भारताचा मानबिंदू 'सोमनाथ', आरसा @विनोद देशमुख

 आरसा @विनोद देशमुख

भारताचा मानबिंदू 'सोमनाथ'

-----------------------------------

जय सोमनाथ 🙏आठवडाभराच्या गुजरात दौऱ्याची कालची चौथी रात्र विलक्षण भारावलेली गेली.‌ याचं कारण, भारताचा मानबिंदू असलेल्य सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं सआरती दर्शन, नेत्रदीपक लाईट ॲंड साऊंड शो आणि पुन:प्रतिष्ठित मंदिराची सुंदरता अन् भव्यता. प्रत्येक भारतीयानं एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यावं, असंच आहे हे देशातील पहिल्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग.

सात शतकांमध्ये सहा वेळा परकीय आक्रमकांचे हल्ले आणि त्यानंतर तीनदा पुनर्निर्माण झालेलं सोमनाथ हे जगातील एकमेव धार्मिक स्थळ आहे. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमीसारखीच कथा. महमूद गजनी ते औरंगजेब अशा अनेकांनी हल्ले करून येथील सोनेचांदीहिरेमाणकंं लुटली, मंदिराची नासधूस केली. तरीही सोमनाथ आजही तेवढ्याच ताठ मानेनं सिंधुसागराच्या तटावर उभा आहे, प्रभास पाटण बंदरात, त्याच जागेवर !



आधुनिक काळात याचं श्रेय जातं महाराष्ट्र कन्या, इंदूरच्या महाराणी अहिल्या देवी होळकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. अठराव्या शतकात अहिल्यादेवींनी ध्वस्त सोमनाथाच्या शेजारीच प्रति सोमनाथ मंदिर उभारलं. ते आजही आहे आणि भाविक दर्शनाला जातात. येथे शिवलिंगाला रुद्राक्षांचा टोप घालतात. खरी कमाल केली ती सरदार पटेलांनी. स्वातंत्र्य मिळताच त्यांनी सोमनाथाचं पुनर्निर्माण जाहीर केलं. दुर्दैवानं काम सुरू होण्यापूर्वीच १९५० च्या शेवटी पटेलांचं निधन झालं. समाधान एवढंच की, ते हयात असतानाच जुन्या अवशेषांचं पाडकाम झालं होतं. नंतर कन्हैयालाल मुन्शी यांनी नवीन मंदिर पूर्ण करविलं आणि ११ मे १९५१ रोजी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी पुनर्निर्मित मंदिरात सोमनाथाची थाटात प्राणप्रतिष्ठा करून भारताची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित केली. तेच आजचं सोमनाथ.

वास्तविक, सोमनाथवरील हल्ले आर्थिक आणि धार्मिक या दोन्ही अंगांनी होते. परंतु मुजोर हल्लेखोर आणि त्यांचे चाहते  त्याला वेगवेगळा मुलामा देत होते. पहिला हल्ला करणारा महमूद गजनी मुस्लिमांसाठी हिरोच ठरला, त्याच्यावर पर्शियात महाकाव्ये रचली गेली. या विध्वंसाला ते 'सुमानत' म्हणायचे अन् त्याला 'मन्नत'शी जोडायचे. नंतर अलाउद्दिन खिलजीचा सेनापती उलुघ खानानं तर शिवलिंगच पळवलं आणि दिल्लीत नेऊन लोकांच्या पायदळी तुडवलं. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जुनागडच्या नवाबानं मलब्याच्या एका भागात मशीद उभारून रामजन्मभूमीची पुनरावृत्ती केली. हिंदूंचं विशाल ह्रदय पाहा. १९५० मध्ये अवशेष जमीनदोस्त करताना ही मशीद रीतसर हलवून दुसरीकडे दूरवर पुनर्स्थापित करण्यात आली. हा संस्कृतीचा फरक आहे.

रात्रीच्या अंधारातील लाईट ॲंड साऊंड शो भाविकांची मनं जिकणाराच आहे. मुख्य मंदिराचा मागचा भाग यासाठी स्क्रीन म्हणून वापरण्यात येतो. खालून वर शिखरापर्यंत मंदिराच्या आकारातील स्क्रीन, हे येथील खास वैशिष्ट्य्. त्यामुळे प्रत्येक दृश्याला एक प्रभावी पृष्ठभूमी लाभते आणि प्रत्येक क्षण सोमनाथाशी आपोआपच जुडून जातो. महानायक अमिताभ बच्चनचं भारदस्त निवेदन यात भरच घालतं. एक मात्र खटकलं. बारा ज्योतिर्लंगांची नावं सांगताना, दाखवताना महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन नावं, कशी आणि का, गळाली आहेत🤔 यात दुरुस्ती अपेक्षित आहे. या शोच्या वेळी, तसंच आरतीच्या वेळी हजारो भाविकांकडून होणारा "हर हर महादेव", " बम बम भोले" जयघोष पुरेसा बोलका आहे.

२००१ मधील सोमनाथ प्राणप्रतिष्ठा सुवर्ण जयंती सोहळ्यात बोलताना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते- "सोमनाथ हमारी सनातन संस्कृती का प्रतीक है, शाश्वत धर्म का प्रतीक है, भारत के इतिहास मे लगातार आए बदलाव काज प्रतीक है, बार बार ध्वस्त होने के बाद भी उठ खडे होने का (संघर्ष का) प्रतीक है।" म्हणजेच, सोमनाथ हा भारताचा राष्ट्रीय मानबिंदूच आहे.‌ त्याची प्रतिष्ठा जोपासणंं आणि पुन्हा त्याकडे कोणाचा वाकडा डोळा होणार नाही याची काळजी घेणं, हे आपल्या सर्वांचं कर्तव्यच आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.