आठवणी विद्याधर उपाख्य अण्णा गोखलेंच्या..*
*आठवलं ते सांगितलं...*
*आठवणी विद्याधर उपाख्य अण्णा गोखलेंच्या..*
अण्णा या नावाने मित्रमंडळींमध्ये आणि साहित्य वर्तुळात प्रसिद्ध असलेले विद्याधर गोखले हे मूळचे वऱ्हाडचे म्हणजेच अमरावती जिल्ह्यातले, त्यामुळे विदर्भात अण्णांचा संपर्क खूप होता. माझा अण्णांचा परिचय झाला तो १९८२-८३ च्या दरम्यानचा. आम्हा दोघांच्या वयात खूप अंतर होतं. तरीही अण्णांची माझी चांगली मैत्री झाली.
कोणत्याही नव्या प्रयोगांचे अण्णांना फारच कौतुक होते. मला आठवते माझे मित्र डॉ. विनय वाईकर यांनी उर्दू शायरीत येणारे उर्दू शब्द, त्यांना चपखल बसतील असे हिंदी मराठी आणि इंग्रजी प्रतिशब्द, आणि सुसंगत असे शेर असा एक ग्रंथ आईना एक गझल या नावाने प्रसिद्ध केला होता. अण्णांच्या कानावर या ग्रंथाबाबत गेले. अण्णांनी लगेचच डॉक्टर वाईकरांना मुंबईत बोलावून घेतले. बाईकरांचा आग्रह होता की अण्णांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाला नागपुरात यावे. मात्र अण्णांना ते शक्य झाले नाही. तेव्हा अण्णांनी मुंबईला पत्रकार संघात या पुस्तकावर एक परिचयात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. आपले संपर्क वापरून उर्दू, हिंदी आणि मराठी क्षेत्रातील नामवंतांना त्या कार्यक्रमात सहभागी केले. इतकेच काय तर आईना एक गझल या प्रयोगावर अण्णांनी लोकसत्ता मध्ये चक्क अग्रलेख लिहिला.
अण्णा जरी वैदर्भीय होते तरी त्यांची कारकीर्द सगळी मुंबईतच घडली. एक पत्रकार म्हणून मुंबईत गेलेले अण्णा पुढे ख्यातनाम नाटककार म्हणून गाजले. नाटककार, साहित्यिक, पत्रकार आणि फर्डे वक्ते म्हणून अण्णांचा साहित्य विश्वात बोलबाला होता. त्याचबरोबर मित्रमंडळींबरोबर मैत्री करणे आणि मैफिली रंगवणे सुद्धा हा अण्णांचा एक विशेष गुणधर्म होता. अण्णांबरोबर अशा मैफिलीत बसण्याचा योग मलाही अनेकदा आला.
मला आठवतंय अण्णांच्या षष्ठ्यब्दी पूर्ती निमित्त नागपुरात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्काराच्या आदल्या दिवशीच अण्णा नागपुरात पोहोचले होते. त्यांचा मुक्काम डॉक्टर विनय वाईकरांकडेच होता. आदल्या रात्री नऊ वाजता वाईकरांच्या टेरेसवर गप्पांची मैफिल रंगली. अण्णांसोबत प्राचार्य राम शेवाळकरही होते. मनोहर म्हैसाळकर देखील होते. याशिवाय डॉ. विनय वाईकर, डॉ. श्रीकांत चोरघडे असे अनेक दिग्गज बसले होते. गप्पांच्या ओघात अण्णांनी एक एक किस्से सांगायला सुरुवात केली. रात्रीचे बारा केव्हा वाजले ते कळलेच नाही मग रात्री बारा वाजता सर्वजण जेवायला बसलो आणि जेवण कमी पण गप्पा जास्त असे करत करत एक वाजताच उठलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता अण्णा पुढील कार्यक्रमासाठी तयार होते. त्या रात्री त्या गप्पांमध्ये अण्णांनी राजकारण, साहित्य, समाजकारण या क्षेत्रातल्या मान्यवरांचे अनेक किस्से सांगितले. त्या दिवशी आम्ही टेप रेकॉर्डर घेऊन बसलो नव्हतो याची आजही हळहळ वाटते.
अशीच गप्पांची एक मैफल मुंबईत मलबार हिल्ला न्यायमूर्ती वाईकरांच्या बंगल्यावर जमली होती. त्यादिवशीही रात्री आठ पासून तर बारापर्यंत अण्णांनी अनेक किसे ऐकवले होते. अघळपघळ मराठी वर्हाडी माणूस कसा असावा हे अण्णांकडे बघूनच त्यावेळी लक्षात येत होते.
१९९२ मध्ये माझ्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मी अण्णांना बोलावले होते. अण्णांच्या भाषणाआधी तत्कालीन केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बाबासाहेब केदार अशा मान्यवरांची भाषणे झाली होती. अण्णा भाषणाला उभे राहिले आणि पहिल्या चार वाक्यातच त्यांनी उपस्थित सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना जिंकले. बराच वेळ कार्यक्रम लांबला म्हणून चुळबुळ करणारी शाळकरी मुले अण्णांचे भाषण कान देऊन ऐकू लागली. आणि त्यांना टाळ्यांनी प्रतिसादही देऊ लागली. जवळजवळ अर्धा तास अण्णांनी त्या शाळकरी मुलांशी संवाद साधला. कार्यक्रम संपल्यावर बराच वेळ शाळकरी मुलांनी अण्णांशी संवाद साधत त्यांची स्वाक्षरी घ्यायला अण्णा भोवती कोंडाळे केले होते.
असे विद्याधर गोखले साहित्यिक पत्रकार म्हणून तर गाजलेच, पण लोकसभेत खासदार म्हणूनही त्यांनी आपली चूणूक दाखवून दिली होती. तर राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली होती. इतके सगळे करूनही ते एका सामान्य माणसाचे जीवन जगले होते हे विशेष.
नुकतीच ४ जानेवारी २०२४, रोजी अण्णांची १०० वी जयंती,आज जर अण्णा असते तर ते शंभर वर्षाचे झाले असते. आजही त्यांनी अशीच मित्रमंडळींची मैफल जमवली असती आणि रंगवली देखील असती. मात्र आज ते आपल्यात नाहीत हे वास्तवही स्वीकारावेच लागते.
अशा ह्या पत्रकाराला आणि त्यांच्या स्मृतीला आजच्या पत्रकारदिनी माझे विनम्र अभिवादन....
अविनाश पाठक
मराठी पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment