भ्रष्टाचार थांबेल कसा ? 🍳आरसा...@विनोद देशमुख
*भ्रष्टाचार थांबेल कसा ?*
*🍳आरसा...@विनोद देशमुख*
---------------------------------------
मंत्रिमंडळात घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच लाच मागितली होती, असा सणसणीत आणि थेट आरोप दीपक केसरकर यांनी मविआचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केल्यामुळे "खोके-युद्ध" भडकणार, हे उघड आहे. पण यातून महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे तो हा की, खोक्यांचा असा जाहीर बाजारच भरला असेल तर मग भ्रष्टाचार थांबण्याचं नाव घेईल का ? ज्यांनी शासन-प्रशासन चालवायचं, तेच जर अशा प्रकारे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असतील, तर मग सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे पाहायचं हो😥 छत्रपती शिवाजी महाराजांचं उठताबसता नाव घेणाऱ्यांचा महाराष्ट्र तो हाच का, असा प्रश्न मराठी जनतेसह देशातील इतर राज्यांना पडला तर त्यांना दोष देता येईल का ?
...तेव्हा मंत्रिपदासाठी कोट्यवधींची मागणी झाली, मी १ कोटी चेकने दिले, केसरकरांचा सनसनाटी दावा
"मी कसेबसे एक कोटी रुपये दिले. परंतु, त्यापेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नसल्यानं ठाकरे सरकारमध्ये माझा समावेश झाला नाही," असा अत्यंत खळबळजनक दावा करून केसरकरांनी उबाठा शिवसेनेवर बॉम्बगोळाच टाकला आहे. हा राजकीय आरोप असल्याचं उबाठावाले स्वाभाविकच म्हणतील. पण मग "पन्नास खोके, एकदम ओक्के" हा स्वत:चा आरोपही तसाच आहे, हे ते मान्य करतील का ? गेली दीड वर्ष ते हे खोके डोक्यावर घेऊन फिरत आहेत ना😀 आता केसरकरांच्या आरोपाचं शिंदेसेनेनं भांडवल करायचं ठरवलं तर काय होईल सांगा.
एकूण काय तर, गेल्या काही वर्षात राज्यात भ्रष्टाचाराचं प्रस्थ माजलं आहे आणि त्यानं आता टोकच गाठल्याचं जाणवत आहे. अशानं राज्याची प्रतिमा डागाळेलच; पण जनतेचं जगणंही दुरापास्त होऊन जाईल. पण याकडे आपल्या नेतेमंडळींचं, नोकरशहांचं, समाजथुरिणांच मुळीच लक्ष नाही, हेच खरं. अन्यथा, भ्रष्टाचाराचा एवढा गजर झालाच नसता
हिंसाचाराचं राजकारण😣
---------------------------------
ही बजबजपुरी एकीकडे माजलेली असतानाच दुसरीकडे खुनाखुनीचं वाढतं सत्र लोकांची चिंता वाढविणारं आहे. एवढ्यात झालेल्या काही गोळीबार आणि हत्यांवरून राजकारण तापलं आहे. कारण, या घटनांमध्ये फिर्यादी आणि आरोपी प्रामुख्यानं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते-नेते आहेत. त्यामुळे ही प्रकरणं राजकीयच असावी, असा सर्वसाधारण अंदाज असतो आणि तो खरा मानून शिंदे सरकारला, शिवसेनेला आणि भाजपाला झोडपण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. यातील मुंबईचे आणि ठाण्याचे, अशी दोन्ही प्रकरणे प्रथम दर्शनी तरी व्यक्तिगत स्वरूपाची दिसत आहेत.
मुंबईत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा हे दोघेही उबाठा शिवसेना गटाशी संबंधित जुने मित्र. त्यातील एकानं दुसऱ्याची हत्या करून नंतर आत्महत्या केली. यात इतर राजकीय पक्षांचा संबंध काय ? संशय आणि आर्थिक व्यवहार, ही याची खरी कारणं असल्याचं जवळजवळ उघड झालं आहे. तरी काही बोलघेवड्या लोकांचं तोंड विरोधकांवर सुटलं आहे🥺 ठाण्याच्या गायकवाडांचा किस्साही असाच. शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील नसलेल्या वादाला हवा देण्याचा प्रयत्न विश्वप्रवक्त्यांपासून एकजात सारेजण करीत आहेत. गुंडाराज म्हणत आहेत. जेव्हाकि हा वाद पैशाच्या देवाणघेवाणीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, विरोधकांना संधी सोडायची नाही. असं "प्रेताच्या टाळूचं लोणी खाण्याचं" घाणेरडं राजकारण सध्या सुरू आहे.
एकूण, भ्रष्टाचारातही पैसे आणि गुन्ह्यातही पैशाचाच व्यवहार, असा हा पैशाचा खेळ सध्या राजकीय मंडळी खेळताना दिसतात. त्यामुळे सामान्य माणूस मात्र निराश झालेला आहे. या निराशेचा स्फोट झाला, तर कुठचे राहाल नेत्यांनो अन् राजकीय पक्षांनो😩
++++++++++
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment