*आठवलं ते सांगितलं...* *संगीत साधिका डॉ तनुजा नाफडे..*
*आठवलं ते सांगितलं...*
*संगीत साधिका डॉ तनुजा नाफडे..*
माझ्या आठवणीनुसार २०१८ च्या जुलै महिन्यात एका सकाळी मेजर कृष्णाजी खोत सरांचा फोन आला. मी नागपुरात धरमपेठ कॉलेजमध्ये शिकत असताना खोत सर तिथे प्राध्यापक होते. आधी त्यांचे माझे गुरू शिष्य म्हणून असलेले संबंध नंतर कौटुंबिक संबंधात परिवर्तित झाले होते. त्या दिवशी सरांनी मला सांगितले की आपल्या कॉलेजमध्ये डॉ तनुजा नाफडे नामक संगीताच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या एका कामात तुला त्यांना मदत करायची आहे. त्यांना तुझा नंबर दिला आहे. त्यांचा फोन येईल. तू जरा बघून घे..
खोत सरांनी सांगितल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. दुसऱ्या दिवशीच मला डॉ. नाफडेंचा फोन आला. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही एकमेकांना भेटलो...
डॉ तनुजा नाफडे हे नाव मी आधी ऐकलं जरूर होतं. मात्र आमचा प्रत्यक्ष परिचय त्या दिवशीच झाला. त्या पहिल्याच भेटीत मला त्यांची जी माहिती मिळाली, त्या माहितीने मी चांगलाच प्रभावित झालो.
त्या दिवसापासून त्यांचा माझा समाज माध्यमावर नियमित संपर्क सुरू झाला. योगायोगाने या भेटीनंतर अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी संगीतबद्ध केलेली भारतीय लष्कराची मार्शल ट्यून शंखनाद संरक्षण मंत्रालयाने स्वीकृत केल्याची आणि त्याचे लोकार्पण झाल्याची बातमी आली. त्या निमित्ताने नागपुरात झालेल्या पत्रपरिषदेत मला त्यांच्याबद्दल अजून खूपच माहिती कळली. भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.
मात्र त्याचबरोबर त्यांनी पाश्चात्य वाद्यांवर भारतीय सुरवटीच्या संगीत रचना वाजवण्याचे म्हणजेच फ्युजनचे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत असे कळले. भारतीय लष्कराची मार्शल ट्यून ही यापूर्वी इंग्रजांनी बनवलेली होती. त्या सगळ्याच मार्शल ट्यून्स पाश्चात्त्य वाद्यांवरच वाजवल्या जात होत्या. त्या सर्व पाश्चात्त्य सुरावटीच्या वाद्यांवर डॉ. नाफडेंनी संगीतबद्ध केलेली भारतीय लष्कराची मार्शल ट्यून ही पूर्णतः भारतीय सुरावटीची होती. ही पाश्चात्य वाद्यांवर वाजवली गेली होती. त्यासाठी लष्कराच्या बँड पथकातील वादकांना प्रशिक्षण द्यावे लागले. हे प्रशिक्षण डॉ. तनुजा नाफडे यांनी विनामूल्य दिले तसेच शंखानाद या मार्शल ट्युनला संगीतबद्ध करण्याच्या सेवा देखील त्यांनी विनामूल्य दिल्या अशीही माहिती त्या दिवशी मिळाली. त्यामुळे त्यांच्या बद्दल असलेला आदर अधिकच दुणावला.
याशिवाय त्यांच्या अशा फ्युजन च्या प्रयोगाचे सादरीकरण परदेशातही झाले आहे. रशियाची राजधानी मास्कोमध्ये भारतीय दूतावासात त्यांचा अशा फ्युजनचा विशेष कार्यक्रमही झाला होता. त्याचबरोबर ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर त्यांचा रंग दे नामक म्युझिकल अल्बम देखील निघाला आहे.
भारतीय लष्कराला मार्शल ट्यून दिल्यानंतर त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेसाठी देखील गीत संगीतबद्ध करून दिले आहे. त्याचबरोबर प्रादेशिक सेनेसाठी त्यांनी गीत संगीतबद्ध केले आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर त्यांनी ख्यातनाम गायिका प्रभा अत्रे यांच्याकडे राहून संगीताचे धडे गिरवले. एसएनडीटी विद्यापीठात संगीतात एम. ए. करत असतानाच त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. नंतर त्यांनी प्राचीन भारतीय चित्रकलेवर. आधारित संगीतावर अभ्यास करून नागपूर विद्यापीठात पीएचडीची पदवी मिळवली. तेव्हापासून त्या आर एस मुंडले धरमपेठ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. गत तीन वर्षांपासून त्या प्राचार्यांचा कार्यभारही सांभाळत आहेत,
प्राचार्यांचा कार्यभार सांभाळत असतानाच त्यांची संगीता साधना देखील सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करात अग्निवीर नामक नवीन प्रयोगाची सुरुवात केली आहे. अग्निवीरसाठी जे गीत लिहिले गेले, ते गीत संगीतबद्ध करून गाण्याचा बहुमान ही डॉ. तनुजा नाफडे यांनाच मिळाला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे झाले त्यानिमित्ताने एका कवयित्रीने "पधारो राम बिराजो राम" हे गीत शब्दबद्ध केले. हे गीत डॉ. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध करून गायले आहे. सध्या ते युट्युब वर प्रचंड गाजते आहे.
डॉ. नाफडे या गायिका तर आहेतच पण त्याचबरोबर संगीताच्या अभ्यासकही आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित रागरंजन ही त्यांची लेखमालिका दैनिक महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केली होती. हे लेखन पुढे पुस्तकरूपात प्रकाशित झाले. रागरंजन या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोशियारी यांच्याच हस्ते झाले होते. याशिवाय लष्कराची मार्शल ट्यून शंखनाद कशी घडली यावरही त्यांचे हिंदी पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
अशा संगीत क्षेत्रातील दिग्गज डॉ. तनुजा नाफडे आज २१ फेब्रुवारी रोजी वयाची साठ वर्षे पूर्ण करून ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आता २९ फेब्रुवारी रोजी त्या प्राचार्य पदावरूनही निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर आता पूर्ण वेळ संगीत साधनाच करायची असा त्यांचा मानस आहे.
अशा संगीत साधनेत स्वतःला पूर्ण वेळ झोकून देणाऱ्या डॉ. तनुजा नाफडे यांना षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी इशचरणी प्रार्थना..
अविनाश पाठक नागपूर.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment