*हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ प्रफुल्ल मोकद्दम...*
*आठवलं ते सांगितलं...*
*हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ प्रफुल्ल मोकद्दम...*
*नाबाद ७८...*
डॉ.प्रफुल्ल मोकद्दम हे नाव मी खूप वर्षांपासून ऐकत होतो. मात्र त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय झाला तो २०१० या वर्षी .मी त्यांचे नाव ऐकले होते ते मध्य भारतातील आघाडीचे नेत्र शल्य चिकित्सक म्हणून. मात्र माझा त्यांचा परिचय झाला तो एक समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून. त्यावेळी डॉ. मोकद्दम रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. नव्यानेच सुरू झालेल्या रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रो या क्लबच्या पदग्रहण समारंभात माझे मित्र डॉ. अशोक पाठक यांनी निमंत्रण दिले म्हणून मी तिथे गेलो होतो. त्यावेळी गनिमी काव्याने डॉ. पाठक यांनी मला रोटरीचा मेंबर करून घेतले. रोटरीची पिन मला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या नात्याने डॉ. मोकद्दम यांनीच लावली. तेव्हापासूनच आमचा परिचय झाला. हळूहळू तो वाढला आणि पुढे जाऊन ते माझ्यापेक्षा वयाने तब्बल नऊ वर्षांनी ज्येष्ठ असूनही आमची चांगली मैत्री झाली.
नेत्र शल्य चिकित्सक म्हणून गाजत असलेले डॉ. मोकद्दम हे चांगले समाजसेवी व्यक्तिमत्त्व आहे हे तर मला कळलेच होते. मात्र हळूहळू त्यांचे इतर पैलूही मला लक्षात येऊ लागले. डॉ. मोकादम हे चांगले गायक आहेत हे मला कालांतराने कळले. रोटरीच्या कार्यक्रमात हातात माईक घेऊन डॉक्टर गायला उभे राहिले की टाळ्या ठरलेल्याच असतात. त्याशिवाय ते चांगले संघटकही आहेत, चांगले आणि अभ्यासू वक्ते आहेत.गुणग्राहक व्यक्तिमत्व आहेत, आणि चांगले मित्रही होऊ शकतात असे व्यक्तिमत्व आहे.
कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा एक दिवस संध्याकाळचे डॉक्टरांनी मला घरी बोलावले. पत्रकार असल्यामुळे राज्य शासनाची अधिस्वीकृती माझ्याकडे होती, आणि परिणामी कोरोना काळातही गावभर हिंडण्याची मुभा होती. त्यामुळे संध्याकाळी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला काही कागद वाचायला दिले. ती एक कथाच होती आणि ती डॉक्टरांनीच लिहिली होती. तोपर्यंत माझी स्वतःची १० पुस्तके प्रकाशित झाली होती त्यामुळे एक लेखक म्हणून त्या कथेचे समीक्षण करावे आणि सुधारणा सुचवाव्या म्हणून त्यांनी मला ती कथा वाचायला दिली होती. ती कथा वाचल्यावर माझ्या लक्षात आले की डॉक्टर एक चांगले लेखक होऊ शकतात. वयाची सत्तरी ओलांडलेली असल्यामुळे कोरोना काळात ते क्लिनिक मध्ये जात नव्हते. त्यामुळे घरी बसून त्यांनी वैद्यकीय अनुभवावर आधारित वैद्यकीय कथा लिहायला सुरुवात केली. दीर्घकाळ प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे त्यांच्याजवळ अनुभवाचे भांडार होते. एकामागे एक कथा ते लिहीत गेले. आम्ही त्या कथा काही नियतकालिकांकडे पाठवल्या. त्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे डॉक्टरांचा उत्साह वाढला. पुढच्या वर्षी अजून कथा लिहिल्या गेल्या, आणि मग मीच मागे लागलो आणि त्यांचा दृष्टांत हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. योगायोगाने या कथासंग्रहाला साहित्य विहारचा उत्कृष्ट कथा संग्रह म्हणून पुरस्कारही मिळाला. अजूनही डॉक्टर उत्साहाने लेखन करत आहेत. त्याचबरोबर दिवसातले काही तास क्लिनिकमध्येही पेशंट बघतात. संध्याकाळी रोटरी आणि तत्सम सामाजिक कार्यातही सहभागी होतात, आणि संगीतसाधनाही करतात. हे सर्व करत असताना गोकुळासारख्या भरलेल्या त्यांच्या परिवारालाही ते न्याय देत असतात.
रोटरीसारख्या चळवळीत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून विदर्भ आणि खानदेश या संपूर्ण प्रदेशाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्या गुणग्राहकतेचा परिचय रोटरीच्या माध्यमातूनही अनेकांना आला. मला आठवते रोटरी नागपूर मेट्रोचा सचिव म्हणून एक वर्ष काम केल्यावर पुढच्या वर्षी मी अध्यक्ष व्हावे असा प्रस्ताव पुढे आला. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितले की तू जुन्या क्लबचा अध्यक्ष न होता एक नवीन क्लब गठीत कर. तुझ्यात ती क्षमता आहे.मी फारसा तयार नव्हतो.मात्र डॉक्टरांनी पाठपुरावा केला आणि मला योग्य असे मार्गदर्शन करून माझ्याकडून रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट हा नवा क्लब गठीत करून घेतला. यावेळी प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला खंबीर अशी साथही दिली. परिणामी रोटरी नागपूर एलिट ला त्या वर्षी बेस्ट न्यू क्लब ऑफ द इअर हा पुरस्कार देखील मिळाला.
हे सर्व लक्षात घेतले तर डॉक्टर प्रफुल्ल मोकदम हे फक्त कुशल नेत्रशल्य चिकित्सक आहेत असे नाही, तर साहित्यिक, संघटक, गायक, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासू वक्ते आणि कुटुंबवत्सल माणूस असे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे हे लक्षात येते. त्यामुळेच अशा हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या डॉ प्रफुल्ल मोकद्दम यांचा मित्र असणे ही अभिमानास्पद बाब ठरते...
असे चतुरस्त्र हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले डॉ. प्रफुल्ल मोकदम हे आज १ जानेवारी २०२४ रोजी वयाची ७८ वर्षे पूर्ण करून ७९ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयातही ते संपूर्णतः सक्रिय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही ते सर्वांशी संपर्क ठेवून असतात.
असे चतुरस्त्र हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांना त्यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. परमेश्वराने त्यांना दीर्घायुरारोग्य द्यावे आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हा मित्रांना मिळावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
अविनाश पाठक, नागपूर

Comments
Post a Comment