्धा दिली. मी त्यांना फोन केला. लगेचच साहित्य परिषदेचा नागपुरात मी जो पहिला कार्यक्रम आयोजित केला होता त्याला लखनजी एखाद्या तरुणाच्या उत्साहाने उपस्थित झाले. तेव्हापासून ते सतत संपर्कात राहिले आणि साहित्य परिषदेच्या जडणघडणीत मला मदत करायला उत्साहाने पुढे आले.
साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांताचे अध्यक्षपद कोणाकडे द्यावे असा प्रश्न आला तेव्हा लखनजींचे नाव पुढे आले. मी त्यांना विचारले तेव्हा तुम्ही सोबत असाल तर मी अध्यक्षपद स्वीकारतो असे सांगून त्यांनी मलाही अडकवले. मग साहित्य परिषदेचे अध्यक्ष लखनजी आणि कार्याध्यक्ष मी अशी जबाबदारी वाटली गेली. नागपुरातून मी जे काही नियोजन करत गेलो ते सर्वप्रथम लखनजींच्या कानावर घालायचो. त्यांनी कायम सहकार्याचा हात पुढे केला. कधीही अडवणुकीची भाषा वापरली नाही. कोणताही कार्यक्रम ठरवल्याचे कळवले की कार्यक्रमाच्या तासभर आधी गोंदियाच्या पुढे असलेल्या त्यांच्या गावाहून कारने ते नागपूरला हजर असायचे. आजही कोणत्याही कार्यक्रमासाठी ते धावत येतात. तिथे दिलेली जबाबदारी ते विना तक्रार पार पाडतात.
लखनजी पोवारी भाषेचे अभ्यासक आहेत. तसेच साहित्यिकही आहेत.
पोवारी आणि मराठी भाषेत त्यांनी विपुल लेखन केले आहे. झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. विविध साहित्य संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
याशिवाय शेतीमध्येही त्यांना चांगलाच रस आहे. आपल्या शेतात त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करून फळझाडे लावली आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करून वाढवलेल्या झाडांचे आंबे दरवर्षी लखनजी आठवणीने आणून देतात. त्या आंब्याचा जसा गोडवा आनंददायी असतो तसाच लखनजींच्या स्वभावातलाही गोडवा तितकाच सुमधुर आहे.
आज वयाच्या ६९ व्या वर्षी देखील लखनजी उत्साहाने सर्व क्षेत्रात संचार करत असतात. कुठेही थकवा नाही किंवा वय वाढल्याची तक्रार नाही. कोणत्याही कामासाठी ते कायम तत्पर असतात. वयोवृद्ध चिरतरुण कसा असावा हे लखनजींकडे पाहून कळते.
असे माझे मित्र एड. लखनसिंह कटरे यांनी काल रोजी ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशाच उत्साहात वयाची शंभरी गाठावी आणि त्यांच्या शताब्दी समारोहात आम्हा सर्व सहकाऱ्यांना सहभागी होण्याचे भाग्य मिळावे इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अविनाश पाठक

Comments
Post a Comment