जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत असे खरंच कुणाला वाटतंय का?

 जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत असे खरंच कुणाला वाटतंय का?

दीपक देशपांडे.

केवळ नाममात्र असणारा हा नारा आज सर्वसामान्य माणसाला दोन वेळची भूक तरी शमविण्यासाठी मदतगार होऊ शकला असता तर.....?
 विविध शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , नागरिक व विद्यार्थी यांचेशी संवाद साधला असता या संवादातून पुढे आलेले वास्तव असे आहे की या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे या गावांमध्ये नाममात्र राहतात  प्रत्यक्ष वास्तव्यास नाहीत , परिणामी त्यांची मुले या शाळांमध्ये येण्याचे कुठलेही कारण नाही.
ही बाब सर्वविदीत आहे.

या जिल्ह्यात गांवखेड्यांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी काॅन्व्हेंटमध्ये नेआण करण्यासाठी लगतच्या शहरातून बसची सोय करुन दिल्यामुळे पालकांचा ओढा साहजिकच त्याकडे अधिक असणार आहे नव्हे तो आहेच , परिणामी जि.प.शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली आहे. कुठेकुठेतर दिखाव्यासाठी ग्रामीण भागातील शाळा कशातरी चालवल्या जात आहेत. 
ग्रामीण  भागातील पालकांना शेतीच्या हंगामात त्यांच्या मुलामुलींना शेतावर कामासाठी न्यावे लागत असल्याने तशीही शाळेतील संख्या रोडावली असते आणि कधी अती पावसामुळे कधी पुरामुळे शिक्षकवर्ग शाळेत येतीलच याची शाश्वती नसल्याने वा शाळेत पावसाने गळती लागल्याने वा झडपेमुळे  ओलावा आल्याने सुट्टी द्यावी लागते किंवा शाळेत पोचण्याच्या मार्गावर पाणी साचल्याने रस्त्यांवरुन जाणे शक्य नसल्याने शाळेला सुट्टी द्यावी लागते. अशा वेगवेगळ्या कारणांनी शाळा भरतच नाहीत याशिवाय आधीच शिक्षक संख्या अपुऱ्या असणाऱ्या शाळेतील शिक्षकवृंदाला  शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे सर्वेक्षण आणि माहिती गोळा करण्यासाठी जुंपले जाते त्यामुळे शाळेत शिक्षक नाही तर सगळीकडे आनंदीआनंद असतो.

अपुऱ्या शिक्षकांच्या नावाने तर या शाळांमध्ये कहरच असतो तरीही प्रामाणिक प्रयत्न करणारे शिक्षक नाहीतच असे नाही परंतू त्यांच्यावर राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्ती नजर ठेवून असतात आणि त्यांच्या कार्यात दखल देत ते पूर्णत्वास नेण्यासाठी अवरोध निर्माण करीतच असतात.

आता आपणच ठरवायचे , आपल्याला खरंच या शाळा टिकवायच्या आहेत की ,अशा शाळा चालविण्यापेक्षा या शाळा बंद करण्याचा शासननिर्णय मान्य करायचा ?

आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी चांगले संस्कार देण्यासाठी चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायचे की वाऱ्यावर सोडून वेगळेच धडे द्यायचे.

शिक्षकांनाही हेच ठरवावे लागणार आहे ,की मी माझ्या पाल्याला माझ्या शाळेत पाठवत नाही तर इतरांनी त्यांच्या पाल्याला माझ्या शाळेत कां पाठवावे? मी माझ्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून दूसऱ्या शाळेत पाठवत असेल तर त्यांनीही त्यांच्या पाल्यांना दूसऱ्या शाळेत पाठविले तर शाळेसाठी विद्यार्थी मिळत नसल्याच्या तक्रारी मी कां आणि  कशासाठी कराव्यात?

आपल्यापैकी प्रत्येकानेच  चिंतन मनन करण्याची गरज आहे. उगाच दूसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

ग्रामीण भागात शाळा टिकवायच्या असतील ,नोकऱ्या टिकवायच्या असतील तर शिक्षकांनाच पुढाकार घेऊन आपल्यासोबत आपल्या पाल्यांना आपण शिकवीत असलेल्या शाळेत स्वतः सोबत प्रवेश घेऊन शिकवावे लागेल ,तरच या शाळा आणि शिक्षकांच्या नोकऱ्यां टिकतील नाहीतर या शाळा आणि नोकऱ्या दोन्ही संपल्याशिवाय राहणार नाहीत. हे सत्य फार काळ लपून राहणार नाही , लपवून ठेवता येणार नाही.

चला तर मग.....

नववर्षात शाळेला जाऊया.... एक फेरफटका मारायला, आपलं पण जपायला.....


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.